Goat Farming : शेळीपालनातील संधी आणि आव्हाने

Goat Rearing : मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून उत्पन्न मिळवून देणारा शेळीपालन हा चांगला व्यवसाय आहे. यासाठी शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या व्यवसायातून खात्रीशीर आर्थिक नफा मिळविणे शक्य आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. दिलीप बदुकले, डॉ.प्राजक्ता कुकडे

Opportunities and Challenges in Goat Farming : मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून उत्पन्न मिळवून देणारा शेळीपालन हा चांगला व्यवसाय आहे. यासाठी शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या व्यवसायातून खात्रीशीर आर्थिक नफा मिळविणे शक्य आहे.

शेळी स्वभावाने शांत असल्याने महिला, लहान मुले देखील सहजपणे शेळ्यांचे संगोपन करू शकतात. शेळ्यांमध्ये एका वेतात दोन किंवा तीन करडे देण्याची क्षमता असते तसेच इतर जनावरे न खाणारा झाडपाला आणि निकृ‌‍‌‌‍‍ष्ट चाऱ्याचे उत्कृ‌‍‌‌‍‍ष्ट मांस आणि दुधात रूपांतर करण्याची क्षमता असते.
शेळीच्या मांसाची किंमत अंदाजे वार्षिक २० टक्के दराने वाढताना दिसून येत आहे.

व्यवसायाची सद्यःस्थिती ः
१) महाराष्ट्रात३३.०७ दशलक्ष इतके पशुधन असून त्यामध्ये शेळ्यांची संख्या १०.०६ दशलक्ष आहे.
२) २०२१-२२ मध्ये शेळी, मेंढीच्या मांसाची निर्यात ९,५९२.३१ मेट्रिक टन झाली. भारतातील एकूण दूध उत्पादनाच्या २.९ टक्के दूध शेळ्यांपासून मिळते.
३) भारतातून श्रीलंका, मालदीव, दुबई, कतार आखाती देश, बांगलादेश आणि नेपाळ अशा विविध देशांमध्ये जिवंत शेळ्यांची निर्यात होते.
४) भारतातील ७० टक्के शेळ्या भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी आणि भटक्या जमाती पाळतात.
५) शेळी क्षेत्राचा भारतीय पशुधनाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ८.४ टक्के वाटा आहे.
६) अल्पभूधारक, भूमिहीन शेतकऱ्यांना शेळीपालनातून सुमारे ४.२ टक्के ग्रामीण रोजगार निर्माण होतो.

उद्योजकतेच्या संधी ः
१) प्रजननक्षम शेळ्यांचे उत्पादन आणि विक्री ः

- स्थानिक बाजारपेठेतून किंवा इतरत्र ठिकाणाहून खरेदी करण्यात आलेल्या शेळ्यांचे उत्पादन, प्रजनन आणि आरोग्याबाबत खात्रीलायक पुरेशी माहिती नसते. परिणामी व्यावसायिकांना निरोगी, उच्च उत्पादनक्षम शेळ्या मिळत नाहीत. व्यवसायात योग्य नफा मिळत नाही. यामुळे उच्च उत्पादन, प्रजननक्षम शेळ्या विक्री व्यवसायास भरपूर वाव आहे.
- शेळीपालन उद्योग करू इच्छिणारे मांस आणि दूध उत्पादनाच्या दोन्ही गुणांसह उच्च दर्जाच्या चांगल्या जातींच्या प्रजननक्षम शेळ्या तयार करून त्यांची ठोक आणि किरकोळ स्तरावर चढ्या दराने विक्री करून नफा मिळवू शकतात.

Goat Farming
Goat Farming : शेळीपालनासाठी शेळी आणि बोकडाची निवड कशी करावी?

२) मांसाकरिता शेळ्यांची विक्री ः
- मांस उत्पादनाकरिता कमी वेळेत अधिक वजन देणाऱ्या शेळ्यांना अधिक वाव आहे. या व्यवसायात सहा महिने ते एक वर्ष वयाच्या बोकडांना अधिक मागणी असते.
- साधारणत: २५-३५ किलोग्रॅम वजनाच्या बोकडांना बाजारात मागणी असते. यामुळे कमी वयात एवढे वजन मिळविल्यास शेळी पालन व्यवसायिकांना अधिक नफा मिळतो.
- महाराष्ट्रात उस्मानाबादी, बेरारी, संगमनेरी आणि कोकण कन्याळ, राजस्थानमधील सिरोही, अजमेरी, पंजाबमधील बीटल, उत्तर प्रदेशातील जमुनापारी आणि बारबेरी, पश्चिम बंगालमधील ब्लॅक बंगाल, केरळमधील मलबारी शेळी इत्यादी.
३) बोकड पालन ः
- केवळ मांस उत्पादनासाठी तीन ते चार महिने वयाचा बोकड विकत घेऊन बंदिस्त /अर्धबंदिस्त पद्धतीत एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वेळ जोपासना करून विक्री केली जाते. यामुळे इतर वयोगटाच्या शेळ्यांकडे लक्ष देण्यात वेळ, पैसा खर्च होत नाही आणि व्यवसायातील जोखीमही कमी होते.

