Livestock Vaccination: शेळ्या, मेंढ्यांतील लसीकरणाचे वेळापत्रक

Animal Health: शेळ्या व मेंढ्यांमध्ये जिवाणू आणि विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वेळेवर आणि वेळापत्रकानुसार लसीकरण करून पशुधनाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon
Published on
Updated on

डॉ. विलास टाकळे

Sheep Farming Health Tips: शेळ्या, मेंढ्यांमध्ये जिवाणूजन्य, विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास मरतूक होते. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करून घेणे अतिशय फायद्याचे ठरते. वेळापत्रकानुसार लसीकरण करणे फायदेशीर ठरते.

शेळी, मेंढीपालनामध्ये संगोपनाइतकेच आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थापनात दुर्लक्ष केल्यास कळपातील जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कळपातील आजारी शेळ्यांवर उपचार केल्यास फायदेशीर होते.

आजारी शेळ्यांची लक्षणे

भूक, हालचाल मंदावते, रवंथ करणे थांबते, कळपापासून वेगळे राहण्याचा प्रयत्न करतात, धाप टाकते.

लेंड्याचे प्रमाण कमी होऊन त्या घट्ट किवा जुलाब होतात, मूत्राच्या रंगात बदल दिसून येतो.

नाकपुड्या कोरड्या पडतात, एखाद्यावेळेस शेळी लंगडते.

अंगावरील केस ताठ होऊन कातड्याची चमक नाहीशी होते.

शरीर तापमानात वाढ दिसून येते, पाणी कमी पितात आणि दूध कमी होते. अशक्तपणा, तोल जाणे, या प्रकारची लक्षणेही दिसून येतात.

Animal Vaccination
Animal Vaccination : जनावरांच्या आजार नियंत्रणासाठी लसीकरणाचे वेळापत्रक

प्रतिबंधात्मक लसीकरण

शेळ्यांमध्ये जिवाणूजन्य, विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास मरतूक होते. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करून घेणे अतिशय फायद्याचे ठरते.

प्रति जनावर लसीकरणासाठी (शासकीय पशुवैद्यकीयमार्फत) येणारा वार्षिक खर्च ५० रुपयांपेक्षा पेक्षा जास्त नाही.

स्वखर्चातून एक शेळीला दर तीन महिन्यात एकदा असे वर्षातून चार वेळा जंत निर्मूलन, आवश्यकतेनुसार गोचीड निर्मूलन आणि ५ प्रकारच्या आजारांच्या लसीकरणासाठी एका शेळीला १२५ ते १५० रुपये खर्च येतो. वेळापत्रकानुसार लसीकरण करणे फायदेशीर ठरते.

संसर्गजन्य आजार

जिवाणूजन्य आजार ः आंत्रविषार, घटसर्प, धनुर्वात

विषाणूजन्य आजार ः पीपीआर, लाळ्या खुरकूत, देवी, ब्ल्यू टंग, मावा आजार.

लसीकरणाबाबत शंका समाधान लसीकरणानंतर गाठी येतात का?

पशुमध्ये लस टोचताना काही उणिवा राहिल्यास गाठी येऊ शकतात. कालांतराने या गाठी विरघळून जातात. जर गाठी तशाच त्वचेत राहिल्या तर पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

लसीकरण केल्यानंतर काही वेळा जनावरांच्या अंगावर गाठी येणे किंवा ताप येणे अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या तक्रारी उद्‍भवू शकतात. त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.

गाठ येते किंवा ताप येतो म्हणून लसीकरण टाळू नये. अशा गाठींमुळे जनावरांच्या जिवाला काही धोका होत नाही. त्यामुळे न घाबरता लसीकरण करून घ्यावे.

लसीकरणामुळे शेळ्या गाभडतात का?

लस शरीरात टोचल्यानंतर काही काळानंतर शरीरात तापमान वाढ होते. लसीकरणामुळे गर्भाशयात वाढत्या गर्भास आयत्या स्वरूपात आजाराविरुद्ध प्रतिकार शक्ती प्राप्त होते. म्हणून गाभण जाण्यापूर्वीच शेळ्या-मेंढ्यांना लस टोचून घेणे आवश्यक आहे.

लसीकरणाने जनावरे गाभडत नाहीत. मुळांत गाभडण्यामागे जनावरांतील प्रतिकारशक्ती आणि इतर असंसार्गिक व पोषणाशी संबंधित कारणे असू शकतात.

Animal Vaccination
FMD Vaccination : धाराशिवमध्ये लाळखुरकत लसीकरण मोहीम

साथ आल्यानंतर लसीकरण केले तर फायदा होतो का?

लसीकरण हे निरोगी जनावरांचे करावयाचे आहे. लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय आहे आणि तो निरोगी पशूंना करावयाचा आहे. साथ आल्यानंतर लसीकरण टाळावे. कारण बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत. लक्षणे व्यक्त होण्यासाठी काही कालावधी लागतो अशावेळेस लसीकरण केल्यास जनावरे आजारास बळी पडतात.

लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार लस टोचून घ्यावी. जेणेकरून येणाऱ्या हंगामात प्रतिकारशक्ती बळकट होते. पावसाळ्यात आजाराचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे. यामुळे शेळी मेंढीमध्ये रोगप्रतिकार शक्ती तयार होते आणि त्या निरोगी राहतात.

लसीकरण केल्यावर दूध कमी होते?

लस शरीरात टोचल्यानंतर काही काळानंतर शरीरात तापमान वाढ होते. त्यामुळे तात्पुरत्या काळासाठी दूध उत्पादनात घसरण दिसते. पण हे लक्षण कायमस्वरूपी नसून तात्कालिक असते.

लस दिल्यानंतर शरीरावरील ताण कमी करण्यासाठी आणि दूध उत्पादन घट येऊ नये यासाठी क्षार मिश्रण सोबत गुळाचे पाणी पाजावे. जेणेकरून दूध उत्पादनात सातत्य / नियमितपणा राहील.

दूध उत्पादन कमी होण्यापेक्षा सांसर्गिक आजाराने शेळी, मेंढी मृत्यू पावल्यास होणारे नुकसान जास्त असते.

लसीकरण कोणत्या वयाच्या जनावरास करावे ?

पशूंमध्ये लसीकरण करावयाचे वेळापत्रक हे निश्‍चित केले असून ठरावीक वयात आणि अनुकूल परिस्थितीत करून घ्यायचे आहे.

प्रत्येक संक्रमित आजारांसाठी लस टोचण्याचे प्रमाण व काळ निश्‍चित केला आहे. त्या काळातच लसीकरण करून घेतल्यास हंगामी जनावरे आजारास बळी पडत नाहीत.

लसीकरणाचे वेळापत्रक

आजार लस केव्हा टोचावी दोन लसीमधील अंतर लस देण्याची वेळ

पहिली मात्रा दुसरी मात्रा

आंत्रविषार ३ महिने वय असताना म्हणजेच थानतुटीनंतर पहिल्या मात्रेनंतर १० ते १२ दिवसांनी दुसरी मात्रा (बूस्टरडोस) देण्यात यावी. प्रतिवर्ष मे-जूनमध्ये पावसाळ्यापूर्वी

घटसर्प ३ महिने वय असताना म्हणजेच थानतुटीनंतर -- ६ महिने पावसाळ्यापूर्वी

पी.पी.आर ३ महिने वय असताना, म्हणजेच थानतुटीनंतर आवश्‍यकता नाही दर ३ वर्षाला, पण ज्या भागात जास्त प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी दर वर्षी केले तर फायदेशीर ठरते एप्रिल - मे

लाळ्या खुरकूत ३ महिने वय असताना, म्हणजेच थानतुटीनंतर ६ महिने जून, डिसेंबर

देवी ३-५ महिने वय असताना, म्हणजेच थानतुटीनंतर प्रति वर्ष ऑक्टोबर (प्रादुर्भाव असल्यास)

धर्नुवात ३-५ महिने वय असताना --  प्रति वर्ष, प्रभावित क्षेत्र -- 

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

निरोगी शेळ्या, मेंढ्यांना लसीकरण करावे. लसीकरण करण्याअगोदर ८ ते १० दिवस शेळ्यांना जंतनाशक पाजावे, जेणेकरून लसीचा परिणाम चांगला होतो.

आजारी शेळ्यांमध्ये लसीकरण करणे टाळावे.

प्रत्येक शेळी, मेंढीला लसीकरण करण्यापूर्वी नवीन निर्जंतुक सुईचा वापर करावा किंवा सदर सुया उकळत्या पाण्यातून निर्जंतुकीकरण करून वापराव्यात.

लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणाच्या काळात करावे.

लसीकरण तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आणि लस उत्पादक कंपनीने दिलेल्या नियम पद्धतीने करावे.

लस टोचण्याअगोदर वापरण्याची अंतिम तारीख तपासावी. कंपनी निर्देशानुसार लसीची ने-आण व साठवणूक करावी.

लस टोचताना दोन लसीकरणामध्ये किमान १५ दिवसांचे अंतर ठेवावे.

करडे / कोकरू आईपासून थानतूट झाल्यानंतर प्रथमतः त्यांना जंताचे औषध पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पाजावे, अंगावर कोणतेही प्रकारचे बाह्य कीटक नाहीत याची खात्री करून घ्यावी. वेळापत्रकामध्ये दर्शविल्याप्रमाणे लसीकरण करून घ्यावे.

लसीकरणाचा कार्यक्रम वाडी, वस्त्यांवरील सर्व शेळ्या, मेंढ्यांमध्ये एकाच वेळी राबविल्यास लसींची मात्रा वाया न जाता आजाराचे मुळापासून उच्चाटन करता येऊ शकते. त्यामुळे एखाद्या परिसरात एकाच वेळी लसीकरण राबवावे.

आंत्रविषार आणि धनुर्वात नियंत्रणासाठी एकत्रित लस उपलब्ध आहे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वापर करावा.

- डॉ. विलास टाकळे, ९५४५४३३५७४

(वरिष्ठ संशोधन अधिकारी, बाएफ, वाघोली फार्म, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com