Animal Fodder
Animal FodderAgrowon

Animal Fodder : निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे तंत्र

Animal Husbandry : सुक्या चा‌‌ऱ्यामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते, कर्बोदकांचे प्रमाण नगण्य असते, तसेच प्रथिने अत्यल्प असतात, त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. हे लक्षात घेऊन सुक्या निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यात वापरला तर अनुकूल परिणाम दूध उत्पादन आणि वाढीवर होतो.

डॉ. अजित पाटील, डॉ. जी. एम. गादेगावकर

Techniques to increase the nutritional value : जनावरांचे उत्तम आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या आवश्यक पोषक घटकांचा प्रमुख स्रोत हिरवा चारा आणि पशुखाद्य हे आहेत. हिरवा चारा टंचाईमुळे जनावरांना वाळलेला चारा द्यावा लागतो. कोरडा चारा म्हणून कडबा, मका, गव्हाचे काड, भात काड, सुकलेले गवत, सोयाबीन कुटार, बाजरीचे सरमाड इत्यादी घटकांचा वापर होतो. परंतु या चाऱ्यांची सकसता कमी असते, यातून पचनीय घटक कमी मिळतात.

सुक्या चा‌‌ऱ्यामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते, कर्बोदकांचे प्रमाण नगण्य असते, तसेच प्रथिने अत्यल्प असतात, त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. अशा प्रकारचा चारा खाऊ घातल्यामुळे जनावरांना पोट भरल्याचे समाधान सोडल्यास कोणतेही अन्नघटक मिळत नाही.

सतत सुका चारा खाऊ घातल्यामुळे खनिज द्रव्ये, प्रथिने आणि कर्बोदकांची कमतरता निर्माण होऊन जनावरांना शारीरिक आजार होण्याचे शक्यता असते. सुक्या चा‌‌ऱ्यामध्ये प्रथिने कमी असल्यामुळे जनावर ढेरपोटे (जलोदर) दिसते. अशा सुक्या निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यात वापरला, तर त्याचा अनुकूल परिणाम दूध उत्पादन आणि जनावरांच्या वाढीवर होतो.

सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्याची उद्दिष्टे

चारा निकृष्ट दर्जाचा असतो. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते, ही प्रथिने पचण्यास कठीण असतात.

तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. तंतुमय पदार्थामध्ये लिग्निन घटक जास्त असल्यामुळे असा चारा पचण्यास कठीण असतो.

चाऱ्यामध्ये ऑक्झालेटसारखे घटक असतात, ते क्षार शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात.

अन्न घटकांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर व वजनावर विपरीत परिणाम होतो.

Animal Fodder
Animal Care : कॅल्शिअम कमतरतेचे जनावरावर होणारे परिणाम

निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाय

चाऱ्याची कुट्टी

चारा कुट्टी न करता दिल्यास जनावरे केवळ सुकी पाने, नरम भाग खाऊन खोडाचा भाग तसाच ठेवतात. त्यामुळे चाऱ्याची नासाडी होते.

सुका चारा कुट्टी न करता दिल्यास नासाडीचे प्रमाण ३० टक्के असते. चुका चारा कुट्टी करून दिल्यावर नासाडी फक्त ५ टक्के एवढी होते.

कुट्टी केल्यामुळे चारा चावण्यासाठी लागणारी ऊर्जेची बचत होते. चाऱ्याची पाचकता वाढते. कमी जागेत जास्त चारा साठवता येतो, कमी चाऱ्यामध्ये जनावरांचे संगोपन करता येते.

निकृष्ट चारा कुट्टी करून काही प्रमाणात उपलब्ध चांगल्या चाऱ्यासोबत मिसळून वापरता येतो.

कुट्टी केलेला चारा जनावरांच्या खुराकात देखील योग्य प्रमाणात मिसळून संपूर्ण आहार म्हणून देता येतो. असे दिल्यास चाऱ्याच्या पाचकतेवर अनुकूल परिणाम दिसतो. दूध उत्पादनामध्ये वाढ दिसते.