Goat Farming
Shelipalan Scheme : शेळीपालनातील संधी

- शेळीपालक फक्त ३ ते ४ महिने वयाच्या नर करडांची खरेदी करून
त्यांचे एक वर्षापर्यंत संगोपन करून बाजारात विक्री करू शकतात. बोकडांची किंमत उंची, वजन आणि शारीरिक वैशिष्ट्यांवर ठरवली जाते.

४) दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन ः
- शेळीच्या दुधातील उच्च पोषक मूल्य, कमी शर्करा, उच्च बीटा केसिन आणि कमी अल्फा एस-१ केसिन यामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती तसेच लॅकटोज इनटॉलेरंन्स असणाऱ्या व्यक्तींना सहज पचन होते.
- दुधापासून चीज, बटर, फ्लेवर्ड मिल्क आणि योगर्ट यांसारख्या उत्पादनांना मागणी वाढत आहे.
- दीर्घ काळ टिकाऊ क्षमतेमुळे दुधाच्या पावडरीस मागणी आहे.

५) लेंडीपासून कंपोस्ट खत निर्मिती ः
- लेंडी खतामध्ये नायट्रोजन, पोटॅशिअम आणि फॉस्फरस हे घटक चांगल्या प्रमाणात आहेत. लेंडीपासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत निर्मिती करता येते.

६) स्वच्छ मांस उत्पादन आणि विक्री ः
- अन्न साखळीच्या सर्व टप्प्यांवर मांसाची सुरक्षितता आणि स्थिरता सुनिश्चित करून ग्राहकांना पर्यायी व्यवस्था पुरविण्याकरिता छोटेखानी स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण मांस उत्पादन केंद्र स्थापन करून किंवा मोबाइल व्हॅनद्वारे जवळच्या भागात विक्री करता येऊ शकते.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ ः
- मुंबई (देवनार), ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, धुळे,नगर, पुणे सातारा, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती (चांदूरबाजार)

व्यवसायातील आव्हाने ः
१) चारा, पाणी टंचाई ः

- वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, घटते जमीन क्षेत्र, घटते चराई क्षेत्र, दुष्काळ, बागायती आणि व्यावसायिक पिकांचे आकर्षण, यामुळे शेळ्यांना पुरेसा चारा मिळणे सद्यःस्थितीत एक आव्हान आहे. पाण्याची कमतरता हा देखील एक मर्यादा घटक आहे.
२) प्रजनन व्यवस्थापन ः
- एकच नर दोनपेक्षा अधिक वर्षासाठी प्रजननाकरिता वापरणे, उच्चउत्पादन क्षमतेचे बोकड नसणे, कृत्रिम रेतन सुविधेचा अभाव आणि अनियंत्रित प्रजनन पद्धतीमुळे अनेकदा चांगल्या उच्च उत्पादन असणाऱ्या शेळ्या आणि झपाट्याने वाढणारे बोकड उपलब्ध होत नाहीत. शेळ्यांचे प्रजनन करताना शास्त्रीय प्रजनन धोरणाचा अवलंब करणे अनिवार्य आहे.
३) पोषण विकार ः
- असंतुलित आणि अपुरा आहार, ऊर्जा व प्रथिनांची कमतरता, विविध खनिजांची आणि जीवनसत्त्वांची कमतरता, पिण्याच्या पाण्याची कमतरता, यामुळे शेळ्यांमध्ये अशक्तपणा येतो. परिणामी वाढ खुंटणे, वजन कमी होते,दोन वेतातील अंतर वाढते. अशक्त पिलांचा जन्म होतो. परिणामी व्यवसायात आर्थिक नुकसान होते.
४) परोपजीवी प्रादुर्भाव ः
- बाह्य परजीवी जसे की गोचीड, उवा, पिसवा आणि खरूज यांच्या प्रादुर्भावामुळे अस्वस्थता, अशक्तपणा त्वचेवर खाज, केसांचा खडबडीतपणा दिसून येतो. अधिकच्या प्रादुर्भावामुळे शेळ्यांमध्ये अशक्तपणा येतो. रक्तातील साखर कमी होऊन मृत्यू होतो.
- अंत:परजीवीच्या प्रादुर्भावामुळे वाढ खुंटते. अशक्तपणा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
- गोठ्यामधील अस्वच्छता, गोचीड निर्मुलन आणि जंतनाशकाचा अभाव, पशू आरोग्याकडे दुर्लक्ष ही परजीवी प्रादुर्भावाची कारणे आहेत. यामुळे व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

