Animal Care : पशूआहारात खनिज मिश्रण, जीवनसत्वे महत्वाची...

एकंदरीत मेदाच्या पुरेशा पुरवठ्याने जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर अनुकूल परिणाम दिसून येतो. कारण प्रजननासाठी आवश्यक संप्रेरके तयार करण्यासाठी मेदाम्ले आवश्यक असतात.खनिज मिश्रण दिल्याने वासरू आणि कालवडींची योग्य प्रमाणात वाढ झाल्याने पैदासक्षम वयात त्या लवकर येतात. गाईची प्रजोत्पादनाची कार्यक्षमता वाढते.
Animal Care
Animal Care Agrowon
Published on
Updated on

मेद

मेद व कोलेस्ट्रॉलचा जनावरांच्या प्रजननावर अनुकूल परिणाम दिसून येतो. आहारातील ऊर्जा वाढवण्याकरता खुराकामध्ये मेदाचे प्रमाण ३ ते ५ टक्के असावे. आहारातील मेदाचे ५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण झाल्यास त्याचा कोठी पोटातील जिवाणू आणि खाद्याचा पाचकतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. एकंदरीत मेदाच्या पुरेशा पुरवठ्याने जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर अनुकूल परिणाम दिसून येतो. कारण प्रजननासाठी आवश्यक संप्रेरके तयार करण्यासाठी मेदाम्ले आवश्यक असतात. ज्यामुळे जनावरांची गर्भधारणा होते, गर्भ टिकून राहतो. प्रसूती सुलभ होते.

Animal Care
जनावरांमधील परोपजीवींचे निर्मूलन

प्रजननासाठी महत्त्वाची खनिजे आणि त्यांचे कार्य

कॅल्शिअम : दुग्धोत्पादन, हाडे व दातांच्या मजबुतीसाठी आणि स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणासाठी आवश्यक. यांच्या कमतरतेमुळे प्रसूती सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. कारण गर्भाशयाच्या स्नायू आकुंचन-प्रसरण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.

फॉस्फरस : दुग्धोत्पादन, चयापचय आणि दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक. याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन चक्र अनियमित होते. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.

मॅग्नेशियम : हाडे व दात मजबूत आणि प्रथिनांचे उत्पादन तसेच कर्बोदकावरील क्रियेसाठी आवश्यक.

सल्फर : प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकावरील क्रियेसाठी उपयोगी. “ब” गटातील जीवनसत्त्व थायमिन आणि बायोटीन यांचा घटक. मिथिओनीन आणि सिस्टीन अमिनो आम्लांच्या निर्मितीसाठी आवश्यक.

सोडिअम व पोटॅशिअम : शरीरातील अभिसरणाचा समतोल राखण्यासाठी आणि आम्लता टिकून ठेवण्यासाठी.

तांबे /कोबाल्ट : रक्तातील हिमोग्लोबिन उत्पादन, पेशी समूहाच्या रक्त छटासाठी आवश्यक. बऱ्याचशा धातुजन्य अंतस्रवांचे घटक आणि प्रजोत्पादन क्रियेसाठी महत्त्वाचे. कमतरतेमुळे जनावरांमध्ये वांझपणा दिसून येतो.

झिंक : शुक्रजंतूंच्या निर्मितीसाठी आणि लैंगिक अवयवांची प्राथमिक आणि त्यापुढील वाढीसाठी महत्त्वाचे. "अ" जीवनसत्त्व कार्यान्वित करते, वळूंची प्रजनन क्षमता टिकून ठेवण्यासाठी आणि वळूंकडून चांगल्या वीर्याची निर्मिती होण्यासाठी आवश्यक ठरते.

मँगेनीज : कर्बोदकांच्या उत्पादनासाठी कार्य करणाऱ्या शरीरातील अनेक अंतस्रवांच्या (टी ३, टी ४) निर्मितीसाठी आवश्यक. शारीरिक वाढीसाठी आणि प्रजोत्पादनासाठी आवश्यक. याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतुचक्र अनियमित होते. गर्भपात होऊन मृत आणि दुबळे आणि केसविरहित गालगुंड असलेले वासरू जन्माला येते. जनावर मुका माज दाखविते.

Animal Care
जनावरांमधील क्षयरोगामध्ये कोणती लक्षणे दिसतात?

खनिज कमतरतेमुळे होणारे परिणाम

खनिजांच्या अभावामुळे जनावरांमध्ये अनियमित ऋतुचक्र व अकार्यक्षम पुनरुत्पादन दिसून येते. क्षाराच्या कमतरतेमुळे गाई माजावर येत नाहीत. माज सुप्त स्वरूपात राहतो. हंगामी वांझपणा येतो, गर्भपात व गर्भामध्ये उपजत दोष उत्पन्न होतात. कमतरतेमुळे कालवडी माजावर येत नाहीत. माज सुप्त अनियमित राहतो, वाया जातो, गर्भधारणा होत नाही. कालवडीच्या पहिल्या विताचे वय वाढते. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो किंवा अशक्त वासरू जन्माला येते. प्रसूती सुलभ होत नाही. गाईंचा भाकड काळ वाढतो. दोन सलग वितातील अंतर वाढते. उत्पादन उपयुक्त आयुष्य कमी होते. नर वासराच्या पुनरुत्पादन संस्थेतील अवयवांची वाढ समाधानकारक होत नाही. वयात येण्यास उशीर लागतो. चांगल्या प्रकारचे वीर्य उत्पादन मिळत नाही.

