
डॉ. संघरत्न बहिरे
Goat Rearing : शेळीपालनाच्या यशस्वी मॉडेलमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारले आहे. शेतकऱ्यांनी या योजनेद्वारे आर्थिक स्थिरता मिळवली असून, महिलांनी देखील शेळीपालनात सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात शेळीपालनाला नवी दिशा मिळत आहे.
शेळीपालन हा एक पूरक व्यवसाय आहे. विशेषतः पावसाळी क्षेत्रांमध्ये, जेथे पिकांची उत्पादकता अनिश्चित असते, मोठ्या रवंथ करणाऱ्या पशूंचे पालन करणे किचकट होऊ शकते, अशा परिस्थितीत शेळीपालन महत्त्वाचे ठरते. भारतात ३७ मान्यताप्राप्त शेळी जाती आहेत. यामध्ये महाराष्ट्रात उस्मानाबादी, सांगमनेरी, बेरारी आणि कोकण कन्याळ या चार प्रमुख जाती आहेत.
यातील उस्मानाबादी शेळी मराठवाड्यातील द्वितीयक उद्देशाने सांभाळली जाणारी जात आहे, ही जात जुळ्या जन्मदरामुळे प्रसिद्ध आहे. लहान स्तरावर पशूपालन, विशेषतः शेळी हे आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण गरिबांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे, भूमिहीन मजूर, सीमांत शेतकरी आणि लहान शेतकऱ्यांना शेळीपालनाने आर्थिक आधार दिला आहे. शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी शेळ्यांचे काटेकोर व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
भारतीय पशू संशोधन संस्थेच्या प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्राने तयार केलेले आधुनिक शेळीपालन मॉडेल महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीपणे राबवले जात आहे. या उपक्रमाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
त्रंबकेश्वर तालुका (जि.नाशिक) आणि आंबेगाव तालुक्यातील (जि.पुणे) १०५ शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती आणि पशुधन उत्पादन प्रणालीचे मूल्यांकन करणारे एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर, शेतकऱ्यांना शेळीपालनाद्वारे जीवनमान सुधारणेबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
शेळीपालन मॉडेलचा अभ्यास
संस्थेने विकसित केलेल्या मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये एका नर आणि चार मादींचा समावेश आहे. सर्व शेळ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना विमा संरक्षण देण्यात आले.
शेळीच्या योग्य देखभालीसाठी शेतकऱ्यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याशिवाय २०० किलो पॅलेटेड खाद्य, खनिज मिश्रण, पाणी व खाद्य देणारे उपकरण आणि कमी खर्चात निवारा तयार करण्यासाठी साहित्य देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना स्थानिक साहित्य वापरून निवाऱ्यांचे नूतनीकरण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. चारा व्यवस्थापन, नियमित लसीकरण आणि औषधोपचाराच्या सुविधा पुरवण्यात आल्या. शेळ्यांना अर्ध-बंदिस्त पद्धतीने सांभाळले गेले, ज्यामुळे उत्पादन क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली.
प्रत्येक शेतकऱ्याकडे नियमितपणे तपासणीसाठी भेटी दिल्या जातात, ज्यामुळे शेळ्यांची आरोग्य स्थिती तपासली जाते, संपूर्ण आरोग्य व्यवस्थापनात जंतनिर्मूलन,पीपीआर नियंत्रणासाठी लसीकरण, तसेच खनिज आणि जीवनसत्त्वांचे मिश्रण दिले जाते.
शेतकऱ्यांनी करडाच्या जन्माचे वजन, दुधाचे उत्पादन, जन्मदर आणि मृत्यू दर याची संपूर्ण माहिती संकलित केली आहे. शेतकऱ्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबादी शेळ्यांची सरासरी वजन २५.२१६ किलो (मादी) मिळाले. करडांचा जन्मदर आणि वाढ चांगली झाली. यामध्ये ७.४१ टक्के तिळे, ६२.९६ टक्के जुळी आणि २९.६३ टक्के एकल करडांना शेळांनी जन्म दिला.
करडाचे सरासरी जन्म वजन २.५८ किलो आणि सरासरी दैनंदिन वजनवाढ १०८.४५ ग्रॅम नोंद झाली. दैनंदिन दूध उत्पादन ४७५.६० मिलि आहे, ज्याचा उपयोग घरगुती वापरासाठी केला जातो. प्रकल्पाच्या सुरुवातीला, ७.८० टक्के मृत्यू दर आहे. प्रामुख्याने पीपीआर न्यूमोनिया, एंटराइटिस आणि गर्भपात यामुळे मृत्यू झाला आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ झाली आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला सरासरी उत्पन्न २५,००० रुपये होते, जे प्रकल्प कालावधीत दुप्पट झाले आहे. मॉडेलमधील व्यवस्थापनामुळे शेळ्यांचा उच्च जुळ्यांचा जन्म दर (६३ टक्के) आणि कमी मृत्यूदर (७.८ टक्के) यासह वाढीमध्ये चांगला फायदा झाला. महिला शेतकऱ्यांचा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता, ज्यामुळे ग्रामीण महिला सक्षमीकरणालाही चालना मिळाली आहे.
- डॉ.संघरत्न बहिरे, ९४१४८८२८६९
(शास्त्रज्ञ (पशू जीवशास्त्र), विभागीय केंद्र, भारतीय पशू चिकित्सा संशोधन संस्था, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.