
Animal Rearing : महाराष्ट्रात भटक्या व निम-भटक्या पशुपालकांनी परंपरागत ज्ञान-कौशल्याच्या आधारे एक व्यवस्था निर्माण केली आहे. त्यात पशुधनाची शुद्ध पैदास करणे, आरोग्याची काळजी घेणे, रानातील व शेतातील चारा व्यवस्थापन, दूध व दुग्धेतर उत्पादनांची निर्मिती व विक्री, शेतीची मशागत व खत व्यवस्थापनातील स्थान, पशुपालकांचे पाळीव प्राण्यांशी असणारे भावनिक व जैवसांस्कृतिक नाते अशा नानाविध छटा या पारंपारिक व्यवस्थेत आढळतात.
सह्याद्रीतील कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरात डांगी गोवंश जतन व संवर्धन कार्यक्रम सुरू आहे. लोकपंचायत संस्थेने डांगी गोवंश पैदासकार संघाच्या माध्यमातून ‘डांगी-व्यवस्था’ पुनरुज्जीवन व क्षमता बांधणी या दृष्टीने कार्य हाती घेतले आहे. अशा पारंपारिक पशुपालन व्यवस्थांचा अधिक शास्रशुद्ध अभ्यास केला तर सरकारसह सर्व संबंधित
जैवविविधता स्वस्थळी संवर्धित करण्यासाठी विशेष धोरण आखता येईल व दीर्घकालीन कार्यक्रम पण. पशुधन आधारित पारंपरिक उद्योग व्यवसाय महाराष्ट्र राज्यात नऊ कृषी-हवामान विभाग आहेत. स्थानिक जैव-भौगोलिक संरचनेनुसार हे विभाग पडले आहेत. येथील जैविक स्रोत व स्थानिक पाळीव प्राणी यांची अनोखी सांगड पशुपालक समाजाने घातली आहे.
त्यातून पशुपालन आधारित उपजीविका व व्यवसाय विकसित झाले आहेत. आजही काही प्रमाणात टिकून आहेत व विकसित होताहेत. पशुपालन म्हटले की दुध पहिले आठवते. दुधाळ व निम-दुधाळ जातीच्या म्हैस व गोपालनातून दुध व्यवसायाची खूप जुनी परंपरा आपल्याकडे आहे.
दुधापासून खवा, लोणी, तूप तयार करणे व बाजारात विकणे, हा व्यवसाय विशिष्ठ ठिकाणीच होतो. म्हशीच्या दुधापासून तयार होणारे सातारी कंदी पेढे असतील, मराठवाड्यातील भूम परिसरातील खवा, पेढा तसेच नगर जिल्ह्यातील मेंढी व गायीच्या दुधापासून बनणारा घारगावचा पेढा (की जो धनगर महिला तयार करत असत), अकोले तालुक्यातील आदिवासी पशुपालक डांगी गाय व म्हशीच्या दुधापासून खवा तयार करतात, तोच प्रसिद्ध असा राजूरचा पेढा… अशी अनेकोत्तम उदाहरणे सांगता येतील.
राजूर येथील नवाळी यांचा पेढा खूप रुचकर आहे. १९३० पासून स्थानिक खव्यापासून पेढा तयार करण्याचे काम नवाळी कुटुंब अत्यंत सचोटीने करत आहे. उन्हाळ्यात दुध उत्पादन कमी झाल्यावर गावातील खव्याअभावी हा पेढा मिळत नाही. पण दुसरीकडे राजूर-पेढा नावाने अनेक दुकाने वर्षभर सुरू असतात. पण खाकी रंगाच्या मूळ राजूर पेढ्याची चव या आधुनिक पद्धतीने बनवलेल्या पांढऱ्या रंगाच्या (कृत्रिम?) पेढ्याला नाही.
विदर्भातील गवळावू हा प्रसिद्ध गोवंश. स्वत:ला भगवान कृष्णाचे वंशज, नातलग मानणारे हे नंदा गवळी, गायीच्या दुधापासून लोणकढी तूप तयार करायचे. वऱ्हाड प्रांतातील पौष्टिक गवत व चारा खाऊन निर्माण होणारे दूध अतिशय घट्ट असते, असे येथील गोपालक व अभ्यासक सांगतात. नंदा गवळी समाजाने गवळावू संवर्धनासाठी पैदासकार संघटनेची स्थापना पण केली आहे.
