Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनग्रस्त जनावरांकडे नको दुर्लक्ष...

सध्याच्या काळात आजारी जनावरांचे व्यवस्थापन आणि शुश्रूषा व्यवस्थितपणे केल्यास अशी जनावरे दुय्यम लक्षणांतूनही लवकर व पूर्णपणे बरी होतील.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ.अनिल भिकाने,डॉ.रवींद्र जाधव

उपचारपद्धती, बाधित जनावरांची प्रतिकारशक्ती (Animal Immunity) तसेच पशुपालकांकडून लम्पी स्किन आजाराने बाधित जनावराचे योग्य व्यवस्थापनातून सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सध्याच्या काळात आजारी जनावरांचे व्यवस्थापन (Livestock Management) आणि शुश्रूषा व्यवस्थितपणे केल्यास अशी जनावरे दुय्यम लक्षणांतूनही लवकर व पूर्णपणे बरी होतील.

राज्यात मागील दोन अडीच महिन्यांपासून गोवंशात लम्पी आजाराची साथ चालू असून लसीकरण जवळपास पूर्ण होवूनही काही जनावरांमध्ये अजूनही प्रादुर्भाव दिसत आहे.आजाराची साथ चालू झाल्यापासून पशुसंवर्धन विभाग तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार या आजाराचा योग्य पद्धतीने उपचार केले जात आहेत. आजाराच्या तीव्रतेनुसार बाधित जनावरांच्यामध्ये विविध लक्षणे आढळून येत आहेत.

Lumpy Skin Disease
Crop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका

हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर १०० टक्के प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांनी जनावरावर तत्काळ योग्य उपचार करून घेतला ती जनावरे बरी होत आहेत. मागील १५ ते २० दिवसांपासून अवकाळी पावसाची संततधार चालू असल्याने बऱ्याच आजारी जनावरांना योग्य निवारा उपलब्ध न झाल्याने तसेच अशी जनावरे पावसात भिजल्याने ओलसर जागेवर किंवा चिखलात बसल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊन आजार बळावत आहे. पावसामुळे प्रतिकूल वातावरण त्याचप्रमाणे कीटकांची वाढलेली उत्पत्ती ही आजाराच्या प्रसारास आणि तीव्रतेस कारणीभूत ठरत आहेत.

Lumpy Skin Disease
Crop Damage : आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

गोठ्यातील प्रसार थांबवण्यासाठी उपाय ः

१) बाधित जनावरांना विलगीकरण करून निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.जेणेकरून निरोगी जनावरांना आजाराची बाधा टाळता येते.

२) बाधित जनावरांच्या सानिध्यात आलेल्या सर्व जनावरांना गृह विलगीकरण (होम क्वारेनटाईन) करून २८ दिवस आजारांच्या लक्षणासाठी देखरेखीखाली ठेवावे.

३) बाधित जनावरांना आजारपणामध्ये त्याचप्रमाणे आजारातून बरे झाल्यानंतर किमान ३५ दिवस चराऊ क्षेत्रात प्रवेश देण्यात येवू नये.

४) बाधित जनावरांच्या गोठ्याचे नियमित २ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे. जेणेकरून विषाणू संक्रमणास आळा घालता येईल.

५) बाधित त्याचप्रमाणे सर्व निरोगी जनावरे आणि गोठयामध्ये बाह्यपरजीवी निर्मूलनासाठी बाह्यपरजीवीनाशक फवारणी करावी.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे १४ जनावरे दगावली

लम्पी आजार झालेल्या जनावरांचे व्यवस्थापन ः

१) जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे त्यांचा आहार व पाणी पिणे उच्चतम राहील याकडे लक्ष द्यावे.

२) आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लूसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा खुराक द्यावा.

३) पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात दिवसातून ४ ते ५ वेळा उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ टाकून दिल्यास खनिज क्षार व ऊर्जा मिळण्यास मदत होईल.

४) ज्या बाधित जनावरांना मानेवरील व छातीवरील सुजेमुळे मान घाली घेता येत नाही अशा जनावरांना चारा व पाणी मुबलक प्रमाणात तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून अशा जनावरांचा आहार व्यवस्थित राहील.

