डॉ. रविंद्र जाधव, डॉ. संभाजी चव्हाण
Animal Disease : म्हशींच्या आहारात स्फुरद खनिजाची कमतरता आणि दुभत्या तसेच शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये स्फुरद खनिजाची तुलनेने वाढलेली गरज हे लालमूत्र आजाराचे प्रमुख कारण आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने चाऱ्यातील स्फुरदचे प्रमाण कमी होत आहे.
त्यामुळे उत्पादक म्हशींना आवश्यक मात्रेमध्ये स्फुरद उपलब्ध न झाल्याने लाल मूत्र आजार दिसत आहे. हे लक्षात घेऊन म्हशींना संतुलित आहार आणि खनिज मिश्रणांचा पुरवठा करावा.
यंदा कमी पर्जन्यमान राहिल्याने सद्यपरस्थितीत दुष्काळबाधित क्षेत्रात चाऱ्याचे दुर्भिक्ष आढळून येत आहे. त्यामुळे बहुतांश पशुपालक दुधाळ जनावरांचा वाळलेला चारा, असेल तर थोडा-फार हिरवा चारा आणि कमी मात्रेत खुराक देत आहेत. या परिस्थितीमुळे सध्या दुधाळ तसेच गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या म्हशींमध्ये स्फुरद कमतरतेमुळे लाल मूत्र आजार दिसून येत आहे. हा आजार टाळण्यासाठी आहारविषयक बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
म्हशींमध्ये लालमूत्र (पोस्ट पार्च्यूरियंट हिमोग्लोबिनयुरिया) हा उत्पादकतेशी निगडीत आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आजार आहे. आजाराने बाधित म्हशींमध्ये शरीरातील स्फुरदचे प्रमाण कमी होवून रक्तातील लाल पेशी फुटतात. या लाल पेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश होवून म्हशींमध्ये रक्तक्षय होतो.
हा आजार प्रामुख्याने जास्त दुग्धउत्पादन देणाऱ्या म्हशींमध्ये आढळून येतो. यामुळे बाधित म्हशींचे दूध उत्पादन घटते, उपचारावर मोठा खर्च करावा लागतो. वेळेवर उपचार न केल्यास म्हैस दगावू शकते.
हा आजार प्रामुख्याने शरीरातील स्फुरदचे प्रमाण कमी झाल्यानंतर उद्भवतो. दुधाळ म्हशींच्या आहारात स्फुरदची कमतरता असेल तर ही गरज आहारातून पूर्ण होत नाही. अशा म्हशी आजारास बळी पडतात.
गाभणकाळातील शेवटचे ३ महिने किंवा विल्यानंतर पहिले १ ते ३ महिने या कालावधीमध्ये या आजाराचे जास्त प्रमाण आढळून येते.
म्हशींच्या आहारात स्फुरद खनिजाची कमतरता आणि दुभत्या तसेच शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये स्फुरद खनिजाची तुलनेने वाढलेली गरज हे आजाराचे प्रमुख कारण आहे.
महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील जमिनीमध्ये स्फुरदचे प्रमाण कमी असून, अशा जमिनीमधील गवत किंवा चारावार्गीय पिकांमध्ये स्फुरदचे प्रमाण कमी असते. हे स्फुरदचे प्रमाण पर्जन्यमान कमी झाल्यास अजून कमी होवून म्हशी या आजारास बळी पडण्याचे प्रमाण वाढू शकते. वाळलेल्या चाऱ्यामध्ये स्फुरदचे प्रमाण अत्यंत कमी असते. हिरवा चारा आणि खुराकमधील स्फुरदचे प्रमाण हे वाळलेल्या चाऱ्यातील स्फुरदच्या तुलनेत अनुक्रमे २ ते ३ आणि ४ पटीने जास्त असते.
हा आजार प्रामुख्याने अशा म्हशींमध्ये आढळून येतो की, ज्यांच्या आहारात फक्त वाळलेला चारा ज्यामध्ये स्फुरदाचे प्रमाण अगदी नगण्य असते. वाळलेल्या चाऱ्याबरोबर अत्यंत कमी प्रमाणात हिरवा चारा व खुराक दिला जातो. शेवटच्या टप्प्यातील गाभण आणि नवीन व्यायलेल्या म्हशींच्या आहारात जास्त काळ वाळलेला चारा दिल्यास किंवा आहारात खुराक आणि हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास किंवा आहारात या घटकांचा समावेश नसल्यास व नियमित खनिज क्षार मिश्रण आहारात नसल्यास जास्त दुध देणाऱ्या म्हशींमध्ये आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
आजाराची लक्षणे
आजाराने बाधित म्हशींमध्ये लाल, कॉफीच्या रंगाची लघवी होते.