५) आजारांचा प्रादुर्भाव ः
- गोठ्यामधील अस्वच्छता, शेळ्यांची दाटी, लसीकरणाचा अभाव, कुपोषणामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव दिसतो.
- श्वसनाचे आजार (घटसर्प, न्यूमोनिया), अतिसार, आंत्रविषार, पीपीआर, तोंडखुरी-पायखुरी, फूट रॉट यांच्यासारख्या आजारामुळे वजन कमी होते. वाढणाऱ्या करडांची वाढ खुंटते. मादी शेळ्यांमध्ये गर्भपात होतो.
६) असंघटित बाजार ः
- संघटित बाजारपेठांचा अभाव, ग्रामीण पातळीवर शेळ्यांची वजनाऐवजी नगावर विक्रीमुळे कमी बाजारमूल्य मिळते. याव्यतिरिक्त दलालाकडून होणारे आर्थिक शोषण ही प्रमुख समस्या आहे.
७) प्रतिकूल हवामान ः
- खूप जास्त पाऊस, हिवाळ्यात जास्त थंडी, उष्णतेच्या लाटांचा परिणाम आरोग्य आणि आणि उत्पादनावर होतो. थंडीत हायपोथरमिया हे करडांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. उन्हाळ्यातील उच्च तापमानाचा उत्पादकता आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
८) पशुवैद्यकीय सेवेचा अभाव ः
- ग्रामीण पातळीवर पशुवैद्यकीय क्षेत्रातील अपुरे मनुष्यबळ, पशुवैद्यकीय सुविधांचा अभाव ही पशू आरोग्य अबाधित ठेवण्यामधील एक प्रमुख समस्या आहे.
९) योग्य प्रशिक्षणाचा अभाव ः
- ग्रामीण पातळीवर बहुतेक पशुपालक पारंपारिक ज्ञानाच्या आधारे शेळीपालन करतात. शास्त्रीय ज्ञानाचा अभाव आणि प्रशिक्षण घेण्याबाबत जागरूकता नाही. यामुळे शेळीपालन व्यवसायात व्यावसायिक दृष्टी तयार होत नाही.
१०) विमा ः
- विमा कंपन्या सामान्य परिस्थितीत शेळ्यांना विमा संरक्षण देत नाही. फक्त बँकेच्या कर्जाच्या बाबतीत विमा संरक्षण देतात. शेळीपालनात विम्याची उपलब्धता हा मर्यादित घटक आहे.
११) सहाय्यक प्रणालीचा अभावः
- भांडवली गुंतवणूक आणि निरोगी शेळ्यांची निवड, चारा पुरवठा, पशुवैद्यकीय सेवा आणि इतर तांत्रिक निविष्ठांच्या बाबतीत मदत करणारी कोणतीही खात्रीशीर एजन्सी नाही.


शेळीच्या दुधाचे गुणधर्म ः
१) दुधात लहान आणि समआकाराचे स्निग्ध कण असतात. दुधात क्लस्टरिंग होत नाही. दुधाचा सामू ६.६ ते ६.७ आहे. अल्कधर्मी गुणधर्मामुळे दुधाला औषधी मूल्य.
२) दूध लहान मुले, वृद्ध माणसे तसेच आजारी व्यक्ती यांना सहज पचते. लॅक्टोज इनटॉलरन्स असलेल्या व्यक्तींना गाई-म्हशींचे दूध पचत नाही, त्यांना शेळीचे दूध सहज पचते.
३) दूध अपचन, जठर, पित्ताशय, व्रण, इसब त्वचा आजारावर उपयुक्त.
४) दुधापासून तयार होणाऱ्या ‘चीज’ या पदार्थाला देश-विदेशात चांगली मागणी.
-------------------------------------
संपर्क ः डॉ. गिरीश पंचभाई, ९७३०६३०१२२
(पशुउत्पादन व व्यवस्थापन विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,अकोला)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com