वर्धा येथील गोरसपाक हा खूप प्रसिद्ध आहे. १९३१ मध्ये महात्मा गांधी, विनोबा भावे व जमनालाल बजाज यांनी गोसंवर्धन गोरस भांडार नावाने उद्योग सुरू केला. वर्ध्यातील स्थानिक ग्राहकांना दर्जेदार दूध व दूध उत्पादने मिळावी, हा त्यामागचा उद्देश. दूध, दही, ताक, पेढा यांसोबत गोरसपाक म्हणजे एक प्रकारचे बिस्कीट त्या वेळी तयार केले. त्याची चव दर्जा इतका उत्तम आहे, की वर्ध्याला भेट देणारा गोरसपाक खाल्ल्याशिवाय व घरच्यांसाठी खरेदी केल्याशिवाय परतत नाही, अशी या गोरसपाकाची ख्याती आहे.
कोल्हापुरी चप्पल ही ग्रामीण कृषिवलांची आवडती का आहे? त्यामागे आहे स्थानिक म्हशींचे चामडे. पारंपरिक कारागीर अत्यंत निगुतीने हे कातडे कमवतात. त्यावर प्रक्रिया करतात. परिसरातील स्थानिक कारागीर नाजूक कोल्हापुरी चप्पल पण बनवतात व करकर वाजणारी शाहू महाराजांना आवडणारी रांगडी जड चप्पल पण.
कोल्हापुरी चपलेचा इतिहास खूप जुना आहे. बाराव्या शतकात चालुक्य राजवटीत महामंडलेश्वर बिज्जाला द्वितीय यांनी हा व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन दिले, असे अभ्यासकांचे मत आहे. जुलै २०१९ मध्ये कोल्हापुरी चपलेला भौगोलिक निर्देशांक (GI Tag) मिळाले. पशुआधारित उत्पादनाला अशा प्रकारची ओळख पहिल्यांदाच मिळाली असावी. त्यामुळे या चपलेला स्थानिक व जागतिक बाजारपेठेत स्वत:चे स्थान भक्कम करण्याची संधी मिळाली आहे. तसेच संबंधित कारागिरांना त्याचा योग्य मोबदला पण मिळू शकेल.
दख्खनच्या या भूमीत स्थिरावलेला महत्त्वाचा उद्योग म्हणजे मेंढीच्या लोकरीपासून तयार होणाऱ्या घोंगड्या, जान व वाकळ. सह्याद्रीतील अति पावसाच्या भागात राहणारे आदिवासी पशुपालक-शेतकरी असो की दुष्काळी पट्ट्यात ऐन उन्हात भटकणारे धनगर; यांच्या खांद्यावर वर्षभर घोंगडी किंवा वाकळ दिसणारच. खुटेकर धनगर हा व्यवसाय पिढ्यान् पिढ्या करतात.
नगर जिल्ह्यातील संगमनेर, साकुर, पारनेर, ढोकी, ढवळपुरी या परिसरात घोंगडी मोठ्या प्रमाणात होत असत. सोलापूर, करमाळा, सातारा, फलटण, माण, मिरज, जत आदी भागात पण उत्तम घोंगडी विणकर असल्यामुळे येथील घोंगडी राज्यभर प्रसिद्ध आहे. अति पावसाचा सह्याद्रीचा घाट माथा व कोकणात आजही घोंगडीला मोठी मागणी असते. अनेक लोकगीते, कथा या घोंगडीभोवती गुंफलेल्या आहेत. त्यात अनेक लोकदैवते व पंढरीच्या विठ्ठलाचा उल्लेख मिळतो.
एके काळी ऊर्जित अवस्थेत असलेला घोंगडीचा पारंपरिक व्यवसाय संगमनेर तालुक्यातील खुटेकर धनगर समाजाने सोडला आहे. घोंगडी विणण्याची कला लुप्त झाली, एकत्रित काम करणारे मनुष्यबळ राहिले नाही. तसेच पर्यायी नोकरी, शेती, दूध व्यवसाय व इतर उपजीविकेची साधने उपलब्ध झाल्यामुळे या समाजाला घोंगडी व्यवसायात रस उरलेला नाही.
