Animal Care : काळजीपूर्वक करा प्रतिजैविकांचा वापर

Antibiotics Uses : अल्प प्रमाणात प्रतिजैविकांचा अंश दुधाद्वारे किंवा मांसाद्वारे आहारातून गेल्याने शरीरात असलेले जिवाणू प्रतिजैविकांच्या विरोधात स्वतःमध्ये जनुकीय बदल करून आणतात आणि प्रतिरोधक्षमता वाढते, ज्याचा प्रसार इतर जिवाणूंमध्येसुद्धा होतो.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. विकास वासकर, डॉ. राहुल कोल्हे, डॉ. चंद्रकांत भोंग

Uses of Antibiotics : जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार उत्तम आरोग्यासाठी सकस आणि संतुलित आहार, शुद्ध पेयजल, कचरा व्यवस्थापन इत्यादी मूलभूत बाबींबरोबरच प्रतिजैविके प्रतिरोध हा सर्वात महत्त्वाचा विषय गंभीरतेने घेण्याची गरज आहे. सर्वांत जास्त आजार विविध प्रकारच्या जिवाणूंमुळे होतात. जसे की, क्षयरोग, प्लेग, विषमज्वर (टायफॉइड), काळपुळी (अँथ्रॅक्स) आणि इतर.

विविध संशोधनातून सर फ्लेमिंग यांनी बुरशीपासून तयार होणाऱ्या आणि जिवाणूंना नष्ट करणाऱ्या पेनिसिलीन या द्रव्याचा शोध लावला आणि प्रतिजैविक (ॲंटिबायोटिक्स) युगाचा जन्म झाला

त्यानंतर काही इतरही रासायनिक पदार्थांचा आणि जिवाणूंपासून विलग केलेल्या प्रतिजैविकांचा जसे टेट्रासायक्लिन, स्ट्रेप्टोमायसिन, सिप्रोफ्लोक्सासिन आणि अशा अनेक प्रतिजैविकांची निर्मिती झाली.

यामुळे अनेक आजार नियंत्रणात आले. मात्र गेल्या काही वर्षांत एकच प्रकारचे प्रतिजैविक न वापरता त्यामध्ये दोन-तीन प्रकारच्या प्रतिजैविकांचा वापर करून काही औषधे बाजारात आली. तथापि प्रतिजैविकांचा वापराचा अतिरेक झाला आणि त्यांच्या अनिर्बंध, अयोग्य तसेच अनावश्यक वापरामुळे बरेचशे जिवाणू प्रतिजैविकांना दाद देईनासे झाले आहेत. प्रतिजैविकांना प्रतिरोध होण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर.

Animal Care
Animal Care : दुधाळ जनावरांना द्या संतुलित आहार

अनावश्यक वापर

ऋतूबदलामुळे होणारे साधे आजार, सर्दी, साधा खोकला किंवा साधा ताप, ज्यावर घरगुती उपाय किंवा वेदनाशामक औषधे किंवा ताप कमी करणाऱ्या औषधांचा वापर करण्याचा सोडून सर्रासपणे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर करण्यात आला आणि अजूनही चालू आहे.

प्रतिजैविकांचा वापर करताना त्यांची मात्रा पुरेशा प्रमाणात दिली गेली नाही किंवा अतिरिक्त प्रमाणात मात्रा दिली त्यामुळे मानव, प्राणी किंवा पक्ष्यांच्या शरीरात असलेल्या जिवाणूंनी स्वतःमध्ये उत्क्रांती किंवा बदल घडवत प्रतिजैविकांना प्रतिरोध करणारी यंत्रणा तयार केली.

जिवाणूंची ही नवीन पिढी प्रतिजैविकांना दाद देईनाशी झाली आणि प्रतिरोधाचे संक्रमण येणाऱ्या पिढ्यांमध्ये तसेच सान्निध्यात असणाऱ्या इतर जिवाणूंमध्ये सुद्धा झाले त्यालाच शास्त्रीय परिभाषेत ‘प्रतिजैविक प्रतिरोधक्षमता‘ म्हणतात. प्रतिरोधक्षमता वाढण्याचे दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजे फक्त अर्हताधारक वैद्यकीय तसेच पशुवैद्यकीय तज्ज्ञांना प्रतिजैविके वापरण्याचा किंवा लिहून देण्याचा अधिकार असताना दोन्ही क्षेत्रांमध्ये अधिकार नसणाऱ्या व्यक्तींनी औषधनिर्माण व चिकित्सावैद्यक शास्त्राचे ज्ञान नसताना प्रतिजैविकांचा वापर केला जातो.

