Pig Farming : वराहांचे आहार, प्रजनन व्यवस्थापन

Pig Shed Planning : वराहांसाठी बांधण्यात येणाऱ्या शेडची दिशा दक्षिण-उत्तर असावी, जेणेकरून पूर्वेकडून सकाळी येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे गोठा कोरडा राहून, आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल.
Pig Farming
Pig Farming Agrowon
Published on
Updated on

डॉ. हेमंत बिराडे, डॉ. पंकज हासे

Piglet Management : वराहांच्या शेडचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी, सुस्थापित वराह पालन केंद्रांना स्वतः उद्योजक आणि बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने, मुकादमाने भेटी द्याव्यात. त्यांच्याशी चर्चा करावी. शेडची दिशा दक्षिण-उत्तर असावी, जेणेकरून पूर्वेकडून सकाळी येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे गोठा कोरडा राहून, आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल.

शेड बांधताना छप्पर दोन्हीकडे उतरते असावे. एका ओळीत दोन शेड असाव्यात. दोन शेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. शेडमधील जमीन पक्की असावी. प्रत्येक एक फूट अंतरावर पाव इंचाचा उतार असावा म्हणजे मलमूत्र आपोआप वाहून जाईल. स्वच्छता करण्यास मदत होईल. जमिनीस क्राँकिटीकरण करताना खराटा फिरवून घ्यावा म्हणजे जमीन खडबडीत होईल.

एका मोठ्या वराहास २८ चौ. फूट जागेची आवश्यकता असते. जागेची आवश्यकता आणि वजनानुसार बदलते.

शेडच्या बाजूच्या भिंती जमिनीपासून २.५ ते ३ फुटापर्यंत बांधाव्यात, वर मोकळ्या असाव्यात. बांधलेल्या भिंती आतील बाजूने खडबडीत कराव्यात, जेणेकरून वराह त्यास अंग घासतील.

शेडमधील मध्य पिलरची उंची १२ फूट २ इंच आणि बाजूच्या शेडची उंची ६ फूट ७ इंच असावी.

शेडमध्ये एका बाजूकडून हवा प्रवेश करून दुसरीकडे सहज जाणारी मोकळी जागा असावी.भिंतीला लागूनच भरपूर उतार असलेली २ फूट रुंद आणि १ फूट खोल गटार असावी.

विण्याच्या खोलीत पिल्ले मादीच्या अंगाखाली येऊन मरू नयेत म्हणून लोखंडी गार्डरील भिंतीपासून ९ ते १२ इंच दूर आणि जमिनीपासून ८-९ इंच वर, साधारणतः २ इंच व्यासाचे लोखंडी पोकळ पाइप फीट करून घ्यावेत.

Pig Farming
Pig Farming : वाढती मागणी, निर्यातीसाठी शेतीला जोड द्या वराहपालनाची

पाणी पिण्यासाठी स्वयंचलित निप्पल लावावीत.

शेड मानवी वस्ती आणि पाण्याच्या स्रोतापासून कमीत कमी १० मीटर आणि नदीच्या किनाऱ्यापासून ५०० मीटर दूर असावी.

बांधकाम सुरू करण्यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाण पत्र घेणे आवश्यक आहे. तसेच शक्य असल्यास प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यास फायदेशीर ठरते. हे दाखले शासकीय योजनेचे अनुदान मिळण्यास उपयुक्त असतात.

आजारांचे नियंत्रण

वराह वयाच्या आठ ते दहाव्या महिन्यात मटणासाठी कत्तल करण्यात येतात. पैदाशीसाठी ठेवलेल्या मादी आणि नरास आजार होतात. सर्व वयाच्या वराहांना स्वाइन फिव्हर, लाळ्या खुरकूत, हिमोरेजिक सेप्टीसेमियासारखे आजार

होतात. यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र आफ्रिकन स्वाइन

फिव्हर आजारावर लस उपलब्ध नाही.

आजार नियंत्रण करण्यासाठी स्वच्छ, सकस आहार दिवसातून दोनदा द्यावा. गोठा स्वच्छ व नेहमी कोरडा ठेवावा. गोठ्यात वराहांना त्यांच्या वजनाप्रमाणे जागा उपलब्ध करून द्यावी.

प्रसूतीसाठी वेगळे प्रसूतिगृह असावे. साधारणतः ५० ते ७० चौ. फूट बंदिस्त व तेवढीच उघडी जागा असलेले घर असावे. गाभण माद्यांना वेगळे ठेवावे. तसेच नरास सुद्धा वेगळे ठेवावे. पिलांचे सुळे दात तिसऱ्या दिवशी मोठ्या नेलकटरच्या साह्याने बोथट करावेत.

Pig Farming
Pig Farming : वराहाच्या नवजात पिलांचे संगोपन

चौथ्या व अकराव्या दिवशी पिलांना लोहाचे इंजेक्शन द्यावे. वराहांचे ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण करावे. पहिल्या सात दिवसात लहान पिलांचे थंडीपासून संरक्षण करावे. थंड हवेचा झोत, पिलांच्या अंगात न येण्यासाठी उपाययोजना करावी. नेहमी स्वच्छ व ताजे पाणी प्यायला उपलब्ध होईल, याकडे लक्ष द्यावे. स्तन्यपान करणाऱ्या मादीस इतकेच खाद्य द्यावे, की ती साधारणतः १० टक्के खाद्य सोडून देईल. ज्या वेळेस मादी १० टक्के खाद्य सोडून देते, त्या वेळेस तिला परिपूर्ण आहार मिळतो आहे, असे गृहीत धरावे. अनोळखी माणसांना तसेच गाई-म्हशी, बकरी, मेंढी या जनावरांना प्रक्षेत्राजवळ येवू देऊ नये.

प्रजनन

विदेशी मादीचा (यॉर्कशायर) गाभणकाळ ११४ दिवसांचा असतो. एक मादी एका वेळी ८ ते १२ पिलांना जन्म देते. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवसायासाठी आपण पिलांना फक्त ५६ दिवसच दूध पीऊ द्यायचे असते. दुधातून पिलांना वेगळे केल्यावर तीच मादी परत आठ दिवसांत माजावर येऊन गाभण राहते.

मादी वर्षातून दोन वेळा पिलांना जन्म देते आणि कमीत कमी सात पिले विकण्यायोग्य मोठी होतात. म्हणजेच एका मादीपासून प्रतिवर्षी १४ पिले (विकण्यायोग्य वराह) मिळतात.

- डॉ. हेमंत बिराडे,

७०२११२८२७४

(माजी सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

- डॉ. पंकज हासे,

९८९०२४८४९४

(सहायक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com