
Animal Care : मुरूड (ता. लातूर) येथील भोकुडसुंबा शिवारात साजिद राजमहमद सय्यद यांच्या कुटुंबीयांकडे एकूण २० एकर शेती आहे. पूर्वी ते सर्वच शेतीमध्ये हंगामी पारंपरिक पिके घेत असत. सोबतच सय्यद कुटुंबांचा मुरूड बसस्थानक परिसरात पान विक्रीचा मूळ व्यवसायही आहे.
शेतीतील उत्पन्नाला जोड म्हणून साजिद सय्यद यांनी २०१५ मध्ये शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. आपल्या लातूर ते बार्शी रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावरील साडेतीन एकर शेतीमध्ये २५ शेळ्यांसह फिरता शेळीपालन सुरू केले.
मात्र रोग व अन्य कारणांमुळे शेळ्या मरतूक वाढली. पहिल्याच वर्षात शेळीची ३६ पिले मरण पावली. मग सर्व शेळ्या विकून टाकल्या. योग्य माहिती व प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या नेमक्या काय चुका झाल्या, याचा अंदाज आला. अभ्यासानंतर बंदिस्त शेळीपालनाचा मार्ग निवडला.
चाऱ्यासाठी सुबाभूळ कल्पवृक्षच
शेती व्यवसायाला जोड म्हणून पूरक व्यवसाय केले जात असले तरी त्यालाही नैसर्गिक दुष्टचक्राचा फटका बसत असतो. बंदिस्त शेळीपालन करताना सातत्याने येणारे दुष्काळ हे परीक्षा बघणारे ठरतात. कारण शेळी ही बारा वनस्पतींचा हिरवा पाला खाऊन जगणारा पशू आहे. बंदिस्त शेळीपालनासाठी शाश्वत चारा उपलब्धता महत्त्वाची असल्याचे लक्षात आले.
त्यासाठी अगदी दुष्काळी स्थितीत वाढणाऱ्या आणि तग धरणाऱ्या सुबाभुळीची एक एकरमध्ये लागवड केली. दोन एकर शेती आणि त्याच्या बांधावर तीन प्रकारची तुती, हागा, घास, दशरथ घास अशा वनस्पती चाऱ्याची लागवड केली.
त्याला पूरक म्हणून कडूलिंब, वड, बोर, चिंच, उंबर, आंबा, पेरू, नांद्रुक, शेवगा, बदाम, नारळ, केळी या सारख्या बारा प्रकारच्या वनस्पतींची पानेही शेळ्यांना दिली जातात. सुबाभुळीला पाण्याची फारशी गरज नसली तरी अधिक चारा मिळण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा पाणी दिले जाते. त्याला नांगरण, पाळी, खूरपण यांची फारशी गरज नसते.
खतेही द्यायची गरज नाही. कमी खर्चामध्ये तोडणीनंतर ४५ दिवसात बारा फूट उंचीपर्यंत चारा वाढतो. बहुतांश चारा पिके ही बहुवार्षिक असल्याने दरवर्षी लागवडीचा खर्च होत नाही. त्यातच सुबाभूळ ही चाऱ्यासाठी बहुगुणी असा कल्पवृक्ष असल्याचेही साजिद सांगतात. विहिर, बोअर व तेरा लाख लीटर क्षमतेचे शेततळे असल्याने पाण्याची कमतरता भासत नाही.
चारा व्यवस्थापन
शेळ्यांना झाडावरील पाला खाण्यास आवडते. त्यामुळे सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता ओल्या फांद्या शेळ्यांच्या तोंडापर्यंत येतील, इतक्या उंचीवर दोरीने बांधल्या जातात. शेळ्यांना ७० टक्के ओला व ३० टक्के वाळलेला चारा दिला जातो. ओल्या चाऱ्यात ७० टक्के सुबाभुळ, व अन्य पूरक चारा ३० टक्के दिला जातो.
योग्य प्रमाणात सुमारे बारा वनस्पतींचा हिरवा चारा मिळत असल्याने शेळीची रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामुळे शेळ्या निरोगी राहण्यासोबतच त्यांचे वजन, उंची व लांबीसोबत देखणेपणाही वाढत असल्याचे साजिद सांगतात. दरवर्षी ७० बकरे व ३० पाटीची विक्री होते. त्यातून खर्च वजा जाता त्यांना वार्षिक चार लाखाच्या पुढे उत्पन्न मिळते.
