
पुणे ः ‘‘राज्यात लम्पी स्कीन आजार (Lumpy Skin Disease) नियंत्रणात आला आहे. गुरुवार (ता.२०) अखेर ३२ जिल्ह्यांतील २ हजार ८६९ गावांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १ लाख २२ हजार ७१५ बाधित पशुधनापैकी (Livestock) एकूण ७८ हजार ३४१ पशुधन उपचाराने (Livestock Treatment) बरे झाले आहे.
उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. तर राज्यात ७ हजार ८७७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे,’’ अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रसाद सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले, ‘‘लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळून आल्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यांत शुक्रवार (ता.२१) अखेर एकूण १ कोटी ४ लाख ९७ हजार लसी देण्यात आल्या आहेत.
त्यामधून एकूण १ कोटी ३३ लाख ९२ हजार पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव, नगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशीम, जालना, हिंगोली आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणामध्ये सुमारे ९५.७१ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.’’
...तर ‘पशुसंवर्धन’शी संपर्क साधावा
‘लम्पी स्कीन’बाबत विभागाच्या काही सेवांची आवश्यकता वाटत असल्यास संबंधितांनी पशुवैद्यकीय दवाखाना, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त स्तरावर किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००- २३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले.
देशात ८५ हजार पशुधनाचा मृत्यू
‘लम्पी स्कीन’मुळे देशात बुधवार (ता. १९) अखेर ८५ हजार ६२८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थानमध्ये ५५ हजार ४४८, पंजाबमध्ये १७ हजार ६५५, गुजरातमध्ये ५ हजार ८५७, हिमाचल प्रदेशमध्ये ४ हजार ३४७ व हरियानामध्ये २३२१ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. तर महाराष्ट्रात गुरुवार (ता.२०) अखेर ७ हजार ८७७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.