डॉ. पराग घोगळे
Cow Milk : दुभत्या गाईसाठी जास्तीतजास्त सुमारे २५ ते २७ अंश सेल्सिअस, म्हशींसाठी व देशी गाईसाठी सुमारे ३३ ते ३६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान गृहीत धरले जाते, यापुढे तापमान वाढत गेल्यास गाई (Cow), म्हशींच्या दूध उत्पादनावर (Buffalo Milk Production) तसेच दुधातील घटकांवर परिणाम होतो.
उन्हाळ्यात जनावरांची भूक मंदावते, जनावर धापा टाकते, दूध आणि दुधातील फॅट व एसएनएफ कमी होतो. तसेच पोटातील आम्लता वाढण्याची शक्यता असते.
उष्णतेमुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन ते माजावर येऊन गाभण राहण्याची शक्यताही कमी होते. गाई, म्हशींचे दूध उत्पादन टिकवणे हे उन्हाळ्यात कसोटीचे ठरते यासाठी उन्हाळ्यातील दिवसात जनावरांच्या आहार व व्यवस्थापनात बदल करावे लागतात.
पाण्याचे महत्त्व:
१) जनावरांना पिण्यासाठी अतिरिक्त पाणी द्यावे, जेणेकरून दूध उत्पादन व शरीराची गरज भागवली जाऊ शकेल. स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवता येते.
२) पिण्याच्या पाण्यामध्ये बर्फ टाकून असे गार पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा दूध उत्पादनावर अतिशय चांगला परिणाम दिसून आला आहे. पाणी हा जनावरांवरील ताण कमी करण्यासाठीचा मूलभूत घटक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा वापर सर्वतोपरी करावा.
अतिरिक्त ऊर्जा:
१) गाई, म्हशींना अतिरिक्त ऊर्जा असलेला आहार द्यावा जेणेकरून भूक मंदावली असली तरी जरुरी कॅलरीज त्यांना मिळून उत्पादनावर परिणाम होणार नाही. यासाठी मका किंवा गहू ऐवजी बायपास फॅटचा वापर करावा. जेणेकरून पोटाचा सामू संतुलित राहून ५.८ ते ६.८ या मध्ये राहील.
२) बायपास फॅट चे पचन गाई,म्हशींच्या पहिल्या तीन पोटात न होता ते चौथ्या पोटात होऊन ते आतड्यातून शरीरात शोषले जात असल्यामुळे जनावरांना आम्लता होत नाही. बायपास फॅटमध्ये स्टार्चच्या तुलनेत सुमारे अडीच पट ऊर्जा उपलब्ध असते.
घरगुती घटक:
१) जास्त स्टार्च किंवा कर्बोदके असलेला आहार हा किण्वन पोटामध्ये (रुमेन) अतिरिक्त आम्ल उत्पन्न करीत असल्यामुळे पचनास अडथळे निर्माण करतो.
२) किण्वन पोटातील आम्लता कमी करण्यासाठी खाण्याचा सोडा, जिरे, धणे, सैंधव मीठ व इतर घरगुती घटक वापरून त्याचे मिश्रण जनावरांना देता येऊ शकते, ज्यायोगे किण्वन पोटाचे वातावरण चांगले राहून पचनास मदत होईल.
वासरांची काळजी:
१) तापमान वाढीमुळे वासरांना योग्य घटक मिळत नाहीत. त्यांची वाढही खुंटते, वासरांना वाढीसाठी प्रथिनांची जास्त गरज असते. तसेच ताण कमी करण्यासाठी जीवनसत्वे व खनिजे आवश्यक असतात म्हणून वासरांच्या वाढीकडेही उन्हाळ्यात विशेष लक्ष द्यावे.
२) पिण्यासाठी भरपूर पाणी उपलब्ध करावे. वासरांचे खाद्य व इतर पुरके देऊन त्यांची वजन वाढ कायम ठेवावी.
हिरव्या चाऱ्याचे महत्त्व :
१) जनावरे हिरवा चारा आवडीने खातात संकरित ज्वारी, मका, व इतर एकदल वर्गीय चारा शक्य झाल्यास गाई, म्हशींना द्यावा. द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये लसूण घास हा अतिशय चांगला चारा आहे ज्यातून सुमारे २१ टक्के प्रथिने जनावरांना मिळतात.