म्हशी शेण टाकताना कुथतात.
खाणे,पिणे मंदावते, वजन घटते, अशक्तपणा वाढून जनावर मलूल बनते.
दूध उत्पादन घटते.
शरीराचे तापमान जरी सर्वसाधारण असले तरी नाडी आणि श्वसनाचा वेग वाढतो.
तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होतो (डोळ्यातील श्लेश्ल्म्लपटल पांढरे किंवा कावीळ झाल्यास पिवळसर पडतात)
बाधित म्हशींवर उपचार केला नाही तर तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होवून ४ ते ५ दिवसात बाधित म्हशी दगावण्याची शक्यता असते.
आजाराचे निदान
आजार प्रामुख्याने नव्याने व्यायलेल्या किंवा गाभणकाळाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या म्हशींमध्ये डिसेंबर ते जुलै दरम्यान आढळून येतो. दुष्काळी परिस्थितीतहि या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
आजाराचे प्राथमिक निदान लालसर किंवा कॉफी सारख्या रंगाची लघवी होणे, कुंथुन शेण टाकणे आणि अशक्तपणा यासारख्या लक्षणावरून करता येते.
रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासून रक्तामधील स्फुरदचे प्रमाण कमी (४ ग्रॅम प्रति १०० मिलि रक्तापेक्षा कमी) झाल्यास आजाराचे निदान करता येते.
औषधोपचार
आजाराचे तत्काळ निदान करून पशुवैद्यकांकडून योग्य आणि आवश्यक उपचार करून घेतल्यास बाधित म्हशी या आजारापासून वाचवता येतात.
आजाराची जास्त तीव्रता होवून रक्तातील हिमोग्लोबिन ५ ग्रॅमच्या खाली गेल्यास बाधित म्हशींमध्ये रक्त संक्रमण करावे लागते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
चांगली दुग्धउत्पादकता असलेल्या म्हशींच्या आहारातील स्फुरद खनिजाचे व्यवस्थित नियोजन केल्यास या आजाराला आळा घालता येवू शकतो.
गाभण व दुभत्या म्हशींच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन करून पुरेशा प्रमाणात स्फुरद आहारात उपलब्ध करून दिल्यास गर्भात वाढणारे रेडकू किंवा दुधनिर्मितीसाठी लागणाऱ्या स्फुरद खनिजाची गरज भरून निघते.
आहारातील शुष्क पदार्थांच्या तुलनेत ०.३२ ते ०.३६ टक्के स्फुरद आहारात दिल्यास म्हशींमध्ये स्फुरद कमतरता टाळता येते. एक लिटर दूध उत्पादनासाठी ०.९ ग्रॅम स्फुरदची गरज असते. सर्वसाधारणपणे प्रौढ ४०० किलो वजनाच्या म्हशीच्या आहारामध्ये १२ ते १३ ग्रॅम अतिरिक्त स्फुरद देणे गरजेचे असते.
हिरव्या चाऱ्यामध्ये स्फुरदचे प्रमाण ०.२ टक्के आणि खुराकमध्ये ०.४ ते ०.६ टक्के असते. वाळलेल्या चाऱ्यामध्ये हे प्रमाण अगदी नगण्य असते. म्हणून हा आजार टाळण्यासाठी म्हशींच्या आहारामध्ये हिरवा चारा आणि खुराक नियमित देण्यात यावा.
दुधाळ म्हशींना संतुलित आहाराबरोबर नियमित ५० ग्रॅम खनिज क्षार मिश्रण पुरवठा केल्यास स्फुरद खनिजाची गरज पूर्ण होते. हा आजार पूर्णपणे टाळता येतो.
गरजेप्रमाणे संवेदनशील कालावधीमध्ये आहारात अतिरिक्त स्फुरद खनिजाचा समावेश करावा.
- डॉ.रविंद्र जाधव, ९४०४२७३७४३, (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,उदगीर,जि.लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.