
Indian Agriculture: मी जनावरांच्या बाजाराचा बारकाईने अभ्यास केलाय. या व्यवसायात हिंदु, मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक आहेत. दोन्हीकडं अपवादात्मक लबाडी करणारी माणसं आहेत. धर्मावरून कोणाला बदमाश म्हणावं अशी अजिबात स्थिती नाही. खाटकाकडील कटईला चाललेली म्हैस कोणी सांभाळायला घेत असेल तर ते हजार-पाचशेचा फायदा घेऊन म्हैस परत देतात, हा माझा नेहमीचा अनुभव आहे.
बाजारात जनावरं विक्रीला आणणारे शेतकरी भाबडे असतात; त्यांची लुबाडणूक, फसवणूक होते हाही गैरसमज आहे. अपवाद सोडला तर शेतकरी हुषार असतात. ते त्यांनी मनोमन केलेल्या किमतीच्या खाली जनावर विकत नाहीत. ज्याला खूपच निकड आहे तोच कमी किमतीत जनावर विकतो. बाजारातील शेतकरी आणि व्यापारी दोघेही अगदी सहजपणे खोटं बोलतात, थापा मारतात.
सतत दहा-बारा वर्षे म्हशीपालनाचा व्यवसाय केल्याचा फायदा म्हणजे आता बाजारातील सगळे दलाल, खाटीक मला चागलं ओळखतात. माझ्यासारखा पांढरपेशा पत्रकार म्हशी सांभाळतो, याचं त्यांना विशेष कौतुक. नमस्ते साब... या शब्दातील त्यांची आपुलकी मला जाणवते. त्यात पुन्हा माझा पेहरावही लक्षवेधी असतो. बाजारात डोक्यावर कॅप, डोळ्याला गॉगल आणि तोंडाला मास्क लावून फिरणारा मी एकटाच असतो. अशोक पाटील या दलाल मित्राच्या सल्ल्यानेच मी म्हशी घेतो.
त्यांचं बाजारातील नाव टेलर आहे. मला म्हशींची बऱ्यापैकी पारख असली तरी दलालाशिवाय म्हशी घेणं शक्य नाही. म्हैस विकणाऱ्या पशुपालकाच्या डोक्यात एक विशिष्ट किंमत असते; पण आधी तो अव्वाच्या सव्वा भाव सांगतो. दलालही त्याच पद्धतीनं कमीत कमी किमतीला म्हैस मागतो. दलाल पशुपालकाच्या हातात रूपया देतो. बोलाचाली सुरू होते. मी आपला निवांत हे बघत थांबतो.
हजार-दोन हजारांच्या फरकावर बोली आली, की टेलर मला विचारतात, ‘‘कसं करायचं सर, घ्यायची की सोडायची?’’ मी घ्यायची म्हटलं, की हजार- पाचशेवर सौदा होतो. पशुपालकाला शंभराची नोट दिली, की सौदा पक्का. त्याला मी माझ्या नावाची चिठ्ठी दिली, की तो ग्रामपंचायतीत जाऊन या नावाने जनावराचा दाखला बनवून आणतो. एखादी वगार आवडली तर टेलरच्या अपेक्षेपेक्षा हजार-दोन हजार रुपये जास्त देऊनही मी म्हैस घेतो. कधीकधी ही घासाघासी ऐकणं नकोसं वाटलं, की मी बाजारात चक्कर मारून येतो.
बाजारात फसवणूक अशी होत नाही. पण क्वचितच कोणी खरं बोलतं. अगदी सहजतेनं खोटं बोललं जातं. देहबोलीवरून मला त्याचा अंदाज येतो. ज्या दलालाच्या हातावर म्हशीचा सौदा पक्का होतो, त्या दलालाला मालक आणि ग्राहक अशा दोघांनीही २०० रुपये दलाली द्यायची असते. तर बैलांसाठी ही दलाली प्रत्येकी ४०० रुपये आहे. दलालांच्या संभाषणकौशल्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. अनेकदा त्यांचं बोलणं ऐकून मला हसू आवरत नाही. ते कोणाही एकाची बाजू न घेता त्या बाजाराच्या कलाप्रमाणं जनावराची योग्य किंमत करतात. मात्र सगळेच दलाल विश्वासार्ह आहेत, असं नाही. कोणता दलाल कसा आहे, ते आपल्यालाच तपासून बघावं लागतं.
बाजारातील शेतकरी आणि व्यापारी दोघेही अगदी सहजपणे खोटं बोलतात. हाल्या लावून दीड महिना झाला बघा, दोन महिने झाले भरवून, पंधरा दिवसाखालीच वाडीचा हाल्या लावलाव... या सगळ्या थापा ऐकाव्या लागतात. साधारण अडीच महिन्यांनंतर म्हैस गाभण आहे की नाही, हे तपासून सांगता येते. एखादा शेतकरी तीन महिने झालेत असं म्हणाला तर तपासूनच किंमत करू असं मी सांगतो. एकदा जांबच्या बाजारात साडेतीन महिन्यांच्या गाभण म्हशीचा सौदा केला. तपासून गाभण निघाली तरच सौदा पक्का असं सांगितलं.
ती म्हैस खाली निघाली. दुधाबाबतही असेच खोटे दावे केले जातात. चार लिटर मोजून घ्या, तीन लिटरला एक थेंब कमी देत नाही, लईच खात्रीची हाय... वगैरे ठोकून देतात. म्हशीच्या कास आणि स्तनावरून ती किती दूध देऊ शकेल याचा अनुभवी माणसाला अंदाज येऊ शकतो. म्हशीच्या स्वभावाविषयीही असंच बोलतात. ‘म्हशीखालून लेकरू गेलं तरी पाय उचलत नाही’ असं वर्णन केलेली म्हैस हातात टिकूर घेतल्याशिवाय मला जवळ येऊ देत नाही. बाजाराची ही लबाडीची भाषा बाजारात नेहमी येणाऱ्या माझ्या सारख्यांना चांगली परिचित झालीय.
म्हशींच्या बाजारात जे चित्र आहे तसंच चित्र बैलांच्या बाजारात असतं. जिथं परिचयातले लोक असतात तिथंच बैलाचे बरे-वाईट गुण सांगतात. खरं म्हणजे विकणाऱ्याला आपलं जनावर काही करून विकायचं असतं. बैल मारका आहे, असं सांगितलं तर त्याला कोण विकत घेईल? मात्र बैल कामासाठी योग्य आहे की नाही हे बघण्याची सोय असते. बाजाराच्या बाजूलाच मोकळ्या रानात औत जोडून ठेवलेले असतात. ज्यांना कामासाठी खात्रीचे बैल हवे असतात, ते शेतकरी बैलांना प्रत्यक्ष औतांना जोडून त्याचं काम पाहतात. बैल चांगले चालतात असं वाटलं तरच खरेदी करतात. मात्र असे चौकस शेतकरी कमीच असतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.