
डॉ. जी. एस. सोनवणे, डॉ. एम. बी. आमले, डॉ. व्ही. एस. धायगुडे
Pig Rearing : विलगीकरणाआधी वराह पिलांच्या होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे वेगवेगळ्या वराह समूहाच्या संगोपनानुसार बदलते. तसेच निवाऱ्याच्या व्यवस्थापनातील त्रुटीमुळे वाढते. यासाठी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
सा धारणपणे एक आठवडा आधी गर्भार वराह मादीला तिच्या जननकक्षात अलग ठेवावे. जेणेकरून तिला त्या जागेची ओळख होऊन ती तेथे रुळेल. बाळंतघराची चांगली स्वच्छता, नवजात पिलांना उबदार वातावरण प्रदान करणे, जास्त संख्या असलेल्या पिलांचे उत्तम पालनपोषण, लहान आणि कमकुवत पिलांना श्वास घेण्यास आणि चीक मिळविण्यासाठी मदत करणाऱ्या पद्धतींचा वापर करावा. पिल्लू बाहेर आल्यानंतर नाकातोंडातील चिकट स्राव काढून त्यांचा श्वसनाचा मार्ग रिकामा करावा. त्याच्या शरीरावरील जो काही चिकट स्राव असतो तो स्वच्छ करणे आवश्यक आहे. नवजात पिलांच्या अंगावर केस नसतात किंवा अतिशय विरळ असतात. त्यामुळे शरीराचे तापमान पहिल्या ३० मिनिटांत कमी असते आणि ते साधारण होण्यासाठी ४८ तास लागतात. पिलांना चांगला बिछाना दिला तर शरीर लवकर उबदार होण्यास मदत होते.
नवजात पिलांचे व्यवस्थापन
जन्मल्यानंतर पिलांची नाळ साधारण अडीच ते तीन सेंटिमीटर अंतरावर कापावी. यानंतर कापलेल्या नाळेला जंतुनाशक लावावे. जेणेकरून त्या ठिकाणी सूज किंवा धनुर्वात होण्याची शक्यता कमी होती.
प्रत्येक पिलांस स्वच्छ करावे. त्यांचा श्वासोछ्वास उत्तम आहे की नाही हे पाहावे. पुढील दोन तासांत ते स्थिरावतात. जन्मानंतर काही मिनिटांतच पिले त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा शोध घेऊ लागतात आणि मादीचे सड शोधून दूध पिण्यास सुरुवात करतात.
पिले असलेल्या शेडचे वातावरण स्वच्छ असावे त्यामुळे रोग आणि परजीवींच्या संपर्कात नवजात पिले येण्याची शक्यता कमी होते.
साधारणपणे २४ तासांत पिले २० ते २२ वेळा मादीला दुग्धपान करतात. पहिले १ ते २ आठवडे मादीच्या अंगाखाली, पिले चिरडली जाऊ नयेत, तसेच त्यांना मुक्तपणे संचार करता यावा यासाठी विशेष काळजी घ्यावी. विशेषतः विदेशी मादीत (योर्कशायर) नवजात पिले व मादी यांत विभाजक (गार्ड रेल) असावे.
साधारणपणे, पिले वैयक्तिकपणे पहिल्या काही कालावधीत स्वतःला विशिष्ट सड ठरवतात आणि त्याच सडांना विलगीकरणापर्यंत ईर्षेने दूध पितात. सडाचे दूध पिण्याचा क्रम पहिल्या १० दिवसांत ठरलेला असतो. परंतु ज्या मादीत कमी पिले (साधारणपणे ६-८) होतात, त्यात एकापेक्षा जास्त सडांवर दावा करणे ही सामान्य गोष्ट आहे. दुसरीकडे जास्त पिले (साधारणपणे >१०) असतात त्यात सर्वांत अशक्त, कमकुवत पिलू उपाशी राहू शकते, कारण ते सडासाठी इतर सशक्त पिलांशी स्पर्धा करू शकत नाही. यामुळे अशी पिले सुरुवातीच्या आठवड्यात दगावण्याचे प्रमाण जास्त असते.
नवजात पिलांसाठी चिकाचे महत्त्व
नवजात पिले साधारण एक मिनिटाच्या आत स्वतःच्या पायांवर उभी राहतात. त्यांचे सर्व शरीर स्वच्छ केल्यानंतर मादीच्या जवळ नेऊन त्यांचे मुख सडाजवळ घेऊन त्यांना दूध पिण्यास उद्युक्त करावे किंवा दूध काढून या पिलांना पाजावे.
