Amaravati News : पोल्ट्री क्षेत्रात कोंबड्यांचे दर वाढविणे आणि दबावात ठेवण्यामागे करारदार कंपन्यांचा हात असल्याचा आरोप सातत्याने झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये एका बड्या कंपनीविरोधात पोल्ट्री व्यावसायिकांनी आंदोलन केले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच या कंपनीने विदर्भातून व्यावसायिक माघार घेतल्याने खळबळ उडाली आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून महाराष्ट्रात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे ९ लाखांवर आहे. त्यांच्याद्वारे प्रत्येकी सरासरी सात हजारांवर कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन होते. मात्र गेल्या काही वर्षांत कोंबड्यांच्या प्रति किलो दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. कोरोनानंतर तर अनेक व्यावसायिकांनी या व्यवसायातून माघार घेतली.
८५ ते ९० रुपये उत्पादकता खर्च असताना बाजारात ६० रुपये किलो असा दर कुक्कुट पक्ष्यांना मिळाला. त्यामुळे अनेकांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. परिणामी अनेक पोल्ट्री शेडला टाळे लागले.
दरम्यान, बाजारात दरांमध्ये होणाऱ्या या चढ-उतारामागे करारदार कंपन्यांचा हात असल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिकांनी सातत्याने केला आहे. शासनाने पोल्ट्री व्यवसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीची स्थापना केली. या समितीच्या बैठकीतही हा विषय सातत्याने चर्चिला गेला.
त्यानंतरच्या काळात पोल्ट्री व्यावसायिकांनी अमरावती येथे देशभरात नाव असलेल्या एका कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. आता या कंपनीने विदर्भातून आपला गाशा गुंडाळल्याचे सांगितले जात आहे. करारावर व्यवसाय करणारी ही कंपनी सर्वात जुनी असून, तिचे पुण्यात मुख्यालय आणि देशभरात विस्तार आहे. विदर्भात कंपनीने करारदारांना पक्ष्यांचा पुरवठा करणे थांबविले आहे. त्यामुळे आता विदर्भात केवळ पाचच करारदार कंपन्या शिल्लक आहेत.
दराअभावी पोल्ट्रीशेडला अनेकांचे टाळे
‘‘करारदार कंपन्या बाजारात हस्तक्षेप करून दर पाडण्याचे षड्यंत्र रचतात. त्यासाठी अधिक वजनाच्या कुक्कुट पक्ष्यांचा पुरवठा मुद्दाम केला जातो. त्यामुळे वैयक्तिकस्तरावर शेतीला पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.
गेल्या काही दिवसांत ४५ ते ६० रुपये किलो असा दर चिकनला होता. उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील यातून होत नव्हती. परिणामी, अनेकांनी पोल्ट्रीशेडला टाळे लावले आहे,’’ असे राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य अतुल पेरसपुरे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.