Livestock Market : खानदेशचा पशुधन बाजार: निमारी, माळवी जातींचा ऐतिहासिक ठेवा

Indigenous Cow Conservation : खानदेशात निमारी, माळवी आदी जातींच्या पशुधनाचे शेतीत मोठे महत्त्व आहे. येथील सातपुडा पर्वतरांगा, नर्मदा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे देशी पशुधनाचे जतन केले आहे.
Indigenous Cow
Indigenous Cow Agrowon
Published on
Updated on

Khandesh Livestock Market : खानदेशात निमारी, डांगी, गीर यासोबत स्थानिक देशी पशुधनाचेही मोठे महत्त्व आहे. जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांतील गावे सातपुडा पर्वतरांगांना जोडली आहेत. मध्य प्रदेशातील सीमाभागातील अलिराजपूर, बडवानी, खरगोन आणि बऱ्हाणपूर हे जिल्हे या पर्वतालगत आहेत. याच डोंगरांगांमधील शेतकऱ्यांनी निमारी जातीचे पूर्वापार जतन केले आहे. त्याच्या उमद्या, देखण्या बैलांना मोठी मागणी असते.

सावद्याची मोठी परंपरा

सावदा हे ठिकाण रावेर व यावल तालुक्यांच्या सीमेवर व मध्य प्रदेशातील खरगोन, बऱ्हाणपूरपासून जवळ आहे. यामुळेच की काय सावदा येथे दर रविवारी निमारी बैलांचा बाजार भरतो. जाणकारांच्या सांगण्यानुसार १९५५-५६ पासून त्याची परंपरा आहे. सन १९५८ मध्ये तो रावेर बाजार समितीच्या अंतर्गत आला.

खिर्डी खुर्द (ता. रावेर) येथील चांगो गणपत चौधरी बाजार समितीचे प्रथम अध्यक्ष आणि निंबोल (ता. रावेर) येथील राजाराम तोताराम पाटील उपाध्यक्ष होते. सद्यःस्थितीत सावदा बाजार समितीच्या उपबाजार आवारात बाजार भरतो. सावदा ही रावेरची आर्थिक राजधानीच मानली जाते.

Indigenous Cow
Indigenous Cow : देशी गोवंश संवर्धनाचा आदर्श सांगणारे माळसोन्ना

सावदा बाजार- ठळक बाबी

  • निमारी बैलजोड्यांची प्राधान्याने विक्री- खरेदी. गायींची आवक नगण्य.

  • मार्च- एप्रिल काळात आवक अल्प. या काळात दर रविवारी ५५ ते ६० बैलजोड्या, तर ४० ते ४५ म्हशींची आवक.

  • मे ते जुलै काळात बैलांची आवक अधिक. दर रविवारी ११० ते १२० बैलजोड्या.

  • दिवाळीनंतर (नोव्हेंबर- जानेवारी) दर रविवारी सरासरी ९० ते ९५ बैलजोड्या. उत्तर प्रदेशातील व्यापारीही म्हशी घेऊन येतात.

  • प्रति रविवार मार्च- एप्रिल काळात उलाढाल ६० ते ७५ लाख. मे ते जुलै काळात ८० लाखांपर्यंत तर नोव्हेंबर- जानेवारी काळात ६० लाखांपर्यंत.

अन्य बाजारांतील स्थिती

माळवी, निमारी बैलांना मोठी मागणी रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात असते. हा भाग सातपुड्यालगत असल्याने या भागात निमारी बैल अधिक वापरात आणले जातात. चोपडा शहर सातपुड्यालगत आहे. येथील दर रविवारच्या बाजारात राजस्थान, मध्य प्रदेशातील माळवी बैल, मध्य प्रदेशातील मुरैना, भिंड, आग्रा (उत्तर प्रदेश) भागातील मुऱ्हा व देशी म्हशींचीही विक्री होते.

सातपुड्यातील देशी पशुधनही असते. दर रविवारी ६० ते ८० लाखांची उलाढाल होते. खरिपाच्या अनुषंगाने मे- जून काळात उलाढाल अधिक असते. थारगुंडी व सोनखेरी हे तापी नदीलगतचे गोवंश जवळपास लुप्त झाले आहेत.

खानदेशातील पश्‍चिम पट्ट्यातील सोनखेरी जात काही प्रमाणात दिसते. परंतु त्यांचा बाजार आता दिसेनासा आहे. त्यांचे सर्वेक्षण, संवर्धन यासंबंधीचे काम अनेक वर्षे झाले नसल्याने त्यासंबंधीच्या नोंदी बाजार समित्या, पशुसंवर्धन विभागाकडे नसल्याची स्थिती आहे.

