जातिवंत गोवंश संवर्धनासाठी एक पाऊल पुढे...

भारतीय गोवंशामध्ये ताण सहन करण्याची क्षमता, रोग प्रतिकारकता चांगली आहे. हे लक्षात घेता विविध गोवंशाचे शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन आणि संशोधन गरजेचे आहे. यासाठी पुणे कृषी महाविद्यालयामध्ये देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होत असलेल्या ‘गोधन’ प्रदर्शनाच्या निमित्ताने देशी गोवंशाचा घेतलेला हा आढावा...
Indigenous Cow
Indigenous CowAgrowon
Published on
Updated on

देशी गोवंश हा शेती आणि मानवी आरोग्यासाठी वरदान आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार गायवर्गीय पशूंमध्ये भारतात अनोळख्या गाई ५२ टक्के, विदेशी गाई २६ टक्के आणि भारतीय गायी २२ टक्के आहेत. शुद्ध आणि जातिवंत दुधाळ गोवंशाचे प्रमाण पाहता राठी ०.८ टक्का, गीर ४.८ टक्के, सहिवाल ४.२ टक्के आणि रेड सिंधी, थारपारकर या फक्त ०.४ टक्का इतक्याच शिल्लक आहेत. महाराष्ट्रातील देवणी, डांगी, गवळाऊ, लाल कंधारी इत्यादी गाईंमध्ये ही आकडेवारी ०.१ ते ०.२ टक्का आहे. त्यामुळे या गोवंशामध्ये अधिक संशोधनाची गरज आहे. भारतामध्ये विविध वातावरणामध्ये तग धरणारे नोंदणीकृत ५० देशी गोवंश आहेत. एकूण देशी पशुधनाच्या १० टक्के गोवंश हे दुधासाठी प्रसिद्ध आहेत. हे प्रामुख्याने उत्तर भारतातील आहेत. भारतामध्ये साहिवाल, गीर, लालसिंधी, थारपारकर, राठी या गाई दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, त्यांचे दूध उत्पादन सरासरी १५०० ते २५०० लिटर प्रति वेत इतके आहे. दुहेरी कामासाठी (दूध व ओढकाम) प्रसिद्ध असलेल्या देवणी, कांक्रेज, हरियाना इत्यादी गायी सर्वसाधारणपणे १००० ते १५०० लिटर प्रतिवेत दूध देतात. ओढकामासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवंशाच्या गाई सरासरी फक्त ५०० लिटर प्रतिवेत दूध देतात.

भारतात एकूण देशी गोवंशापैकी सुमारे ७४ टक्के गोवंश हा गावठी (ND) प्रकारामध्ये आणि २६ टक्के गोवंश हा शुद्ध स्वरूपात आढळतो. महाराष्ट्रातील खिल्लार, डांगी, लालकंधारी, देवणी आणि कोकण कपिला या जाती प्रामुख्याने ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे दूध उत्पादन कमी आहे. भारतात आढळणाऱ्या देशी गायींमध्ये प्रामुख्याने साहिवाल, गीर, थारपारकर, लालसिंधी गोवंश दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, त्यांचा उपयोग गावठी गायींमध्ये सुधारणा करण्यासाठी केला जातो. भारतीय गोवंशामध्ये ताण सहन करण्याची क्षमता, रोग प्रतिकारकता, गोचीड प्रतिबंध गुण आढळतात. हे लक्षात घेता देशी गोवंशाचे शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन, सुधारणा आणि संशोधन होणे गरजेचे आहे. जनावरांचे आरोग्य, देशी गायीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सोलर डेअरी, वनौषधींचा वापर, शेण-गोमूत्राचा वापर, रसायन अंशमुक्त सेंद्रिय दूध उत्पादन, भ्रूण प्रत्यारोपण, रक्तजल तपासणी, आरोग्य तपासणी, चारा उत्पादन आणि चारा प्रक्रिया इत्यादी विषयांवर संशोधन आणि मार्गदर्शन गरजेचे आहे. शेतकऱ्यांना देशी गोवंशाची ओळख, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ हा प्रकल्प सुरू झाला आहे.

आपला गोवंश देशातील कोणत्याही वातावरणामध्ये समरस होतो. यामुळे याचे महत्त्व अधोरेखित होते. साहिवाल, गीर, थारपारकर, लाल सिंधी या परराज्यातील दुधाळ गोवंशाचे आपल्या राज्यात संवर्धन करणे, आनुवंशिक सुधारणा, स्थानिक गायींच्या आनुवंशिक सुधारण्यासाठी जातिवंत देशी गोवंशाच्या वळूच्या रेतमात्रांची निर्मिती आणि पुरवठा, प्रक्षेत्रावर लैंगिक क्रमवारी लावलेल्या रेतमात्रा, भ्रूण प्रत्यारोपण या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, देशी गोवंशाचे प्रजनन, उत्पादन आणि

