
डॉ. गणेश निटूरे
Livestock Management: लम्पी त्वचा आजार हा साथीचा आजार आहे. आजारामुळे पायावर सूज येऊन जनावर लंगडते, ताप येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्वचेखाली २ ते ५ सेंमी आकाराच्या गाठी येतात. आजाराच्या नियंत्रणासाठी गोवर्गीय वासरे, गाई, बैल यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. बाधित जनावरावर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच उपचार करावा.
लम्पी त्वचा आजार हा देवी वर्गातील कॅप्रीपॉक्स प्रवर्गातील विषाणूमुळे पसरतो. हा साथीचा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे गोवर्गीय जनावरांमध्ये दिसतो. म्हैस, शेळी-मेंढी व इतर प्राण्यामध्ये हा आजार दिसत नाही. आढळला नाही. विषाणूवाहक डास, माश्या, गोचिड, चिलटे ई. कीटक तसेच बाधित जनावरांच्या संपर्कातील वस्तू, जखमा, नाकातील स्राव यामुळे आजाराचा प्रसार होतो.
लक्षणे
१०४ ते १०५ अंश फॅरानहाइटपर्यंत ताप येतो, पायावर सूज येऊन जनावर लंगडते, ताप येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्वचेखाली २ ते ५ सेंमी आकाराच्या गाठी येतात.
गळा व मागील पायाजवळील लसिका ग्रंथी सुजतात, हालचाल तसेच भूक मंदावते, दूध उत्पादनात घट येऊन नाक व डोळ्यावाटे स्राव गळतो.
उपचार
आजाराची लक्षणे दाखवणारे जनावर दिसताच तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा. जनावराचे विलगीकरण करून त्वरित उपचार सुरू करावेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
गोवर्गीय वासरे, गाई, बैल यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
गोठा स्वच्छ ठेवावा, नियमितपणे गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी सोडियम हायपोक्लोराइड किंवा १ टक्का फॉर्म्यालिनचे द्रावण वापरावे.
डास, माशी व गोचिड इत्यादी रोगप्रसारक कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक बाह्यपरोपजीविनाशकाची फवारणी करावी. यासाठी १ लिटर पाण्यात १० मिलि करंज तेल, १० मिलि कडुलिंब तेल, ४० ग्रॅम अंगाचा साबण एकत्र करून हे मिश्रण जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात ३ दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारणी करावी.
निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून स्वतंत्र बांधावे. त्यांना पाणी व चारा स्वतंत्र द्यावे.
परिसरातील रोगप्रादुर्भाव कमी होईपर्यंत नवीन जनावरांची खरेदी करू नये.
जनावरांची अनावश्यक वाहतूक टाळावी. तसेच गोवर्गीय जनावरे पशू बाजार, यात्रा व इतर ठिकाणी एकत्रित येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
बाधित गोठ्यातील व्यक्तींना निरोगी गोठ्यात प्रवेश देताना त्यांनी आवश्यक निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करावी. शक्यतो असे प्रवेश देणे टाळावे.
लम्पी बाधित जनावरांची निगा राखणाऱ्या व्यक्तीने इतर पशुपालकांच्या, पशुधनाच्या संपर्कात येऊ नये.
जनावरांना चरण्यास सोडू नये तसेच सामूहिक पाणी स्रोताच्या ठिकाणी पाणी पाजावयास नेऊ नये.
निरोगी जनावरांमध्ये आजाराची लक्षणे दिसतात काय? याची नियमित पाहणी करावी.
बाधित जनावरांच्या संपर्कातील निरोगी जनावरांना आयव्हरमेक्टिन इंजेक्शन दिल्यास प्रसार कमी होण्यास मदत होऊ शकते.
कुठल्याही परिस्थितीत हा आजार लपवून ठेवू नये.
जनावरांचे व्यवस्थापन
हा विषाणूजन्य आजार असल्याने खात्रीशीर उपचार उपलब्ध नाही. बाधित जनावरावर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच उपचार करावा.
बाधित जनावरांचे निरोगी जनावरांपासून विलगीकरण करावे. विलगीकरणात ऊन, वारा, पाऊस यापासून त्यांचे संरक्षण करावे.
आजारी जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी समतोल आहार द्यावा. ज्यामध्ये हिरवी वैरण, पेंड, खनिज मिश्रणे, हर्बल लिव्हर टॉनिक, पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी प्री आणि प्रो-जैविक औषधांचा समावेश करावा.