वरखेडीत मोठी उलाढाल

  • गायी-बैलांसह शेळ्या, म्हशींसाठी पाचोऱ्यातील वरखेडी (जि. जळगाव) बाजार प्रसिद्ध.

  • १९६० पासून त्यास परंपरा. पाचोरा बाजार समिती अंतर्गत या बाजारात खानदेशातील गावरान, खिलार पशुधन येते विक्रीस.

  • बैलजोड्यांसाठी विशेष प्रसिद्ध. दर गुरुवारी भरतो.

  • छत्रपती संभाजीनगरसह चाळीसगाव, जळगाव, जामनेर, भुसावळ, भडगाव आदी भागांतील शेतकरी येतात. एक कोटींवर उलाढाल (दर गुरुवारी).

Indigenous Cow
Indigenous Cow: सेंद्रिय, नैसर्गिक शेतीला देशी गोवंशाची साथ

निमारी गोवंशाची वैशिष्ट्ये

  • मध्य प्रदेशातील खरगोन व बडवानी हे जिल्हे निमारी पशुधनाचे आगार. सातपुड्यातील पर्वत रांगा, नर्मदा काठावरील खरगोन जिल्ह्यात गावोगावी निमारी पशुधन संगोपन व विक्री करणारे शेतकरी. काही त्यांचे प्रजनन केंद्रही चालवितात.

  • मध्य प्रदेशातील निमार भागात हे पशुधन अधिक असल्याने त्यावरून नामकरण. नर्मदा नदीकाठी खरगोन जिल्ह्यातही असल्याने खरगोनी असेही संबोधतात. महाराष्ट्रातही ते आढळते.

  • दुधासाठी कमी व शेतीकामांसाठी अधिक उपयोगात.

  • बैलजोडी अधिक कार्यक्षम. १६ ते १८ वर्षे कार्यरत राहू शकते.

  • कातडी लाल, हलकी पांढरी. त्यावर पांढरे ठिपके. शरीर मध्यम ते मोठे. कपाळ फुगीर.

  • शिंगे लहान, गोलाकार. गीर व खिलार या जातीचा मिश्र प्रकार म्हणजेच निमारी असेही म्हटले जाते.

  • खडकाळ भागासाठी अत्यंत काटक. वाहतूक व शेतीत मोठा उपयोग.

माळवी गोवंशाची वैशिष्ट्ये

  • मध्य प्रदेशातील मालवा क्षेत्र म्हणजेच खरगोन, नर्मदाकाठाच्या भागातील जात.

  • अधिक पाऊसमान, काळ्या कसदार, मऊ, मध्यम जमिनीत अनुकूल. कमी आर्द्रतेच्या भागातही टिकून राहते. मुबलक प्रमाणात दूध देणारी गाय उत्पादित करणेही शक्य.

  • शिंगे व खूर कमी टणक. पत्र्याची नाल खुरांना लावण्याची आवश्यकता. चिखलाच्या, काळ्या कसदार मातीत अवजड कामे सहज पार पाडतात.

  • दर १४ ते १५ महिन्याला एक वेत देते.

  • रंग पांढरा, शुभ्र, हलका राखाडी. गायीची उंची कमाल पाच ते साडेपाच पाच फूट. (वशिंडापर्यंत)शिंगे मध्यम व गोलाकार. नागपुड्या काळ्या, कपाळ सपाट, कान आतून पिवळे, शेपटीचा गोंडा काळा किंवा हलका पांढरा.

धान्यासह पशुधनासाठी विशेषतः उमद्या बैलांसाठी चोपड्याचा बाजार प्रसिद्ध आहे. त्यातून बाजार समितीस चांगले शुल्क मिळते.
- नरेंद्र पाटील, ८९७५०१६९९९, सभापती, बाजार समिती, चोपडा
वरखेडीचा पशुधन बाजार खानदेशात प्रसिद्ध आहे. येथे १० रुपयांत शेतकऱ्यांना जेवण पुरवण्यात येते. परिसरासह मराठवाड्यातील सोयगाव, सिल्लोड, कन्नड, घाट भागातील शेतकरी, व्यापारीही येथे येतात.
- गणेश पाटील- ९८६०५१७०६९, सभापती, बाजार समिती, पाचोरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com