Broiler Poultry Diseases : ब्रॉयलर कोंबडीतील चयापचयाचे आजार अन् उपचार

Poultry Diseases : ब्रॉयलर कोंबड्यांच्या मांसाची ज्याप्रमाणात वेगाने वाढ होते, त्याप्रमाणात हदय, फुफ्फुस यांची वाढ होत नाही. कोंबड्यांचे फुफ्फुस जास्त प्रसरण पावू शकत नसल्यामुळे चयापचयाचा वेग जास्त असतो. कोंबडीवर नेहमीच ताण असतो. त्यामुळे कोंबड्या आजारी पडतात.
Poultry Diseases
Poultry DiseasesAgrowon
Published on
Updated on

डॉ. व्ही. एस. धायगुडे, डॉ. पी. डी. पवार
Poultry Farming : ब्रॉयलर कोंबड्यांच्या मांसाची ज्याप्रमाणात वेगाने वाढ होते, त्याप्रमाणात हदय, फुफ्फुस यांची वाढ होत नाही. कोंबड्यांचे फुफ्फुस जास्त प्रसरण पावू शकत नसल्यामुळे चयापचयाचा वेग जास्त असतो. कोंबडीवर नेहमीच ताण असतो. त्यामुळे कोंबड्या आजारी पडतात.

काही वर्षांपूर्वी कोंबडीचे वजन दोन किलो होण्यासाठी साधारणत: दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागायचा, परंतु आताच्या परिस्थितीत ३८ ते ४२ दिवसांत ब्रॉयलर कोंबडी दोन किलोपेक्षा जास्त वजनाची होते. हे सर्व उत्तम प्रकारच्या जाती, संतुलित आहार आणि उत्तम संगोपनाद्वारे शक्य झाले. त्याचप्रकारे अंडी देणाऱ्या कोंबडी वार्षिक अंडी उत्पादन ३०० ते ३२० अंड्यांपर्यंत वाढविण्यात यश आले.

ब्रॉयलर कोंबड्यांच्या मांसाची ज्याप्रमाणात वेगाने वाढ होते, त्याप्रमाणात हदय आणि फुफ्फुसाची वाढ होत नाही. कोंबड्यांचे फुफ्फुस जास्त प्रसरण पावू शकत नसल्यामुळे चयापचयाचा वेग जास्त असतो, कोंबडीवर नेहमीच ताण असतो. कोंबड्यांमध्ये वातावरणातील बदल, व्यवस्थापनातील छोट्या त्रुटी खाद्य प्रमाण आणि गुणवत्तेत बदल इत्यादीमुळे चयापचयाच्या प्रक्रियेत बदल होतात. या कोंबड्या आजारास बळी पडतात. ब्रॉयलर कोंबड्यातील ३० टक्के मरतूक जलोदर आणि हार्ट अॅटॅकमुळे होते.

जलोदर :
ब्रॉयलर कोंबड्यांचा चयापचय प्रक्रियेचा वेग जास्त असतो, त्यामुळे त्यांचे वजन खूप वेगाने वाढते. यामुळे हदय, फुफुसांवर कायम ताण असतो.
आजार वाढण्याची कारणे ः
- जास्त खाद्य देणे. शेडचे तापमान कमी होणे.
- शेडमध्ये गर्दी जास्त होणे. हवा खेळती न राहणे.
- गोळी खाद्य देणे. ब्रूडिंग व्यवस्थित न करणे.
- शेडमध्ये अमोनियाचे प्रमाण वाढणे.
- यकृतास इजा पोहोचविणाऱ्या जिवाणू, विषाणू, बुरशींचा संसर्ग.

Poultry Diseases
Broiler Chicks : ब्रॉयलर पिलांचे ब्रूडिंग अन् व्यवस्थापन

लक्षणे :
- कोंबडी कोणतीही विशिष्ट प्रकारची लक्षणे न दाखवता मरते.
- कोबंडी बसून राहते. कमी खाते, वजन कमी होते. पंख विस्कटलेले दिसतात.
- पोट फुगलेले दिसते. हे प्रमाण ४ ते ६ आठवड्यांच्या कोंबडीत जास्त आढळते.