खनिजे मिळण्याची आवश्यकता

जनावरांच्या खाद्यातून आणि वैरणीतून पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झालेली खनिजे जनावरांना खनिज मिश्रणातून पुरविणे गरजेचे असते. खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे खुराकामध्ये १ टक्का मीठ, १ ते २ टक्का क्षार मिश्रणाचा वापर केल्यामुळे क्षारांची गरज पूर्ण होते. दुभत्या गाई आणि म्हशी : ६० ते ७० ग्रॅम/जनावर/दिवस (दुग्धोत्पादनानुसार) मोठी वासरे, कालवडी आणि भाकड जनावरे: ४० ते ५० ग्रॅम/ जनावर/दिवस लहान वासरे : २० ते २५ ग्रॅम/जनावर/ दिवस

खनिज मिश्रणाचे फायदे

वासरू आणि कालवडींची योग्य प्रमाणात वाढ झाल्याने पैदासक्षम वयात त्या लवकर येतात आणि गाईची प्रजोत्पादनाची कार्यक्षमता वाढते. वेताचा काळ वाढून दोन वेतांतील अंतर कमी होते, खाद्याची उपयुक्तता वाढते दुग्धोत्पादनात वृद्धी होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

खनिज मिश्रण देण्याची पद्धत

खनिज मिश्रण आंबोण मिश्रणातून जनावरांना खाऊ दिले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या खुराकात निरनिराळ्या प्रमाणात खनिज मिश्रण मिसळलेले असते. परंतु खनिजाचा योग्य पुरवठा होण्यासाठी खनिज मिश्रण देणे योग्य ठरते. क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण वापरणे जास्त परिणामकारक, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते.

जीवनसत्त्व

जनावरांना जीवनसत्त्व अत्यल्पप्रमाणात आवश्यक असतात. परंतु ती दुग्धोत्पादन, प्रजननासाठी अत्यावश्यक मानली जातात. मेदामध्ये विरघळणारी जीवनसत्त्व जसे की जीवनसत्त्व अ, ड, ई आणि के. बाजारात उपलब्ध असलेल्या पशुखाद्यांमध्ये जीवनसत्त्वांचा योग्य प्रमाणात अवलंब केला जातो. परंतु जर घरच्या घरी खुराक बनवून जनावरांना दिल्यास त्यात मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा अवलंब करणे आवश्यक ठरते.

जीवनसत्त्व ‘अ’

गर्भाशयाच्या पेशींच्या योग्य वाढीसाठी व त्या टिकवून ठेवण्यासाठी जीवनसत्त्व ‘अ’ महत्त्वाचे ठरते. जीवनसत्त्व ‘अ’च्या अभावाने जनावरे प्रजननात उशिरा येतात, प्रजनन ऋतुचक्र अनियमित होते, जनावरे माज उशिरा दाखवितात, गर्भपाताचे प्रमाण वाढते, वार अडकण्याचे प्रमाण वाढते, मृत किंवा अशक्त वासरू जन्माला येते, गर्भाशयाचा दाह होण्याचे प्रमाण वाढते. प्रसूतीनंतर गर्भाशय सुस्थितीमध्ये येण्यास वेळ लागतो, दोन प्रसूतींमधील अंतर वाढते, प्रसूतीपश्‍चात माज दाखविण्यास उशीर होतो. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा होण्यासाठी जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचा अवलंब करावा. जर आहारात हिरव्या चाऱ्याचा अवलंब केला नसेल तर खुराक मिश्रणामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व पावडरचा अवलंब करावा. आवश्यकता भासल्यास ‘अ’ जीवनसत्त्वाचे इंजेक्शन द्यावे.

जीवनसत्त्व ‘ड’

जीवनसत्त्व ‘ड’च्या अभावाने स्नायू आखडणे, धापा टाकणे, अशक्तपणा आणि कधी कधी आकडी येणे अशी लक्षणे दिसून येतात. जीवनसत्त्वाच्या अभावामुळे जनावरे प्रजननात उशिरा येतात, माज उशिरा दिसून येतो. तसेच मृत, अशक्त आणि व्यंग किंवा अनियमित वाढ झालेली वासरे जन्माला येतात. ज्या जनावरांवर सूर्यप्रकाश पडतो, त्यांचा त्वचेमध्ये जीवनसत्त्व ‘ड’ तयार होते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या पशुखाद्यामध्ये जीवनसत्त्व ‘ड’चा योग्य प्रमाणात अवलंब केलेला असतो.

जीवनसत्त्व ‘ई’

अभावामुळे गर्भाशयाची हालचाल, शुक्राणू हालचाल, गर्भधारणेचे प्रमाण, प्रसूतीनंतरच्या क्रिया, प्रसूतीनंतर वार बाहेर पडण्याची क्रिया आणि गर्भाची वाढ यावर विपरीत परिणाम दिसून येतो.

डॉ. जी. एम. गादेगावकर, ९८६९१५८७६०, (पशू पोषण व आहार शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com