Poultry : कोंबड्यांसाठी पोषक खाद्याचे नियोजन

कोंबडीपालन व्यवसायामध्ये ((Poultry Industry) खाद्य (Poultry Feed) हा महत्त्वाचा घटक आहे. कारण खाद्यावर ६५ ते ७५ टक्के खर्च होतो. शास्त्रोक्त पद्धतीने गरजेप्रमाणे कोंबड्यांना पोषणमूल्य पुरविल्यास या व्यवसायातून अधिकाधिक नफा मिळू शकतो.
Poultry
Poultry Agrowon
Published on
Updated on

डॉ. जी. एम. गादेगावकर, डॉ. एस. एस. रामटेके

कोंबड्यांना देखील पाणी, प्रथिने, ऊर्जा, कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्त्वे अशा विविध पोषण मूल्यांची आवश्यकता असते. ही पोषण मूल्य पुरवण्याकरिता विविध खाद्य घटकांचा वापर केला जातो. (Poultry Feed Management)

ऊर्जेचा स्रोत :

- तृणधान्य तसेच त्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ ऊर्जेचे स्रोत म्हणून वापरले जातात. कोंबडी खाद्यामध्ये तृणधान्यांचा ६० ते ७० टक्के अवलंब केला जातो. तृणधान्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. प्रथिनांचे प्रमाण साधारणपणे ८ ते १० टक्के असते. तृणधान्यामधून मिळणाऱ्या प्रथिनांमध्ये लायसीन सारखी महत्त्वाची अमिनो आम्ले कमी प्रमाणात असतात.

- ऊर्जेचे स्रोत म्हणून आहारात वनस्पती तेल किंवा प्राण्यांपासून मिळणाऱ्या चरबीच्या पावडरचा वापर केला जातो. यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उपलब्ध होते.

- विविध वनस्पती तेल जसे, की सूर्यफूल तेल, सोयबीन तेल, मोहरी तेल, पाम तेल इत्यादीचा कुक्कुट खाद्यात अवलंब करता येतो.

मका :

- यामध्ये ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे धान्य चवीला रुचकर असते. पिवळ्या मक्यामध्ये कॅरोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे अंड्याच्या बलकाला गडद पिवळा रंग येण्यास मदत होते.

बार्ली :

- हे धान्य कमी रुचकर आणि जास्त तंतुमय पदार्थ, मक्यापेक्षा कमी ऊर्जा असलेले धान्य आहे. कोंबडी खाद्यात सहसा याचा अवलंब केला जात नाही, कारण कोंबड्यांना ते कमी रुचकर वाटते. अशा धान्याची सवय होण्यास कोंबड्यांना अधिक वेळ लागतो.

ओट :

- जास्त तंतुमय पदार्थ असलेले धान्य आहे, परंतु ऊर्जेचे प्रमाण मक्यापेक्षा कमी असते. याच्या वापरामुळे कोंबड्या एकमेकांना चोच मारणे, पिसे ओढण्याचे प्रमाण कमी होते.

- खाद्यात अवलंब केल्याने कोंबड्यांमध्ये हाडांचे विकार कमी प्रमाणात दिसून येतात. कारण यामध्ये तंतुमय पदार्थ, मँगेनीज अधिक प्रमाणात असते.

ज्वारी :

- ज्वारी आणि मका ही धान्य एकमेकांस पूरक मानली जातात. ज्वारीमध्ये मक्याच्या तुलनेत ऊर्जेचे प्रमाण कमी असते. प्रथिनांचे प्रमाण मक्यापेक्षा जास्त असते.

तांदूळ:

- रुचकर आणि पचनास सोपे धान्य आहे. परंतु किंमत जास्त असल्यामुळे शक्यतो कोंबडी खाद्यामध्ये जास्त वापर करत नाहीत. तुकडा तांदूळ स्वस्त दरात उपलब्ध होतो, त्याचा खाद्यात अवलंब करता येतो.

तृणधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ :

तांदळाचा कोंडा, तेलविरहित तांदळाचा कोंडा, किंवा पॉलिश, गव्हाचा कोंडा :

- तांदूळ, गव्हापासून मिळणारे हे दुय्यम पदार्थ आहेत. तांदळाचे पॉलिश या घटकांमध्ये ऊर्जेचे प्रमाण अधिक असते. यामध्ये थायमीन आणि नियासिनसारखी पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात असतात.

- तांदळाच्या पॉलिशमध्ये मेदाचे प्रमाण जास्त असते. मेदाम्ले जास्त असल्यामुळे भात पॉलिशचा अवलंब करून बनवलेले खाद्य दहा ते पंधरा दिवसांत वापरावे. कारण गोदामांमध्ये ते जास्त काळ ठेवल्यास त्याचा खराब वास येतो. त्यातील जीवनसत्त्वांचा नाश होतो.

Poultry
Poultry : पोल्ट्री व्यवसाय का ठरतोय आतबट्ट्याचा ?

ऊस मळी :

- साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ऊर्जेचे प्रमाणदेखील जास्त असते. याच्या वापराने खाद्य गोड होते.

- पशुखाद्य निर्मिती कारखान्यामध्ये याचा वापर गोळी खाद्य बनवण्याकरिता केला जातो.

- कोंबडी खाद्यामध्ये याचा वापर शेकडा १ ते २ टक्के करावा. याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास कोंबड्यांना हगवण लागते. कारण यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते.

प्रथिनांचे स्रोत ः ः

- प्रथिन स्रोतांचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य प्रथिने असे दोन भाग पडतात. प्राणिजन्य प्रथिन स्रोतामधून कोंबड्यांना आवश्यक अमिनो आम्ले मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात जी वनस्पतिजन्य प्रथिन स्रोतामध्ये अल्प प्रमाणात असतात.

- प्राणिजन्य प्रथिनांमधून कोंबड्यांना कॅल्शिअम, फॉस्फरस यांसारखी खनिजे आणि सायनो कोबालामीन सारखी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात मिळतात.

- प्रथिन स्रोत तयार करताना ती गरम केली जातात किंवा भाजली जातात, जेणेकरून त्यामध्ये नको असलेले घटक जे कोंबडीचे आरोग्य किंवा खाद्य पाचकतेवर विपरीत परिणाम करतात ते नष्ट केले जातात.

कोंबडी खाद्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रथिनांचे स्रोत ः

तेल विरहित शेंगदाणा पेंड :

- ४५ ते ५० टक्के प्रथिने असतात. अर्जीनीन सारखी अमिनो आम्ले मोठ्या प्रमाणात असतात. लायसिन व मिथिओनिन सारखी आवश्यक अमिनो आम्ले अल्प प्रमाणात असतात.

- खाद्य घटकांमध्ये ‘ब' गटातील जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. गोदामामध्ये याचा साठा व्यवस्थित न केल्यास आणि पाण्याचा संपर्क आल्यास पेंडीमध्ये बुरशी लागू शकते.

तेलविरहित सरकी पेंड :

- प्रथिनांचे प्रमाण ३० ते ३५ टक्के असते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोंबडी खाद्यात शेकडा ५ टक्के एवढाच अवलंब केला जातो.

- यामध्ये गॉसिपोल नावाचा विपरीत विषारी घटक असतो, ज्यामुळे कोंबड्यांची वाढ, अंड्याच्या बलकाचा रंग बदलू शकतो.

Poultry
Poultry : ग्रामीण उद्योजकतेला ‘मिनी इनक्युबेटर’ मुळे मिळाला वाव

तेलविरहित सोयाबीन पेंड :

- प्रथिनांचे प्रमाण ४५ ते ५० टक्के असते. कोंबडी खाद्यात प्रथिनांचा स्रोत म्हणून वापर होतो.

- आवश्यक अमिनो आम्ल लायसीनचे प्रमाण अधिक असते, परंतु मिथिओनिनसारखे आवश्यक अमिनो आम्ल कमी प्रमाणात असते.

तेलविरहित सूर्यफूल पेंड :

- प्रथिनांचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा वापर कोंबडी खाद्यात ५ ते १० टक्के केला जातो.