जन्मानंतर पिले साधारणपणे पंचेचाळीस मिनिटांच्या आत स्वतःहून दूध पिण्यास सुरुवात करतात. मादीत चिकाची निर्मिती साधारणपणे जननाच्या अगोदर सुरू होऊन पुढच्या २४ ते ४८ तासांत संपते.
नवजात पिलांच्या शरीरात जन्मतात ग्लायकोजनचे प्रमाण फारच कमी असते. म्हणून त्यांच्या शरीराचे तापमान आणि चयापचय नियंत्रित ठेवण्यासाठी नवजात पिलांना चीक पाजणे अतिशय गरजेचे असते. आईच्या पोटात असताना पिलांना प्रतिजैविके सहजपणे मिळणे अशक्य असते, म्हणून ते जन्मल्यानंतर चीक पाजणे अत्यावश्यक असते. नवजात पिलांमध्ये पहिले ६ तास अतिशय महत्त्वाचे असतात. कारण २४ तासांनंतर वराहाच्या पिलाचे आतडे प्रतिजैविके शोषून घेत नाही.
पिलांमध्ये अशक्तपणा साधारण नेहमीचा आजार आहे. ही परिस्थिती योग्य प्रमाणात लोहाचे इंजेक्शन किंवा लोह असणारे खाद्य मिश्रण देऊन वाचविता येते.
अनाथ पिलांची देखभाल
मादीचा बाळंतपणात मृत्यू, कासदाह, दूध न येणे किंवा कमी प्रमाणात येणे अशा काही कारणांनी पिले अनाथ होतात. त्याच काळात जर दुसरी मादी बाळंत झाली असेल, तर ही अनाथ पिले तिच्याकडे ठेवता येतात. हा बदल लवकर करावा. कारण त्याच काळात बाळंत मादी दूध द्यायला सुरुवात करते.
नव्या मातेला नवीन पिलांचा स्वीकार करण्यासाठी तिची आपली पिले काही काळ तिच्यापासून दूर ठेवावी लागतात. पिलांवर तिच्या दुधाचे फवारे मारावेत, जेणेकरून त्या मातेला त्यांचा वास येणार नाही.
अनाथ पिलांना कृत्रिम दूध दिले जाते. कृत्रिम दूधनिर्मिती करताना एक अंड्याचा बलक एक लिटर गायीच्या दुधात मिश्रण करून त्यात चिमूटभर फेरस सल्फेट मिसळावे. हे मिश्रण प्रमाणबद्ध आहार आहे. लोहयुक्त इंजेक्शनदेखील देता येते.
नर पिलांचे खच्चीकरण
प्रजननासाठी निवड न झालेल्या नर पिलाला ४ ते १४ दिवसांत किंवा वेगळे करण्याच्या आधी ५ दिवस खच्चीकरण करतात.
याचा फायदा म्हणजे नर संयमित होऊन वाढ झपाट्याने होते. त्याच्या मांसाला तीव्र वास येत नाही.
लसीकरण
स्वाइन फिव्हर विषाणूमुळे होणारे संक्रमण आणि रोग कमी करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. विलगीकरणाच्या आधी पिलांना स्वाइन फिव्हर आजाराचे लसीकरण करता येते. त्यामुळे पिलांना ७ आठवड्यांपासून सक्रिय लसीकरण करावे आणि त्याची सुरक्षा किमान सहा महिने टिकते.
वाढत्या वयातील डुकरांच्या पिलांना ब्रुसेलोसिस आणि लेप्टोस्पायरोसिसपासून देखील सुरक्षित ठेवावे लागते.
पिलांना मातेपासून वेगळे करणे (विलगीकरण)
६ ते ८ आठवड्यांत पिलांना वेगळे केले जाते. दर दिवशी थोडा वेळ असे वेगळे करत करत पिलांना मातेपासून वेगळे करावे. नाही तर तिचा आहार मंदावतो, तणाव येतो.
पिलाला वेगळे केल्याच्या दोन आठवड्यांनी जंतनिर्मूलन करावे.
पिलाला १८ टक्के प्रोटिनयुक्त अन्न आणि १६ टक्के ग्रोअर खाद्यान्न २ आठवड्यांपर्यंत द्यावे.
एका शेडमध्ये २० पिले असा साधारण एकाच वयाचा गट करावा.
वराहाची नवीन पिले खरेदी करताना
दोन महिन्यांच्या वरील पिले विकत घ्यावीत. पिल्ले रोगमुक्त असावी.
नवीन विकत आणलेल्या २ ते ३ महिन्यांच्या पिलांना इतर वराहांपासून ३ ते ४ आठवडे वेगळे ठेवावे.
वराह शेडमध्ये आगंतुक पाहुण्याला थेट प्रवेश टाळावा.
शेड रोगजंतूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळ रिकामी करून स्वच्छ करून मग वापरावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.