चाऱ्यामध्ये सुमारे ८० टक्के पाणी असते. तसेच जीवनसत्त्व अ व ई हे सुद्धा नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात. जनावरांवरील ताण कमी होतो तसेच प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.
खनिज मिश्रणाची गरज:
१) विविध प्रकारची खनिजे व जीवनसत्वे गाई, म्हशींच्या चयापचय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावतात. जनावरांना जीवनसत्त्व मिश्रण आणि खनिज मिश्रण द्यावे.
जीवनसत्त्व-अ, ई व डी ३ , जीवनसत्त्व सी, फॉस्फरस या घटकांमुळे उष्णतेचा ताण कमी होण्यास मदत होते. पचन व प्रजनन सुधारते. त्वचा तुकतुकीत व चमकदार होते. जनावराची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.
लिंबू सरबत :
१) दहा लिटर थंड पाण्यामध्ये २०० ग्रॅम गूळ, २५ ग्रॅम मीठ आणि एक लिंबू पिळून घ्यावे. हे सरबत तयार करून दिवसातून एक किंवा दोन वेळेस जनावरांना पाजावे किंवा जीवनसत्त्व सी व डेक्सट्रोज युक्त पूरक द्यावे. म्हणजे गाई, म्हशी वरील उन्हाचा ताण कमी होण्यास मदत होईल.
जनावरांमधील अंतर:
१) जनावरांचे पोटात किण्वन प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे किण्वन पोटाचे तापमान इतर शरीरापेक्षा सुमारे दोन अंश सेल्सिअसने जास्त असते. त्यामुळे जनावरांच्या आजूबाजूचे तापमान गरम होते.
२) यामुळे गोठ्यात जनावरांची गर्दी करू नये. जेणेकरून उन्हाचा ताण कमी करता येईल. दुभत्या गाई, म्हशींना गोठ्यात २४ चौरस फूट इतकी जागा पुरेशी ठरते.
पंखा, फॉगर्सचा योग्य वापर:
१) गोठ्यातील हवा खेळती ठेवावी तसेच गोठ्यामध्ये छतावर पंखे न लावता एका बाजूने पंखा व एका बाजूने एक्झॉस्ट पंखा लावल्यास हवेचा झोत तयार होऊन गोठ्यातील गायींना थंडावा मिळू शकतो.
२) पत्र्याखाली किंवा छताखाली पंखे लावल्यास वरील गरम हवा जनावरांना लागून त्यांना अजून त्रास होऊ शकतो. तसेच फॉगर्स चा वापर केल्यास गोठ्यातील तापमान सुमारे ७ ते ८ अंश सेल्सिअस ने कमी करता येऊ शकते.
सावलीचे महत्त्व:
१) तीव्र सूर्य किरणांपासून जनावरांचा बचाव करावा, मुक्त गोठ्यामध्ये दाट सावली देणारी झाडे असल्यास उन्हाचा ताण काही प्रमाणात कमी करता येतो.
२) गोठ्याच्या छतावर चारा किंवा इतर तापमान विरोधी आच्छादनाचा थर दिल्यास त्या खालील जनावरांना उन्हाचा त्रास कमी होऊ शकतो.
आयुर्वेदिक घटकांचा वापर:
१) जनावरांवरील उन्हाचा ताण कमी करण्यासाठी आयुर्वेदिक घटकांचाही वापर करता येतो.
२) अश्वगंधा, आवळा, शतावरी, जीवंती, पुदिना, कोरफड,इत्यादी. आयुर्वेदानुसार काही औषधी घटक हे जनावरावरील ताण कमी करणे तसेच प्रजननक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात.
३) पशुवैद्यकांच्या सल्यानुसार असे घटक किंवा त्यांचे अर्क आपल्या जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट केल्यास उन्हाळ्यातील ताण कमी करण्यास निश्चितच मदत होते.
संपर्क : डॉ. पराग घोगळे,९८९२०९९९६९, (लेखक पशुआहार तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.