- यामध्ये आवश्यक अर्जीनीन आणि मिथिओनिन सारखी अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असतात. परंतु लायसीन सारखी आवश्यक अमिनो आम्ल कमी प्रमाणात असतात.

- ‘ब’ गटातील जीवनसत्त्वे पेंटोथेनिक आणि नियासिन या खाद्य घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात.

तेलविरहित मोहरी पेंड :

- खाद्यामध्ये वापर ५ ते १० टक्के प्रमाणात करतात. उग्र वास व काही विषारी घटक असल्यामुळे याचा वापर कमी प्रमाणात केला जातो.

- यामध्ये लायसीन अमिनो आम्ल कमी प्रमाणात असते.

तेलविरहित मका ग्लुटेन किंवा मका ग्लुटेन :

- मक्यापासून स्टार्च किंवा सिरप बनविताना तयार होणारा दुय्यम पदार्थ आहे. प्रथिनांचे प्रमाण ५० ते ५५ टक्के असते.

- पिवळ्या मक्यापासून बनवलेल्या मका ग्लुटेनमध्ये कॅरोटीन घटक पांढऱ्या मक्यापेक्षा जास्त असते. हे अंड्याच्या बलकाला गडद पिवळा रंग देण्यास कारणीभूत ठरते.

प्राणिजन्य प्रथिनांचा स्रोत ः

माशांची भुकटी :

- मासे सुकवून दळल्यानंतर होणारा खाद्य घटक म्हणजे भुकटी. ही तयार करताना कोणते मासे वापरले आहेत, यावर त्यामधील प्रथिनांचे प्रमाण अवलंबून असते.

- प्रथिनांचे प्रमाण साधारण ४५ ते ५० टक्के एवढे असते. यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले मोठ्या प्रमाणात असतात. ‘ब’ गटातील सर्व जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजे असतात.

- भुकटी खरेदी करताना त्यामधील मिठाचे प्रमाण तपासावे. ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. मिठाचे प्रमाण जास्त असल्यास कोंबड्यांना हगवण लागते. माशाची मोठी खरेदी करताना त्यामध्ये युरियासारख्या घटकाची भेसळ झाली आहे का हे तपासून पाहावे.

- खाद्यात भुकटीचा वापर ५ ते १० टक्के करावा.

मटण आणि हाडांची भुकटी :

- यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. कॅल्शिअम, फॉस्फरस प्रमाण जास्त असते. ‘ब’ गटातील सर्व जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात.

- मटणाचा कोणता भाग भुकटी करण्यासाठी वापरला आहे, त्यावर त्यातील प्रथिनांचे प्रमाण ठरते. सरासरी प्रथिनांचे प्रमाण ५० ते ५५ टक्के असते. सर्व आवश्यक अमिनो आम्ले यातून उपलब्ध होतात.

- कोंबडी खाद्यात याचा वापर ५ ते १० टक्के प्रमाणात करतात.

विविध खाद्य घटकातील पोषण मूल्यांचे प्रमाण

खाद्य घटक---कच्ची प्रथिने (टक्के)---मेटाबोलय जेबल/ चयापचय ऊर्जा (Kcal/किलो)---लायसीन (टक्के)---मिथीओनीन (टक्के)---तंतुमय पदार्थ (टक्के)---कॅल्शिअम (टक्के)---एकूण फॉस्फरस (टक्के)

मका---९---३४१०---०.२---०.१८---२.०---०.०२---०.२७

तांदूळ पॉलीश---१०.०---२४१०---०.५---०.१५---६.०---०.०८---१.३०

तेलविरहित तांदळाचा कोंडा---१४.०---१५६०---०.६---०.२४---३.४---०.०८---१.५०

गुआर मिल---४८.०---२५५०---२२.८---०.३६५---१०.०---०.१४---१.१७

चरबी---८०००

तेलविरहित सोयाबीन पेंड/मील---४२---२४८६---२६.०---०.६---४.५---०.२७---०.६३

माशाची भुकटी---५०---२८६०---३९.०---१.५---१.०---३.७३---४.१

संपर्क ः डॉ. जी. एम. गादेगावकर, ९८६९१५८७६०

(पशू पोषण व आहार शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com