निकृष्ट प्रतीचा सुका चारा पाण्यात भिजवून देणे

निकृष्ट प्रतीचा सुका चारा जनावरांना खायला रुचकर वाटत नाही. त्यामुळे हा चारा जनावर अधिक प्रमाणात खात नाहीत.

चाऱ्याचे १ ते २ सेंमीचे तुकडे करून

५ ते ६ तास भिजत ठेवावेत.

त्यानंतर हा चारा खायला दिला तर तो अधिक प्रमाणात खातात. निकृष्ट चाऱ्यातील अपायकारक घटक ऑक्झालेटचे प्रमाण कमी होऊन कॅल्शिअमची उपलब्धता वाढण्यास मदत होते.

गूळ आणि मीठ प्रक्रिया

१०० किलो सुक्या चाऱ्यासाठी १ किलो गूळ आणि १ किलो मीठ प्रति २० ते २५ लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण सम प्रमाणात फवारावे.

हा चारा १२ ते २४ तास झाकून ठेवावा. त्यानंतर जनावरांना द्यावा. या प्रक्रियेमुळे चारा मऊ होतो, चव वाढल्यामुळे हा चारा जनावरे आवडीने खातात.

Animal Fodder
Animal Fodder : पाण्याअभावी ओला चारा वाढलाच नाही, जनावरांच्या ओल्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण

निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया

कुट्टी केलेला चारा सावलीत पसरावा.

१०० किलो चाऱ्यासाठी ४ किलो युरिया वापरावा. प्रक्रियेसाठी ४ किलो युरिया ४० लिटर पाण्यामध्ये विरघळून घ्यावा. हे द्रावण सम प्रमाणात १०० किलो कुट्टीवर शिंपडावे. चारा हलवून एकजीव करून घ्यावा. अशाप्रकारे एकावर एक थर देऊन त्यात युरिया मिश्रण मिसळून घ्यावे‌.

प्रत्येक थरात युरिया मिश्रण मिसळून घेतल्यावर चाऱ्यावर दाब देऊन चाऱ्यातील जास्तीची हवा काढून घ्यावी.

संपूर्ण चारा जाड प्लास्टिक कागदाने झाकून घ्यावा. जेणेकरून बाहेरील हवा व पाणी आत जाणार नाहीत.

२१ दिवस हा चारा हवा बंद ठेवावा कारण यावर व्यवस्थित युरिया प्रक्रिया होते. २१ दिवसांनंतर हा चारा उघडावा. आवश्यक तेवढा चारा बाहेर काढावा. २ ते ३ तास पसरून उघडा ठेवावा, जेणेकरून त्यातील अमोनिया वायू निघून जाईल. त्यानंतर तो खायला द्यावा.

शक्य असल्यास चाऱ्यावर गुळाचे पाणी शिंपडावे. त्यामुळे त्याची उपयुक्तता वाढते, तो रुचकर होतो.

चारा देताना काळजी

चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करताना पशू तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

प्रक्रिया केलेली कुट्टी सहा महिन्यांखालील वासरांना, करडांच्या आहारात देऊ नये.

प्रक्रिया केलेला चारा गाभण, आजारी जनावरे, पोटाचे विकार चालू आहेत अशांना देऊ नये.

प्रक्रियायुक्त चाऱ्याचा समावेश जनावरांच्या आहारात एकदम करू नये. या चाऱ्याचा समावेश हळूहळू वाढवत न्यावा, जेणेकरून जनावरांच्या पोटातील जिवाणू त्याचा व्यवस्थितरीत्या वापर करू शकतील.

प्रक्रियायुक्त चारा देत असताना जनावरांना मुबलक प्रमाणात पिण्याची पाण्याची सोय करावी.

प्रक्रियेचे फायदे

सुक्या चाऱ्याची पाचकता वाढते.

सुक्या चाऱ्यातील नत्राचे म्हणजे प्रथिनांचे प्रमाण वाढते.

चाऱ्यातील नको असलेले अपायकारक घटक जसे की ऑक्झालेट काढून टाकले जातात.

जनावरांचे वजन वाढते. दूध उत्पादनात वाढ दिसून येते.

डॉ. जी. एम. गादेगावकर, ९८६९१५८७६०, डॉ. अजित पाटील, ९२८४९५१५७१, (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com