यवतमाळ ः राज्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव वाढता असतानाच पशुसंवर्धन विभागातील (Department Of Animal Husbandry) अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यावर नियंत्रण मिळविणे जिकरीचे ठरत आहे. ही बाब लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून कुपटीचे (ता. उमरखेड) विद्यार्थी लसीकरण (Lumpy Skin Vaccination) मोहिमेत सहभागी होणार आहेत.
गोरक्षक दूत म्हणून हे विद्यार्थी आपली सेवा देणार असून, त्याकरिता त्यांच्यासाठी लम्पी आजार, उपचार व लसीकरण या विषयावरील तज्ज्ञांचा सहभाग असलेली विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
देशभरातील शेतकऱ्यांकडे पूर्वी मोठ्या संख्येने गोधन होते. या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचा उपयोग घरीच केला जात होता. शिल्लक दुधापासून प्रक्रियाजन्य पदार्थ तयार होत होते. जनावर शेतीत राबत असल्याने त्यांचे शेण आणि गोमूत्र थेट जमिनीला मिळायला.
यातूनच आपसूक शेतीचा पोत राखण्यास मदत होती, तर दुग्धजन्य पदार्थांच्या आहारातील वापरामुळे शेतकरी कुटुंबाचे आरोग्यही राखले जात होते. अशाप्रकारची व्यवस्था असल्यानेच शेतीतून चांगली उत्पादकता व उत्पन्न मिळत होते.
वाढत्या यांत्रिकीकरणात जनावरांचे अस्तित्व बऱ्याच अंशी कमी झाले. त्यातच आता जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेकडो जनावरे दगावली. त्याची दखल घेत शेतीव्यवस्थेतील जनावरांचे महत्त्व जाणत कुपटी येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी गोरक्षक दूत म्हणून आपली सेवा देणार आहेत.
त्यासाठी लम्पी आजाराशी संबंधित माहिती त्यांना असावी याकरिता पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. एन. कुंभारे यांच्या मार्गदर्शनात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
लम्पी नियंत्रणासाठीच्या आवश्यक बाबी, लसीकरण करण्याची पद्धती व इतर तांत्रिक बाबींविषयी विद्यार्थ्यांना यावेळी माहिती देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंताले, विजय इंगोले, प्रा. डॉ. वी. एच. वडतकर, प्रा. अक्षय तामसेकर, प्रा. आनंद राऊत, प्रा. किशोर आगे कार्यशाळेला उपस्थित होते. लसीकरण मोहिमेत अशा प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा सहभाग घेतल्यास या ‘लम्पी’चे नियंत्रण शक्य असल्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.