शास्त्रीय ज्ञानाअभावी गरज नसताना प्रतिजैविके वापरली जातात किंवा त्यांची मात्रा कमी-अधिक होते. ज्याचा परिणाम प्रतिरोधक्षमता वाढीस लागण्यात मदत होते. औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४५ नुसार प्रतिजैविकांसारखी औषधे नोंदणीकृत वैद्यक किंवा पशुवैद्यकांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणालाही विकू नयेत असा नियम असताना देखील नियमाचे सर्रास उल्लंघन झालेले दिसून येते. त्यामुळे सामान्य जनतासुद्धा प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषधे सर्रासपणे घेतात. त्याचा परिणाम अप्रत्यक्षरीत्या प्रतिरोधक क्षमता वाढण्यात होतो.

विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये डॉक्टरकडे न जाता स्वतःच किंवा इतरांच्या सांगण्यावरून उपचार करण्याची मानसिकता बऱ्याच प्रमाणात रुजलेली आहे. भारतामध्ये दिसणारी ही अत्यंत सामान्य घटना आहे परंतु यामुळे आपण अत्यंत जीवघेणे संकट आपल्या सर्वांवर, अखिल मानव जातीवर ओढवून घेत आहोत.

प्रत्येक छोट्या-मोठ्या आजारासाठी कोणत्याही वैद्यकीय/पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय आपण स्वत: या औषधांचे सेवन/वापर करत आहोत. त्यामुळे औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. एखादा साधा जरी आजार असेल त्या साधारण आजारांमध्ये तीन-चार औषधांचा वापर रुग्णावर केला जातो, त्याची लक्षणे कमी होत नाही आणि शेवटी जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढत जातो आणि अशी व्यक्ती दगावण्याचे प्रमाणसुद्धा वाढत जाते.

बऱ्याच वेळा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेण्यासाठी रुग्ण किंवा त्याचा नातेवाईक जेव्हा औषध विक्रेत्यांकडे जातो तेव्हा संपूर्ण मात्रेची औषधे न घेता अर्धीच विकत घेतात किंवा संपूर्ण औषधे जरी घेतली तरी रुग्णाची लक्षणे थोड्याफार प्रमाणात कमी झाली की पूर्ण कोर्स न करता औषधे घेण्याची थांबविली जातात.

या विचित्र मानसिकतेमुळे औषधाचा संपूर्ण डोस जो प्रतिजैविकांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आवश्यक असतो तो शरीरात न गेल्यामुळे जिवाणू प्रतिजैविकांना दाद देत नाहीत. अर्धवटरित्या वापरलेल्या प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिरोध निर्माण करतात.

प्रतिजैविके प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये वापरली असता औषधाच्या शेवटच्या मात्रेनंतर कमीत कमी ७२ तास अशा पशूंच्या दुधाचा किंवा पक्ष्याच्या मांसाचा समावेश मानवी आहारात करू नये असे औषधनिर्माणशास्त्रानुसार आवश्यक आहे तथापि या बाबीकडे सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. अल्प प्रमाणात प्रतिजैविकांचा अंश दुधाद्वारे किंवा मांसाद्वारे आहारातून गेल्याने शरीरात असलेले जिवाणू प्रतिजैविकांच्या विरोधात स्वतःमध्ये जनुकीय बदल करून आणतात आणि प्रतिरोधक्षमता वाढते, ज्याचा प्रसार इतर जिवाणूंमध्ये सुद्धा होतो.

प्रतिजैविक प्रतिरोधक्षमता वाढीस लागण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे एखाद्या रुग्णाला/ पशू-पक्ष्याला डॉक्टरांनी/पशुवैद्यकाने प्रतिजैविकाचा वापर करण्यासाठी सुचवले असल्यास त्याच्या मलमूत्राद्वारे प्रतिजैविकाच्या अंशाचे उत्सर्जन होऊ शकते. परंतु याबाबत ठोस शास्त्रीय अभ्यास झाला नसल्यामुळे अशा उत्सर्जनावाटे प्रतिजैविक प्रतिरोधक्षमता किती प्रमाणामध्ये वाढीस लागली आहे असा अंदाज करणे कठीण आहे परंतु ही बाबसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही.