५) आजारी जनावरे चारा खाणे कमी केले असेल तर अशा जनावरांना उर्जावर्धक औषधे तोंडावाटे (प्रोपायलीन ग्लायकॉल) देण्यात यावीत.

६) रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे खनिजक्षार मिश्रण देण्यात यावे.

७) जनावरे आजारातून बरी होईपर्यंत त्यांना जीवनसत्वे तसेच यकृतवर्धक औषधे नियमितपणे देण्यात यावीत.

८) रक्तक्षय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळी संध्याकाळी किमान २१ दिवस देण्यात यावीत.

९) ओटीपोटातील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्री आणि प्रोबायोटीक औषधे त्याचप्रमाणे भूकवाढीसाठी औषधे देण्यात यावीत.

१०) आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे ही खुराक किंवा पाण्यातून देण्यात यावीत.

११) अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना कोरडा व स्वच्छ निवारा उपलब्ध करून देण्यात यावा. जेणेकरून ऊन, पाऊस व चिखल यांपासून जनावरांचे संरक्षण करता येईल. प्रतिकूल वातावरणामुळे जनावरांत निर्माण होणारा ताण टाळता येईल.

१२) ज्या जनावरांना पायांवर किंवा छातीवर मोठ्या प्रमाणावर सूज आहे अशा जनावरांना मिठाच्या कोमट पाण्याचा दिवसातून दोन वेळा शेक द्यावा. मॅग्नेशिअम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लीसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते.

१३) ज्या जनावरांच्या पायाच्या सुजेवरील भागात किंवा कातडीवरील गाठी फुटून जखमा झाल्या असतील अशा जखमांचे नियमितपणे ड्रेसिंग करावे. जखमांवर माश्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिवसातून दोन वेळ हर्बल स्प्रे मारावा.

१४) जनावरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, दिवसातून ३ ते ४ वेळेस बोरोग्लीसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर हाताच्या बोटांनी लावावे.

१५) रोगी जनावरांच्या नाकामध्ये बऱ्याच वेळा अल्सर निर्माण होतात, नाक चिकट स्त्रावानी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट व कडक होतो, त्यामुळे श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्याने नियमितपणे नाकपुडी स्वच्छ करण्यात यावी. तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लिसरीन अथवा खोबरेल तेल किंवा गोडतेलाचे चार चार थेंब टाकावे जेणेकरून मऊपणा टिकून राहील व श्वसनासही त्रास होणार नाही. निलगिरी तेलाची वाफ दिली तर चांगला फायदा होतो.

जनावरांमधील जखमांवर उपचार ः

१) बाधित जनावरांमध्ये २ ते ३ आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषतः पायावरही जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून जखमा होतात. नवीन जखमा आढळून आल्यास नियमितपणे अशा जखमा ०.१ टक्के पोट्यॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने धुवून घ्यावे.

२) जखमा धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्हीडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे. त्यानंतर जखम बँडेजने हळुवारपणे बांधावी. जखमा बऱ्या होईपर्यंत नियमितपणे रोज अशा प्रकारे जखमांचे व्यवस्थापन करण्यात यावे.

३) जखमांवर माश्या आणि इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखमेच्या परिसरात फवारावा.

४) जखमेमध्ये आळ्या पडल्यास अशा जखमेत टरपेनटाईंनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा. त्यानंतर मृत आळ्या बाहेर काढून घ्याव्यात. अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारावा.

५) जखमा जास्त खोल व दूषित प्रकारच्या असल्यास अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावा.जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे.

लसीकरण झालेले असतानाही आजाराच्या प्रादुर्भावाची कारणे ः

१) लसीकरण केल्यानंतर शरीरामध्ये आजार प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी किमान १४ दिवसांचा कालावधी लागतो तर २८ व्या दिवशी परिपूर्ण आजार प्रतिकारशक्ती तयार होते. म्हणून लसीकरण केल्यावर २८ दिवसापर्यंत आजाराची बाधा होवू शकते. मात्र चौदा दिवसानंतर बाधेचे प्रमाण वरचेवर कमी होत जाते असे दिसून येत आहे.

