Animal Husbandry : पशुपालकांना वीज, कर, व्याज सवलत
Mumbai News : पशुसंवर्धन विभागाला कृषीचा दर्जा दिल्याने पोल्ट्री, पशुसंवर्धन विषयक व्यावसायिकांना वीज, कर, व्याज सवलत देण्याबरोबरच राज्यभरात समान दराने करआकारणी केली जाणार आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या शासन आदेशात कृषी क्षेत्राला पुरवठा करण्यात येणारी सवलतीच्या दरात वीज, सौरऊर्जा पंप, संच उभारणी अनुदान, समान दराने ग्रामपंचायत कर आणि पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर ४ टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे.
राज्यात उत्पन्न वाढीस चालना देऊ शकतील असे ८ घटक महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने निश्चित केले आहेत. त्यापैकी कृषी व सलग्न या घटकांचा समावेश आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा १२ टक्के तर कृषी क्षेत्राच्या पशुजन्य उत्पन्नाचा वाया २४ टक्के आहे. त्यामुळे पशुधनास चालना देण्यासाठी भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कृषी समकक्ष दर्जा देण्याची मागणी होत होती.
पशुपालकांना भेडसावणाऱ्या कृषी वीज दराच्या तुलनेत जास्त वीज दर, सौर ऊर्जेसाठी अनुदानाचा अभाव, ग्रामपंचायत कर, शेती कर्जाच्या व्याज दराच्या तुलनेत अधिक व्याज दराची आकारणी या प्रमुख समस्या होत्या. या अडचणींचे निराकरण झाल्यास पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढून पशुजन्य उत्पादनात वाढ होईल. व्यावसायिक नफ्यात वाढ होईल आणि नफ्यात वाढ होऊन स्पर्धात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल, असा अंदाज आहे.
त्यामुळे पशुजन्य उत्पादित बाबीस मूल्यसंवर्धन साखळीची निर्मिती, शेती प्रमाणे गट पद्धतीने पशुसंवर्धन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यासारख्या बाबींमध्ये आपोआप वाढ होईल. यासाठी सवलती देणे आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे होते. या संदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषणा केली होती. त्यानुसार सरकारने शासन आदेश काढला आहे.
राज्यात गायवर्गीय १ कोटी ३९ लाख ९२ हजार ३०४ तर म्हैसवर्गीय ५६ लाख ०३ हजार असे १ कोटी ९५ लाख ९५ हजार पशुधन आहे. या पशुधनावर ६० लाख कुटुंबे अर्थाजन करत आहेत. १० हजार मांसल आणि २५ हजार अंड्यांवरील पक्षी असलेल्या कुक्कुट उद्योगाला लघू, तर २५ हजार मांसल आणि ५० हजार अंड्यांवरील पक्षी असलेल्या कुक्कुट उद्योगाला मध्यम प्रकल्प समजले जाते.
५० दुधाळ जनावरांचा गोठा, २०० शेळी-मेंढी गोठा, १०० पर्यंतच्या वराह पालन व्यवसायास लघू स्वरूपाचा व्यवसाय समजण्यात येतो. १०० दुधाळ जनावरांचा गोठा, ५०० शेळी-मेंढी गोठा आणि २०० पेक्षा जास्त वराह पालन यास मध्यम व्यवसाय समजण्यात येतो. या लघू व मध्यम स्वरूपाच्या व्यवसायाकडे इतर लोकांनी आकृष्ट व्हावे यासाठी विविध लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध प्रकारचे लाभ देण्यात येणार आहेत.
यामध्ये २५ हजारपर्यंत मांसल व ५० हजारांपर्यंत अंड्यांवरील कुक्कुट पक्षी क्षमता, ४५ हजारांपर्यंत क्षमतेच्या हॅचरी युनिट, १०० पर्यंत दुधाळ जनावारांचा गोठा, ५०० पर्यंत शेळी व मेंढी गोठा, २०० पर्यंत वराहपालन व्यवसायांचा समावेश आहे.
तसेच यामध्ये ब्रिडर कुक्कुटपालन व्यवसाय व पशुजन्य उत्पादनावरील प्रक्रिया उद्योगांना कृषी समकक्ष दर्जाचा लाभ देण्यात येणार नाही.
...असे मिळतील फायदे
- सवलत देण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन उद्योगांना व्यावसायिक दराने वीज आकारणी न करता कृषी वर्गवारीप्रमाणे वीज दर लागू करण्यात आला आहे.
- या व्यवसायांसाठी सौरऊर्जा पंप, सौर ऊर्जा संच उभारण्यास अनुदान आणि सवलत देण्यात येणार आहे.
- पशुपालन हा स्वतंत्र व्यवसाय न समजता शेती व्यवसाय समजून ग्रामपंचायत कर आकारणी राज्यभरात समान दराने आकारली जाईल.
- खेळत्या भागभांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी पंजाबराव देशमुख व्याज सललत योजनेच्या धर्तीवर इतर प्रयोजनासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात ४ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.