निदान :
- पशुतज्ज्ञांकडून शवविच्छेदन करावे. पोटाच्या पोकळीत फिकट पिवळसर पाणी दिसते.

प्रतिबंध :
- वयाच्या ७ ते २१ या दिवसांपर्यत साधारण: ६ ते ८ तासांपर्यंत खाद्य बंद ठेवल्यास फायदा होतो.
- गोळी खाद्य न वापरता मॅश वापरल्यास फायदा होतो.
- शेडचे तापमान नियंत्रित ठेवावे, आमोनियाचे प्रमाण वाढू देऊ नये. शेडमध्ये पुरेशी हवा मिळेल याची काळजी घ्यावी.
उपचार :
- आजारात औषधोपचाराचा विषेश फायदा होत नाही. परंतु आहारात अर्जिनीन हे अमायनो अ‍ॅसिड, तसेच क जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढविल्यास फायदा होतो.

Poultry Diseases
Broiler Poultry Farming : ब्रॉयलर कोंबडीपालनासाठी शेडची उभारणी कशी असावी?

हार्ट अॅटॅक ः
- जास्त खाद्य खाल्ल्याने आणि झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे हृदयावर अतिकामाचा ताण येऊन ते बंद होते.
- २ ते ४ आठवड्यांच्या कोंबड्यांमध्ये खासकरून नरामध्ये हा आजार जास्त आढळून येतो.
लक्षणे :
- अतिशय वेगाने वाढणारी आणि चांगले वजन असणारी कोंबडी अचानक पंख फडफडायला सुरुवात करते, आचके देते. काही मिनिटांमध्ये पाय वर करून उलटी होऊन मरते.
निदान :
- लक्षणांवरून निदान करावे.
प्रतिबंध :
- जलोदर आजारात जे उपाय करतात, तेच या आजारासाठी उपयुक्त ठरतात.
उपचार :
- प्रतिबंधात्मक उपचार महत्त्वाचे आहेत. आहारात बायोटीन, ई जीवनसत्त्व दिल्यास फरक पडतो.

गाउट :
- यकृतामध्ये प्रथिनांच्या चयापचय प्रक्रियेत युरिक अ‍ॅसिड हा टाकाऊ पदार्थ तयार होतो. तो मूत्राद्वारे बाहेर फेकला जातो.
- रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. त्याचे वेगवेगळे क्षार, फुफ्फुस, हृदय, यकृत, पोट, आतडे यांवर असलेल्या पातळ पडद्यावर म्हणजेच सिरोझा आणि सांध्याच्या आतील आवरणावर जमा होते.
लक्षणे :
- मोठ्या प्रमाणात मरतुक होते. सांधे सुजलेले दिसतात.
निदान :
- मेलेल्या कोंबडीचे शवविच्छेदन केल्यास फुफ्फुस, हृदय, यकृत, आतडे यांवरील पातळ पडद्यावर आणि सांध्याच्या आतील आवरणावर पांढरा चकाकणारा पदार्थ जमा झालेला दिसतो.
कारणे :
- आजार मुख्यत: व्यवस्थापनातील त्रुटीमुळे होतो. पाण्याची कमतरता हे मुख्य कारण आहे.
- इनफेक्शियस ब्राँकायटिस हा मुख्यत: श्‍वसनसंस्था आणि प्रजननसंस्थेचा आजार आहे. परंतु या विषाणूंचे काही प्रकार मूत्रपिंडास इजा पोहोचवतात. त्यामुळे मूत्रपिंडातून युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन होत नाही.
- गंबोरो आणि अ जीवनसत्त्वाच्या कमतरता.
- अंड्यावरील कोंबड्यांमध्ये आहारात कॅल्शिअमचे प्रमाण वाढल्यास.
- खाद्यामधील मायकोटॉक्सिन्समुळे.
प्रतिबंध :
- कोंबड्यांना दिवसभर स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
- संतुलित आहार, योग्य व्यवस्थापन आणि इनफेक्शियस ब्राँकायटिस, गंबोरो या आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
उपचार :
- आजाराचे निदान होताच सर्वांत प्रथम स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
- काही दिवसांकरिता आहारातील प्रथिनांचे प्रमाण कमी करून ऊर्जेचे स्रोत वाढवावेत.
- अंड्यावरील कोंबड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त नसावे.
- तज्ज्ञांच्या सल्ल्याने मुत्राची आम्लता कमी करणारी औषधे आणि शिफारशीत हर्बल औषधे द्यावीत.