पुनरुत्पादन इत्यादी कामगिरीचा सखोल अभ्यास या केंद्रामध्ये केला जाणार आहे. गायींच्या आवश्यकतेनुसार पशू खाद्य निर्मिती आणि त्यामधील पोषक तत्त्वांचा अभ्यासदेखील होत आहे. गीर, सहिवाल, ओंगोल गोवंशाची वातावरणात तग धरण्याची क्षमता, रोग प्रतिकार शक्ती या गुणांमुळे ब्राझील, केनिया, अर्जेंटिना, अमेरिका या देशांमध्ये हा गोवंश दुधासाठी प्रसिद्ध आहेत. ब्राझील देशाने १९६० पासून भारतातील गीर गायीचे संवर्धन करून, निवड पद्धतीने दूध देण्याच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ केली. ब्राझील सध्या अनेक देशामध्ये त्यांच्याकडील गीर गायींचा पुरवठा ‘ब्राझिलियन गीर’ या नावाने करत आहे.

पुणे कृषी महाविद्यालयातील संशोधन प्रक्षेत्रावर पहिल्या टप्यात साहिवाल, गीर, राठी, लालसिंधी, थारपारकर, खिलार इत्यादी गोवंशांचा तुलनात्मक अभ्यास होत आहे. शेण, गोमूत्राचा शेतीसाठी होणाऱ्या वापराबाबत आम्ही संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. याचबरोबरीने सोलर डेअरी, बायोगॅस संयंत्राचा वापर, पशू उपचारासाठी हर्बल गार्डन, विविध औषधी वनस्पतींची (शेवगा, तुळस, अश्वगंधा, कोरफड, शतावरी, देशी केळी, बेल, अडुळसा) ओळख, दूध आणि पशुखाद्य प्रक्रियेसाठी विविध लहान-मोठ्या यंत्राच्या वापराबाबतही केंद्रामध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. रसायन अंशमुक्त सेंद्रिय दूध उत्पादनाबाबतही आम्ही संशोधन हाती घेतले आहे.

राष्ट्रीय पातळीवर भारतीय गाईंचे दूध उत्पादनाचे सरासरी प्रमाण हे ३.९० किलो प्रति दिवस आणि महाराष्ट्रात हे प्रमाण २.३ किलो प्रति दिवस एवढेच आहे. आपल्या प्रकल्पामध्ये प्रतिदिन १५ ते १६ लिटर दूध देणाऱ्या राठी गाई आहेत. तसेच इतर गोवंशाची दररोज दूध उत्पादनाची एकूण सरासरी आठ ते नऊ लिटर आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आपणास या दूध उत्पादनामध्ये सातत्य राखता येईल. केवळ दूध उत्पादनावर न थांबता तूप निर्मिती तसेच दूध प्रक्रियेतील नावीन्यपूर्ण तंत्र पशुपालकांपर्यंत आम्ही पोहोचवीत आहोत. देशी गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, पणत्या, मोबाईल स्टॅन्ड, कुंड्या निर्मितीवर भर दिला आहे. सेंद्रिय खतांची मागणी लक्षात घेता गांडूळ खत, गोखूर खत, गोमूत्र अर्क, विविध पिकांसाठी जैविक मिश्रण तयार करण्यात येत आहे. याचे प्रशिक्षणदेखील उपलब्ध आहे.

या प्रकल्पात देशी गाईंच्या संवर्धनासोबतच भ्रूण प्रत्यारोपण तंत्राचा अवलंब करून जातिवंत पैदाशीवर भर दिला आहे. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जातिवंत दुधाळ गाईंपासून जन्मलेल्या मादी वासरांपैकी पंचवीस टक्के निवडक प्रजननासाठी कायम ठेवण्यात येतील. उर्वरित अंदाजे एक वर्षाच्या कालवडी प्रगतिशील शेतकरी, गोपालकांना देशी गाय संवर्धनासाठी विक्री करण्यात येणार आहे. पशुधनाच्या शाश्वत विकासासाठीचे धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रकल्पांच्या माध्यमातून देशी गोवंशावर वातावरण बदलाच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू आहे. देशी गोवंशातील जैव विविधता जपण्यासाठी आणि शेतकरी, पशुपालक, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यामध्ये जागरूकता, व्यावसायिकता जागविण्यासाठी ‘गो-पर्यटन’ प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे. देशी गोवंशाची ओळख ही नव्या पिढीसाठी फलदायी ठरून नवे दुग्ध व्यावसायिक, पशुपैदासकार तयार होऊन नामशेष होत चाललेल्या देशी जनावरांची संख्या वाढण्यास मदत होईल. पशू, पर्यावरण, संस्कृती संवर्धनाबरोबरच एकूणच शाश्‍वत विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यास या प्रकल्पामुळे हातभार लागले, असा मला विश्‍वास आहे.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com