प्रतिजैविके तयार करणाऱ्या औषधी कारखान्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या सांडपाण्यामधूनसुद्धा अशा प्रतिजैविकांचा अंश वातावरणात मिसळण्याची शक्यता असते, त्याद्वारेसुद्धा मातीतील जिवाणूंमध्ये प्रतिरोधक्षमता निर्माण होऊ शकतो.

Animal Care
Animal Care : वाढत्या उन्हाळ्यात जनावरांना जपा

प्रतिजैविके पशू-पक्ष्यांच्या किंवा मनुष्याच्या शरीरात तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे दिल्यानंतर प्रतिजैविकांचा काही अंश मलमूत्राद्वारे वातावरणात उत्सर्जित होतो. वातावरणातील म्हणजे मातीतील किंवा पाण्यातील किंवा हवेतील जिवाणूमध्येसुद्धा ही प्रतिजैविके अल्पप्रमाणात गेल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिरोध तयार होऊन हळूहळू हा प्रतिरोध पशू,पक्षी, माणसांमध्ये संक्रमित होत आहे.

प्रतिजैविकांची मात्रा जाणते, अजाणतेपणी अर्धवट सोडणे, साध्या सर्दीसाठी तसेच इतर किरकोळ आजारांसाठी स्वमनाने जाऊन ‘स्ट्राँग औषध’ म्हणून प्रतिजैविके खरेदी करणे, औषध विक्रेत्यांनी प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैविकांची विक्री करणे, डॉक्टरांनी नको इतका प्रतिजैविकांचा मारा रुग्णांवर करणे, गरज नसेल तेव्हाही अधिक पॉवरफुल प्रतिजैविके वापरणे, प्रशासनाने औषधविषयक कायद्यांची कडक अंमलबजावणी न करणे अशा अनेक चुकीच्या बाबी सर्रास घडत आहेत.

आरोग्याची काळजी

अलीकडे हे जिवाणू इतके प्रबळ झाले आहेत, की आपल्याकडील सर्वात प्रभावी प्रतिजैविकेसुद्धा निष्प्रभ ठरत आहेत. हे टाळण्यासाठी प्रतिजैविके वापरताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रतिजैविके केवळ तज्ज्ञ/पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

कोर्स पूर्ण होण्यापूर्वीच बरे वाटू लागले तरीही कोर्स पूर्ण करावा. किरकोळ आजारांसाठी डॉक्टर किंवा औषध विक्रेत्याकडे प्रतिजैविकांचा आग्रह धरू नये.

प्रतिजैविकांचा वापर कमी करायला लागावा यासाठी जंतूसंसर्ग रोखण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी साबण, पाण्याने हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता, लसीकरण, शुद्ध पाणी, सांडपाण्याची योग्य व्यवस्था असे विविध उपाय अमलात आणणे जरुरीचे आहे.

औषधोपचार करताना तज्ञ वैद्यक किंवा पशुवैद्यक यांच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा संपूर्ण कोर्स पक्षी, प्राणी, माणसांसाठी करावा.

प्रतिजैविकांचा उपचार पशू किंवा पक्ष्यांवर चालू असताना प्रतिजैविकानुसार शेवटच्या डोसनंतर कमीत कमी ७२ तास अशा प्राणिजन्य अन्नपदार्थांचा समावेश मानवी आहारात करू नये. आजारी जनावराचे दूध काढल्यानंतर वापरात न आणता खड्ड्यामध्ये ओतून त्याची विल्हेवाट लावावी.

प्राणी, पक्ष्यांवर प्रतिजैविकांचा वापर आजार दूर करण्यासाठी होत असेल तर अशा प्राणी, पक्ष्यांची कमीत कमी ७२ तास कत्तल करू नये, जर दुर्दैवाने करावी लागली तर असे मांस खाण्यासाठी वापरू नये.

डॉ. विकास वासकर, ९४०३१८४५४१

(पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com