फॅटी लिव्हर आणि हेमोरेजिक सिंड्रोम
- लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात चरबी साठल्याने ते फुटून पोटात रक्तस्राव होतो.
- आजार मुख्यत्वेकरून उष्ण दिवस तसेच अंडी देणाऱ्या वयोवृद्ध कोंबड्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतो.
- अंडी देण्याचे प्रमाण कमी होते. पोटातील रक्तस्रावामुळे कोंबड्या दगावतात.
कारणे :
- जास्त अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात कर्बोदके दिली जातात. त्यामानाने पिंजऱ्यातील कोंबड्यांची हालचाल खूप कमी असते. त्यामुळे कर्बोदकांचे चरबीत रूपांतर होऊन ती लिव्हरमध्ये साठून राहते.
- असंतुलीत खाद्य मिश्रण. वातावरणातील उष्णता.
- लिव्हरमधील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक पौष्टिक पदार्थांची कमतरता.
- तणाव, जास्त अंडी उत्पादन, बायोटीनची कमतरता.
लक्षणे :
- चांगली शरीरयष्टी आणि जास्त अंडी देणाऱ्या कोंबडीमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.
- अंड्याचे उत्पादन अचानक कमी होते.
- तुरा पांढरट पडतो. वजन २० ते २५ टक्क्यांनी वाढते.
- उष्ण तापमान आणि तणावामध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते.

शव विच्छेदन ः
- पोटाच्या पोकळीत रक्त साठलेले असते. लिवरवर रक्ताच्या गुठळ्या दिसतात.
- लिवर हे पिवळसर रंगाचे, आकाराने बरेच मोठे आणि ठिसूळ असते.
- चरबीचे प्रमाण वाढते. कोंबडीमध्ये साधारणत २० ते २५ टक्के चरबी असते. परंतु आजारात ७० टक्यांपर्यंत पोहोचते. लिव्हर फुटून होणाऱ्या रक्तस्रावामुळे मरतुक होते.
उपचार :
- योग्य प्रमाणात खाद्य मिश्रण द्यावे.
- ई जीवनसत्त्व, कोलीन, ब-जीवनसत्त्व आणि इनोसीटोल यांचे खाद्यात मिश्रण करावे.

रीकेट्‍स
- आजार हाडांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या असंतुलित प्रमाणामुळे होतो. हाडांचा आकार आणि रचनेत बदल होतो.
- हाडांची लवचिकता आणि विद्रूपता वाढते. परिणामी कोंबडी लंगडते.
- आजार वेगाने वाढणाऱ्या पिलांमध्ये दिसतो. आजार कोणत्याही वयोगटातील कोंबड्यांना होतो. चार आठवड्यांखालील कोंबड्या जास्त संवेदनाक्षम असतात.
कारणे :
- कॅल्शिअम, फॉस्फरस आणि ड जीवनसत्त्वाची कमतरता.
- चुकीचे खाद्य मिश्रण.
- हाडांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि ड जीवनसत्व यांच्यावर होणारा परिणाम.
लक्षणे :
- कोंबड्यांची वाढ खुंटते, स्नायू कमकुवत होतात, चालताना अडथळा येतो.
- पायाचे सांधे सुजतात. तरूण कोंबडीध्ये चोच, हाडे मऊ आणि लवचीक होतात.
- आजार जसा वाढत जातो तशी पिसे खडबडीत होतात.
- लवकरच उपचार न केल्यास मरतुकीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत जाते.
- छातीची हाडे मणक्याला जिथे जोडलेली असतात तेथे गाठी येतात. लांब हाडांची टोके मोठी होतात.
उपचार :
- पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जीवनसत्त्व ड २ ते ३ वेळा पाणी, खाद्य मिश्रणातून द्यावे.
- खाद्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस २:१ प्रमाण योग्य प्रमाणात मिसळावे.

संपर्क ः डॉ. व्ही. एस. धायगुडे, ९८६०५३४४८२
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com