मान आणि फऱ्यावर सूज असल्यामुळे जी जनावरे वैरण खात नाहीत, त्यांना हाताने वैरण खाऊ घालावी.
तोंडावाटे औषधे पाजणे टाळावे. औषधे पाण्यामध्ये मिसळून द्यावे किंवा भरड्यामध्ये औषध कालवून त्याचे गोळे/लाडू करून जनावरांस खाऊ घालावेत.
काही बाधित जनावरे पायावरील सुजेमुळे बसत नाहीत. अशा जनावरांना चटका बसणार नाही अशा मीठ घातलेल्या गरम पाण्याचा (हे मिश्रण तयार करताना मीठ गरम पाण्यामध्ये जोपर्यंत विरघळत राहते तोपर्यंत टाकावे) शेक कापडाने सुजेवर द्यावा. दिवसातून असे दोन वेळा सकाळ-संध्याकाळ करावे. सुजेची जागा पाण्याने पुसून कोरडे करूनच वरीलप्रमाणे शेक द्यावा.
सूज शेकण्यासाठी मॅगनेशिअम सल्फेटची बारीक केलेली पावडर आणि त्यामध्ये ग्लिसरीन मिसळून या मिश्रणाचा लेप सुजलेल्या जागेवर दोन वेळा लावावा. सूज दोन्ही पायांमध्ये असल्यास हा लेप लावल्यानंतर सुजेखालून कापड पाठीवर बांधावे.
जनावरांच्या संपूर्ण अंगावर गाठी आहेत, त्यांचे अंग मिठाच्या द्रावणाने दिवसातून दोन वेळा पुसून घ्यावे.
जनावरे बांधण्याची जागा कोरडी असावी. जी जनावरे उठत नाहीत त्यांच्या अंगाखाली पोते, वाळलेले गवत टाकावे, त्यांची बाजू बदलत राहावी जेणेकरून त्यांना जखमा होणार नाहीत. तसेच त्यांना शक्य असल्यास उठण्यासाठी अॅनिमल लिफ्टरचा वापर करावा.
अंगावरील जखमांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने रोज ड्रेसिंग करावे. अंगावर कापूर आणि खोबरेल तेल याचे मिश्रण करून ठीक-ठिकाणी कापसाने लावावे.
तोंडातील तसेच कासेवरील जखमा पोटॅशिअम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुऊन व त्यावर बोरोग्लिसरीन लावावे. लम्पीबाधित जनावरांच्या नाकामधून चिकट स्त्राव येतो. तो वाळून गेल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी कोमट पाण्यात कापड ओले करून नाकपुडी पुसून स्वच्छ करावी. मान वर करून नाकामध्ये बोरोग्लिसरीन टाकावे. तसेच जास्त सर्दी असलेल्या जनावरांना निलगिरी तेल टाकून गरम पाण्याची वाफ द्यावी.
आजाराच्या नियंत्रणासाठी ८० टक्के सेवा-शुश्रूषा आणि २० टक्के औषधोपचार हेच तत्त्व प्रभावी असल्याचे निरीक्षण माफसू विद्यापीठातील संशोधकांनी नोंदविले आहे. त्यामुळे उपचारासोबत उत्तम व्यवस्थापन, पौष्टिक आहार, जैव सुरक्षा उपाय योजना, बाह्यपरोपजीवी कीटकनाशक प्रतिबंध या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाधित गाभण गाईमध्ये गर्भपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे गाभण जनावरांची काळजी घ्यावी.
बाधित गायींच्या वासरांना सडावाटे दूध पाजणे टाळावे. त्यांना दूध उकळून थंड करून किंवा इतर निरोगी गाईचे दूध बाटलीने पाजावे.
बाधित जनावरांच्या अंगावरील गाठी/जखमा, जखमांवरील खपल्या तसेच बाधित जनावरांच्या उपचारासाठी वापरलेले इतर जैविक साहित्य सर्व एकत्र करून जाळावे.
आजारातून बरी झालेली जनावरे पशुवैद्यकांच्या सल्याने पूर्ण खात्री करून निरोगी जनावरांमध्ये मिसळावीत.
बाधित जनावरांना लसीकरण करू नये.
लम्पी बाधित जनावरांचा मृत्यू झाल्यास शासकीय पशुवैद्यकांना याची माहिती देवून शव पाण्याच्या स्त्रोतापासून दूर आठ फूट खोल खड्डा खोदून त्यावर चुना टाकून पुरावे.
- डॉ. गणेश निटूरे, ९९७०१२३२२०, (पशुधन विकास अधिकारी, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, रेणापूर,जि.लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.