संगोपनातून वाढवते नेेली पैदास
बंदिस्त शेळीपालनासाठी शेतात चार शेड उभारले आहेत. पहिल्या शेडमध्ये मोठ्या शेळ्या, दुसऱ्या शेडमध्ये बकरे (बोकड) व तिसऱ्या शेडमध्ये शेळीचे पिल्ले व पाटीचे संगोपन केले जाते. शेळीपालनातील बारकावे जाणून व्यवस्थापन करत असल्यामुळे साजिद सय्यद यांनी तीन पाटीपासून चार वर्षात ५३ पाट व बकऱ्यांची पैदास शक्य झाली. एका शेडमध्ये कुक्कुटपालन आहे. शेळीपालनाच्या शेडमध्येही गावरान कुक्कुटपालनाला प्राधान्य आहे. वडील राजमहमद, आई खैरूण, भाऊ वाजीद, पत्नी सानिया यांची या व्यवसायात मोठी मदत होते.
बंदिस्त शेळीपालनाचे फायदेच फायदे
बंदिस्त शेळीपालनात जागीच चारा मिळत असल्याने शेळ्यांची ऊर्जा वाया जात नाही. कमी खाद्यामध्ये शरीरयष्टी चांगली मिळते. फिरत्या शेळीपालना भुकेपोटी काही खाल्ले जाते, कुठलेही पाणी पिले जाते त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढते.
चांगले पोषण होईलच असे नाही. त्या उलट बंदिस्त शेळीपालनात शेडमध्ये ऊन येत नाही. वायुवीजन उत्तम ठेवल्यामुळे कडक उन्हाळा किंवा हिवाळ्यापासूनच शेळ्यांचा बचाव होतो. जागेवर उत्तम चारा आणि चांगले शुद्ध पाणी पुरवलेजाते.
शेळीच्या लेंड्यांमध्ये नत्र व स्फुरद मुबलक असून, त्यात अन्य कोणत्याही झाडांचे बी असत नाही. परिणामी बंदिस्त शेळीपालनात लेंडी खतही दर्जेदार असते. त्यामुळे शेतात तणांचे प्रमाण वाढत नाही.
शेळीच्या दुधालाही मागणी
सहा महिन्यात तीस किलो वजनाचे बकरे तयार होतात. मांसासाठी नरांची विक्री जागेवरच होते. कौटुंबिक व धार्मिक कार्यक्रमासाठी निरोगी, चांगल्या व्यवस्थापनातून वाढवलेल्या बकऱ्यांना मोठी मागणी असते. चारशे ते साडेचारशे किलो दराने वजनावर बकऱ्यांची विक्री केली जाते.
यासोबत अलीकडे आयुर्वेदिक म्हणून शेळीच्या दुधालाही मागणी वाढत आहे. फिरत्या शेळ्यांप्रमाणे बंदीस्त शेळीपालनातील शेळ्यांच्या दुधाचा उग्र वास येत नाही. यामुळे कुटुंबात खाण्यासाठी हे दूध वापरले जाते.
येत्या काळात पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून व बँकेच्या अर्थसाह्यातून शेळ्यांची संख्या शंभरपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. आपल्या व्यवसायातील आधुनिक पद्धती पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातील शेलीपालकांच्या शेतांना भेटी देऊन चांगल्या बाबींचा अवलंब करण्याचे धोरण साजिद यांनी ठेवले आहे.
संरक्षणासाठी बिनपगारी चौकीदार
शेळीपालन व कुक्कुटपालन एकत्रित करण्यासोबत त्यांचे विंचू, बहिरी ससाणा व सापांपासून बचाव होण्यासाठी सय्यद यांनी एक टरकी, चार राजहंस व दोन गिनीफाऊंड पक्षी पाळलेले आहेत. टर्की पक्षी दिसायला रुबाबदार असून, राजहंस व गिनीफाऊंड पक्षीही मोठे दिसतात.
रोज नियमित दिसणाऱ्या व्यक्तीशिवाय अन्य कोणी शेडमध्ये आल्यास हे पक्षी जोराने ओरडायला सुरुवात करतात. त्याच प्रमाणे विंचू व साप यांना हुसकावून लावतात. थोडक्यात हे पक्षी बिनपगारी चौकीदार मदत करतात.
कुक्कुटपालनात शंभर पक्षी आहेत. एकाच नरापासून पैदास करत राहिल्यास शेळीपालनात पुढील पिढीमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन मरतूक वाढते. हे टाळण्यासाठी दरवर्षी योग्य असा नर खरेदी केला जातो. यामुळे शेळीच्या लांबी, उंची, मटण, दूध आणि देखणेपणातही वाढ होत असल्याचे साजिद सय्यद सांगतात.
- साजिद सय्यद, ९९६०५४९७९९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.