डॉ. जी. एस. सोनवणे, डॉ. पी. पी. म्हसे
Animal Care : अयोग्य व्यवस्थापनामुळे दुभत्या गाई-म्हशींमध्ये आजारांचा प्रसार वाढतो. प्रादुर्भावामुळे जनावरांचे आरोग्य, उत्पादनावर परिणाम होतो. उपचाराचा खर्च वाढतो. आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गोठ्याची जैवसुरक्षितता हा एकमेव पर्याय आहे.
पाळीव जनावरांतील जैवसुरक्षितता म्हणजे त्यांचे विविध प्रकारच्या जिवाणू, विषाणू, बुरशी तसेच आजार पसरविणाऱ्या गोष्टींपासून संरक्षण करणे होय. आजार पसरविणारे विविध घटकांचा हवा, पाणी, खाद्य, चारा यांच्यासह आगंतुक माणसे, भटके श्वान, वराह, पाल, सरडे, साप, उंदीर, घुशी, पक्षी आणि बाह्य परजीवी (माश्या, डास, गोचीड) इ.च्या माध्यमातून प्रसार होतो.
- जैवसुरक्षा योजना ही संसर्गजन्य आजार, रोग प्रसारक कीटक, माशी यांच्यावाढीचा धोका कमी करण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांशी संबंधित आहे. जैवसुरक्षा प्रक्रिया ही जेव्हा आजाराचा उद्रेक होतो, तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
- कोणत्याही आजाराचा प्रसार रोखण्यासाठी फार्मवर जैवसुरक्षा प्रणाली लागू असणे अत्यावश्यक आहे. दुधाचे भांडे तसेच विविध उपकरणावर जैवसुरक्षा पद्धतीचा अवलंब करावा.
- संसर्गजन्य आजार कमी करून आणि उत्पादन कार्यक्षमता सुधारून जनावरांच्या गोठ्यातील नफा वाढवता येऊ शकतो.
- आजार नियंत्रणामुळे जनावरांच्या मृत्यूचा धोका कमी होतो. या जैवसुरक्षा संरक्षणांचा लाभ घेण्यासाठी, पशुपालकांनी त्यांच्या गोठ्यातील जैवसुरक्षा योजनेचा भाग म्हणून दुग्धशाळेचा नकाशा आणि त्यात विशिष्ट माहिती समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यास अनुपालन म्हणून जैवसुरक्षा चिन्हे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
- गोठ्याची जैवसुरक्षा योजना तयार करण्यासाठी, प्रथम सामान्य आजार पसरविण्याचे मार्ग विचारात घ्यावेत. एक मानक आरोग्य क्रम निर्धारित करावा. जनावराचे आरोग्य आणि पशुपालनासाठी आवश्यक प्रक्रिया तसेच आजारी जनावर ओळखण्यासाठी, वेगळे करण्यासाठी आणि उपचार करण्याच्या विशिष्ट पद्धतींचे नोंदणीकरण ठेवण्यासाठी उपयुक्त असावी.
प्रभावी जैवसुरक्षा कार्यक्रमाचे टप्पे
जोखीम मूल्यांकन : कोणत्या समस्या गोठ्यामध्ये अस्तित्वात आहेत, हे ओळखण्यास मदत करते. समस्या किती मोठी आहे आणि समस्या उद्भवण्याची भविष्यात शक्यता किती आहे हे निर्धारित करते.
जोखीम व्यवस्थापन : प्रतिबंध योजनेची रचना आणि त्याची अंमलबजावणी.
जोखीम संप्रेषण ः फार्मवरील देवाणघेवाण जसे की, नवीन जनावरे खरेदी सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थापन, पुरवठा आणि ग्राहकांना योजना समजावून सांगणे आणि त्याची पूर्तता.
जोखमीचे मूल्यमापन
- सुरक्षित, उच्च दर्जाचे, दूध आणि मांस उत्पादनांचे उत्पादन फायदेशीर आणि शाश्वतपणे करणे हे बहुतांशी पशुपालक उत्पादकांचे ध्येय आहे. अनेक घटक ज्यामध्ये रासायनिक (कीटकनाशके, प्रतिजैविके आणि इतर औषधे) किंवा संसर्गजन्य दूषित पदार्थ, दूध तसेच मांसाची गुणवत्ता निकृष्ट करू शकतात. यापैकी काही जोखीम घटकांमध्ये नवीन जनावरांचे, अभ्यागत /आगंतुक लोकांची गोठ्यामध्ये भेट, तसेच दूषित खाद्य-पाणी, खते, शेती उपकरणे आणि साधने, औषधे किंवा पर्यावरण स्रोत यातून प्रसार होतो.
