Success Story of Poultry Business Management : कौडगाव (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील भगवान रोडे यांची साडेपाच एकर शेती आहे. पत्नी अनिता, चौथीत शिकणारा मुलगा साईराज व चार वर्षांची मुलगी श्रुती असे त्यांचे कुटुंब आहे. पती-पत्नी दोघेही पूर्णवेळ शेती करतात.
त्यातून मजुरांवरील अवलंबित्व कमी केले आहे. तीन-चार वर्षांपासून रोडे कुटुंब शेतातच राहतात. हंगामी बागायतीत ते कपाशी घ्यायचे. त्यातून फारसे काही पदरी पडत नव्हते. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांची ठिबक यंत्रणा बसवून देणे, झाडांची आखणी (मार्क आउट), रोजमजुरी यातून भगवान प्रपंच पुढे नेत होते.
स्वतःच्या शेतीचा विकास
दुसऱ्यांच्या शेतात राबत राहण्यापेक्षा आपल्याच शेतीत प्रगती करावी असं भगवान यांना वाटू लागलं. सात वर्षांपूर्वी प्रत्येकी अडीच एकरांत सीताफळ व पेरू लागवड केली. काही कारणाने पेरूची बाग यशस्वी झाली नाही. ती काढून पूर्ण सीताफळ बाग विकसित केली. चांगल्या उत्पादनातून आज या पिकातून रोडे दांपत्य समाधानकारक उत्पन्न मिळवत आहे.
केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही हे भगवान यांनी वेळीच ओळखले. मित्रमंडळींच्या चर्चेतून पोल्ट्री व्यवसायाचे महत्त्व पुढे आले. छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्रातून त्याचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर २०२० मध्ये १०० बाय ३० फूट आकाराचे साध्या पद्धतीचे शेड शेतात उभारले. त्यात ५०० ब्रॉयलर पक्ष्यांचे संगोपन सुरू केले. काटेकोर लक्ष घालून कष्टाने पहिल्या बॅच यशस्वी केल्या. त्यातून आत्मविश्वास वाढल्याने दोन हजार पक्ष्यांच्या तीन बॅच अशा रीतीने पहिल्याच वर्षी पाच बॅच घेण्यात भगवान यशस्वी झाले.
व्यवसायाची वृद्धी
पोल्ट्री व्यवसाय हा शेतीला मुख्य आर्थिक आधार ठरू शकतो याची जाणीव झाल्यानंतर २०२१-२२ मध्ये पुन्हा ६० बाय ३० फूट आकाराचे शेड बांधून पक्षी संगोपनगृहाची क्षमता सुमारे साडेतीन हजार पक्ष्यांपर्यंत पोहोचविली. सन २०२२-२३ मध्ये १५० बाय ३० फूट आकाराचे शेड बांधून सात हजार पक्षी संगोपनापर्यंत क्षमता पोहोचविली.
आज एका शेडमध्ये तीन ते साडेतीन हजार पक्षी व त्यानंतर वीस दिवसांनी दुसऱ्या शेडमध्ये तेवढ्याच पक्ष्यांचे संगोपन अशी पद्धती अवलंबिली आहे. यामुळे चक्राकार पद्धतीने पैसा येत राहतो. एका बॅचमधून मिळालेला पैसा पुढील गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतो. एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याची वेळ येत नाही.
व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
सध्याच्या प्रति तीन हजार ते साडेतीन हजार पक्ष्यांच्या बॅचसाठी १३० क्विंटलपर्यंत मका, तीन टन डीओसी (तेलविरहित पेंड), एक टन ‘स्टार्टर’, दहा हजार रुपयांचा भुस्सा किंवा तूस, दहा हजार रुपयांचे औषध आदींची गरज भासते.
प्रति शेडसाठी सात ते आठ लाखांची तर दोन शेडससाठी किमान १६ लाख रुपयांची गुंतवणूक. १८ ते ४५ रुपये दराने पक्षी संगोपनासाठी मिळतो. पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा.
उष्णता व तापमान नियंत्रणासाठी प्रत्येक शेडभोवती महोगनी तसेच अन्य वृक्षांची लागवड.
आंध्र प्रदेशातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या धर्तीवर शेडवर वेली लावून त्यांचे नैसर्गिक, हिरवेगार आच्छादन.
पोल्ट्री देतेय शेतीपेक्षा अधिक उत्पन्न
भगवान सांगतात की शेतीपेक्षा पोल्ट्री व्यवसायानेच आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. त्यातूनच २५ लाखांचे शेड उभारता आले. नवी सीताफळ बाग उभारता आली. शेततळे घेता आले. मका खाद्यासाठी गोदाम बांधता आले. त्यामुळे या व्यवसायातून समाधानी झालो आहे.
खाद्य विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न
प्रत्येक पोल्ट्री व्यावसायिकाला खाद्य म्हणून तांदळाचे तूस वा भुश्शाची गरज भासतेच. आंध्र प्रदेश किंवा अन्य ठिकाणाहून ते उपलब्ध होते. भगवान देखील तेथूनच खरेदी करीत. परंतु अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी त्यातील व्यावसायिकांशी संपर्क वाढवून त्याची विक्रीही सुरू केली.
आठवड्याला पाच टनांपर्यंत तूस विक्रीचे उद्दिष्ट असते. त्यातून महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्यापासून भगवान यांनी शेतीत रासायनिक खतांचा वापर कमी केला आहे.
प्रति बॅच सुमारे सुमारे एक ट्रॉली खत उपलब्ध होते. आपल्या शेतात वापर करून उर्वरित खताची विक्री ते शेतकऱ्यांना जागेवरून साडेतीन हजार रुपये प्रति ट्रॉली या प्रमाणे करून त्यातूनही उत्पन्नाचा अजून एक स्रोत मिळवला आहे.
विक्री व अर्थकारण
वर्षभरात सुमारे सहा बॅचेस होतात. प्रति पक्षी संगोपनाचा खर्च किमान १८३ रुपये येतो. ४५ दिवसांनी पक्षी अडीच किलो वजनापर्यंत झाल्यानंतर त्याची विक्री होते. आजवरच्या अनुभवानुसार प्रति किलो ८०, ९० रुपये तर कमाल १०० ते १२० रुपयांपर्यंतही दर मिळाला आहे. खर्च वजा जाता सरासरी १५ ते २० रुपये प्रति पक्षी उत्पन्न मिळते. छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण येथील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात.
भगवान रोडे, ९५११९३१३६५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.