घोंगड्या मेल्या व धनगर पण मेले, असे नैराश्याचे सूर येथील जुने व्यावसायिक आळवतात. या व्यवसायाकडे सरकार व स्थानिक राजकीय नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यामुळे पण घोंगडी व्यवसाय संपुष्टात आला. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे या छोट्या खेड्यात तीस पेक्षा अधिक कुटुंब या व्यवसायात होते. पारनेर तालुक्यातील ढोकी, ढवळपुरी परिसरात मात्र घोंगडी व्यवसाय खुटेकर धरम कुटुंबीयांनी टिकून ठेवला आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यांतील कारागिरांना नेमून ते व्यवसाय चालवतात. काळ्या व पांढऱ्या रंगाच्या लोकरीपासून दर्जेदार घोंगडी, वाकळ व जान यांचे उत्पादन होते. चिंचोक्याची खळ वापरून घोंगडी, वाकळ विणतात व जान तयार करताना करंज बियांची खळ वापरतात. तीन-साडेतीन महिन्यांच्या मेंढीचे जावळ काढून त्यापासून देवपूजेसाठी लागणारी लक्ष्मी घोंगडी व पवित्र वस्त्र पण तयार करतात.
पांढऱ्या रंगाची उत्पादने स्थानिक दख्खनी मेंढीपासून व काळ्या रंगाची उत्पादने बाळूमामाच्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवतात. शेतकऱ्याला जाडी-भरडी घोंगडी व साहेबाच्या घरात मऊसूत घोंगडी लागते.
राज्यभरात बाळूमामाची सतरा खांडे आहेत. अदमासे एक हजार मेंढ्यांची लोकर स्वखर्चाने आणून खास उत्पादने आम्ही तयार करतो, असे ढोकी येथील व्यावसायिक केशव धरम अभिमानाने सांगतात. संगमनेरी शेळीपालनात बोकडाचे मांस रुचकर असते. त्याला राज्यभर मागणी असते. उस्मानाबादी शेळी व बोकड यांना पण बाजारात चांगली मागणी असल्याने शेतकरी व भटके पशुपालक यांचे पालन करतात.
छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या गोंदिया व गडचिरोली भागात आदिवासी लोक वराह पालन करतात. नागपूरमधील वाल्मीकी समाज शहरी भागात वराह पालन करतो. नागपूरच्या सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव संस्थेने डुक्करपालन व्यवस्था भक्कम करण्यासाठी वराहपालकांची एक सहकारी संस्था स्थापन केली आहे. हा देशातील अभिनव प्रयोग म्हणावा लागेल. राज्यातील इतर भागांत वडार समाज पण वराह पालन करतो.
मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी काठी व इतर जिल्ह्यात गाढव पालन होते. कैकाडी समाज या बहुपयोगी पाळीव प्राण्याचा आजही सांभाळ करतात. भोईर, धोबी, वडार व कुंभार पण गरजेनुसार गाढवे पाळतात.
गाढवांची लहान पिले विकून पण पैसे मिळतात. बिगर खर्ची प्राणी म्हणून गाढवांची ख्याती आहे. उर्वरित महाराष्ट्रात मातीकाम करणाऱ्या कुंभार समाजाकडे व बांधकाम करणाऱ्या बेलदार कारागिरांकडे पूर्वी गाढवे असत, कालौघात ती परंपरा खंडित झाली आहे. ही पण आपल्या राज्यातील महत्त्वाची पशुपालन व्यवस्था आहे, याकडे ना पशुसंवर्धन विभागाचे लक्ष आहे, ना पशुविज्ञान विद्यापीठाचे.
विविध पाळीव प्राणी, संबंधित उत्पादने यांची विक्री विविध बाजार व यात्रांमधून होत असते. त्याचे सामाजिक व आर्थिक दस्तऐवजीकरण होणे गरजेचे आहे. अशा व्यवसायांत काळानुरूप बदल होताहेत. काही जागी ते जैसे थे आहेत अथवा प्रगत पण झाल्याचे दिसते. अनेक व्यवसाय अस्तंगत झाले आहेत. मोठी आर्थिक उलाढाल होत असूनही एक दुर्लक्षित व प्रतिष्ठा नसणारे व्यवसाय म्हणून याकडे आपण सर्वजण पाहतो आहोत, ही शोकांतिका आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.