- अनेक रोगप्रतिबंधक माध्यमांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे, रासायनिक घटकांपासून सार्वजनिक आरोग्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तथापि, ई कोलाय, सालमोनेल्ला सारख्या सूक्ष्मजीव उत्पत्तीच्या आजारांचा धोका तसेच लिस्टेरिया अजूनही प्राणिजन्य खाद्यपदार्थमध्ये आढळून येतात.
- जनावरांवरील उपचार खर्च कमी आणि आर्थिक नुकसानीवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता यावे यासाठी आजाराचा जोखीम घटक ओळखणे महत्त्वाचे आहे.
- प्रतिजैविकांच्या प्रतिकाराविरुद्धच्या लढाईत जैवसुरक्षा हा महत्त्वाचा घटक आहे. जैवसुरक्षाची उद्दिष्टे केवळ बाहेरील स्रोतांकडून नवीन आजारांचा प्रादुर्भाव कमी करणे किंवा प्रतिबंध करणे यावरच नव्हे तर गोठ्यातील संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी करणे किंवा प्रतिबंध करणे यावर अवलंबून आहे.
- प्रतिजैविकांचा वापर कमीत कमी तीन आठवड्यांपूर्वी जनावरांची शारीरिक तपासणी, गोवंशीय आजारांची चाचणी, लसीकरण किंवा विलगीकरण यासारख्या साध्या कृतींद्वारे कमी केला जाऊ शकतो.
जैवसुरक्षितता प्रणाली राबवितानाची काळजी
- डेअरी फार्मच्या स्थापनेसाठी भौगोलिकदृष्ट्या, तसेच तांत्रिकदृष्ट्या जागा योग्य असणे गरजेचे आहे. गोठ्याची दिशा आणि परिमाणे, योग्य वायुविजन, फ्लोअरिंग आणि प्राण्यांची घनता इत्यादी.
- गोठ्याला चारी बाजूंनी योग्य पद्धतीने कुंपण करावे. कुणालाही गोठ्यामध्ये सहजपणे प्रवेश करता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
- दुधाळ गाई, म्हशी, शेळी, मेंढी तसेच कुक्कुटपालन शेडमध्ये पुरेसे अंतर असावे. गोठ्यात जनावरांची शास्त्रीय मानकापेक्षा जास्त गर्दी करू नये तसेच वेगवेगळ्या वयोगटांसाठी स्वतंत्र शेड आणि व्यवस्थापन असणे गरजेचे आहे.
- मजुरांसाठीचे निवासी क्षेत्र आणि शौचालय ही दूध काढण्याच्या जागेच्या अगदी जवळ नसावे.
- गोठ्याला भेट द्यायला येणाऱ्या लोकांना थेट गोठ्यात प्रवेश देऊ नये. भेट देणाऱ्या पाहुण्यांचे चपला बुटाचे निर्जंतुकीकरण करून त्यांना आत जाऊ द्यावे.
- गोठ्याच्या प्रवेशद्वाराजवळ वाहने आणि लोकांसाठी कमीत कमी ३ फूट रुंद, ६ फूट लांब अशी एक पायधुणी तयार करून त्यात निर्जंतुकीकरण करणारे द्रावण किंवा चुन्याची पूड टाकावी.
- गोठ्यामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी प्रवेशद्वारातील फूटबाथ मधूनच गोठ्यामध्ये येतील याची काळजी घ्यावी. गोठ्यावर येणाऱ्या लोकांसाठी फूटबाथ, गाड्यांसाठी टायरबाथ किंवा फवारे वापरून त्यांचे निर्जंतुकीकरण करावे.
- नवीन जनावर गोठ्यामध्ये आल्यास आजार पसरण्याची जोखीम वाढते. नवीन जनावरे खरेदी करताना त्यांचे आरोग्य तपासावे. शक्य झाल्यास जनावरांचा पूर्वोतिहास तपासावा. नवीन जनावराचे वेगळ्या विलगीकरण गोठ्यात वीस दिवस ठेवावे. पशुवैद्यकाकडून नियमित तपासणी करून घ्यावी.
- गोठ्यामध्ये जमिनीपासून चार फुटांपर्यंत चुना लावावा. त्यामुळे गोठा जंतुविरहित ठेवण्यास मदत होईल.
- गोठ्यामध्ये गोचीड, माश्या, डास, चिलटे यांसारख्या कीटकांमार्फत आजाराचा प्रसार होतो. म्हणून गोठ्यात दिवसाआड कडुनिंबाच्या पानांचा धूर करावा.
- शेणाचा खड्डा दुग्धशाळेपासून योग्य अंतरावर असावा जेणेकरून तो माश्या आणि कीटक इत्यादींसाठी आदर्श प्रजनन ठिकाण बनणार नाही.