२) या आजारावर सध्या जी लस उपलब्ध आहे ती म्हणजे गोटपॉक्स व्हॅक्सीन. ही लस हेटरोलॉगस आहे. लम्पी आणि गोट पॉक्स विषाणूत साधर्म्य आहे. त्यामुळे लम्पी स्कीन आजाराच्या विरोधात ही लस वापरली जाते परंतु ही लस लम्पी विरोधात १०० टक्के प्रतिकार शक्ती देवू शकत नाही. सर्वसामान्यपणे ७० टक्के जनावरांत प्रतिकारशक्ती मिळते.

३) लसीकरण राहिलेल्या किंवा लसीकरण न केलेल्या आणि शेवटच्या टप्प्यातील गाभण गाईमध्ये लसीकरण केले गेले नसल्यामुळे त्यांच्यात हा आजार दिसून येत आहे. याशिवाय ४ महिन्याखालील वासरांचेही लसीकरण शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले नाही. गाभण गाईमध्ये लसीकरण केले नसल्याने नवजात वासरांना आईकडून चिकातून मिळणारी प्रतिकारशक्ती मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात प्रामुख्याने आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

४) लसीकरण केल्यावर उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण होण्यात प्रादूर्भावीत भागात प्रतिकूल हवामानाचा विशेषतः सातत्याने पडणाऱ्या पावसाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निवारा नसलेली जनावरे पावसात भिजत आहेत, बऱ्याच जनावरांना बसायला कोरडी जागा नाही. पावसामुळे पोटभर खायला मिळत नाही, या सर्व गोष्टींमुळे जनावरांची उपासमार व ताण येऊन प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरे या आजाराने बाधित होत आहेत.

लसीकरण केलेल्या जनावरांत प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी उपाय ः

१) लसीपासून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी उत्तम चारा, प्रथिनयुक्त खुराक, खनिज मिश्रणे व विविध जीवनसत्त्वाची टॉनिक देण्यात यावीत.

२) लसीकरण झालेल्या जनावरांत प्रतिकूल हवामानामुळे जसे, की जास्त ऊन थंडी किंवा पाऊस यामुळे त्यांच्या शरीरावर ताण येऊन प्रतिकारशक्तीचा स्तर खालावतो, म्हणून सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात यावा.

३) गोठ्यातील जनावरे बसायची जागा नियमितपणे स्वच्छ व कोरडी ठेवण्यात यावी.

४) लसीकरणानंतर बैलांना किमान १४ दिवस आराम द्यावा, जड शेतीकामे लावू नयेत .

५) गोमाशा व गोचीड प्रादुर्भाव होवू नये म्हणून दर आठवड्यास गोठ्यामध्ये शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी.

आजारी वासरांचे व्यवस्थापन ः

१) नवजात वासरांना जन्मल्यानंतर दोन तासांच्या आत चीक पाजावा. जेणेकरून वासरांमध्ये उत्तम नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल.

२) वासरांना कोरडा व हवेशीर निवारा उपलब्ध करून द्यावा.

३) वासरांचे प्रतिकूल वातावरणापासून जसे ऊन, पाऊस, थंडी यांपासून संरक्षण करावे.

४) वासरांमध्ये बाह्यपरजीवीचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी योग्य व्यवस्थापन करावे.

५) वासरांचे नियमित जंतनिर्मुलन करावे.

६) आहारात जीवनसत्त्व व खनिज मिश्रणाचा वापर करावा.

७) वासरांना पुरेशे दूध पाजावे. काफ स्टार्टर रेशन द्यावे.

८) गाभण गाईचे लसीकरण करून घेतले तर वासरास चीकाद्वारे आपोआप उत्तम रोग प्रतिकारशक्ती मिळेल.

९) चार महिन्याच्या वरील वासरांचे लसीकरण करून घ्यावे.

संपर्क ः डॉ.अनिल भिकाने, ९४२०२१४४५३

(संचालक (विस्तार शिक्षण), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com