- गोठा कोरडा राहिल्याने जमिनीवर बसणारे दुधाळ जनावरांना कासदाहाचे प्रमाण कमी राहील.
- दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. कासदाह प्रतिबंध करण्यासाठी दूध काढण्याअगोदर आणि नंतर कास स्वच्छ करून सड जंतुनाशक द्रावणात बुडवावेत.
- निरोगी तसेच आजारी आणि कासदाहग्रस्त जनावरांसाठी एकच दूध काढणी यंत्र वापरु नयेत. दूध काढण्यापूर्वी आणि नंतर कास आणि सड धुवावेत, साफ करणे, कोरडे करणे आणि योग्यरीत्या निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांचे संपूर्ण दूध काढणे गरजेचे आहे.
- कॅलिफोर्निया कासदाह चाचणी प्रत्येक १५ दिवसांनी करावी. आणि संशयित जनावरे ताबडतोब विलगीकरणात ठेवावीत. अशा गायींचे दुधाचे नमुने गोळा करून एबीएसटी चाचणीसाठी द्यावेत. नंतरच्या चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आल्याशिवाय संक्रमित गाय कधीही निरोगी गायींसोबत ठेवू नयेत.
- दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ, व्यसन नसलेली व निरोगी असणे आवश्यक आहे. नखे वाढलेली नसावीत, कपडे स्वच्छ असावे.
- सांसर्गिक कासदाह प्रसार होऊ नये यासाठी दूध काढताना हातमोजे घालावेत.
- जनावरांच्या खाली पाणी साचल्यामुळे चिखल निर्माण होऊ नये म्हणून, निसरडे नसलेले काँक्रीटची जमीन, समतल ड्रेनेज सिस्टीम आणि गली ट्रॅप्स इत्यादी सुविधा आवश्यक आहेत.
- जनावरांना २४ तास स्वच्छ पाणी, कुट्टी केलेला चारा, योग्य मात्रेमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे द्यावीत.
- गोठ्यात जास्तीत जास्त आधुनिकीकरणाचा अवलंब करावा. पाण्याचे स्रोतांची नियमित तपासणी करावी.
- गोठ्यात वापरली जाणारी उपकरणे आणि वस्तू शक्यतो दुसऱ्या जनावरांच्या गोठ्यावर वापरासाठी देणे कटाक्षाने टाळावे. शक्य नसल्यास त्यांचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय परत आपल्या गोठ्यामध्ये आणू नये.
- गाईंचा चयापचय आराखडा नियमितपणे आणि वेळेवर करावा. जेणेकरून जनावरांमधील शारीरिक ऊर्जा संतुलन आणि कमतरता स्थिती समजेल.
- पशुखाद्य नेहमी कोरड्या व बंदिस्त जागी ठेवावे. खाद्याला बुरशी लागू नये यासाठी वारंवार खाद्याची तपासणी करावी. पशुखाद्य व चारा यांच्यासोबत कीटकनाशके, खतांची साठवणूक करू नये.
- रवंथ करणाऱ्या जनावरांना बुरशीजन्य आजारांपासून वाचण्यासाठी नैसर्गिक प्रतिकार क्षमता असते, परंतु दुधाचा ताण असणारी जनावरे, वासरे, आजारी जनावरे लवकर आजारास बळी पडतात. पशुपोषण व्यवस्थापनातून बुरशी व मायकोटॉक्सिन्सचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. कच्चा माल खरेदी करताना ९ टक्के आर्द्रतेपेक्षा कमी घ्यावा.
- वेळापत्रकानुसार लसीकरण करावे. लसीकरणाच्या १ आठवडा आधी जंतनिर्मूलन करून लसीकरण करावे.
- गोठ्यातील जनावरांचा कळप नेहमीपेक्षा वेगळी, अनियमित लक्षणे दाखवू लागल्यास त्वरित पशुतज्ज्ञांना माहिती द्यावी. जेणेकरून जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत, लम्पी, देवी व संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास वेळीच नियंत्रण करता येईल.
- अॅन्टिबायोटिक्स/ प्रतिजैविके हे योग्य निदान न करता दीर्घकाळासाठी अशास्त्रीय पद्धतीने आणि अवास्तव वापरले जाऊ नयेत.
- नियमितपणे जनावरांना खरारा करण्याची सोय उपलब्ध असावी. जेणेकरून खाजेमुळे आलेला ताण कमी होण्यास मदत होईल; रक्तभिसरणात वाढ होते. जनावरांची त्वचा स्वच्छ होऊन जनावरे निरोगी राहण्यास मदत होईल.
- मृत जनावर तसेच पडलेल्या वाराची शास्त्रीय प्रकारे विल्हेवाट लावावी.
संपर्क - डॉ. जी. एस. सोनवणे, ८७९६४४८७०७ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.