Poultry Diseases : कोंबड्यांतील रोगनिदानामध्ये शवविच्छेदन महत्त्वाचे...

Poultry Autopsy : शवविच्छेदन हे मुख्यत: मृत्यूचे कारण जाणण्याकरिता करावे लागते. त्यामुळे आपणाला रोगनिदान करण्यासाठी योग्य दिशा मिळते.
Poultry Diseases
Poultry DiseasesAgrowon

डॉ. व्ही. एस. धायगुडे
Poultry Management : शवविच्छेदन हे मुख्यत: मृत्यूचे कारण जाणण्याकरिता करावे लागते. त्यामुळे आपणाला रोगनिदान करण्यासाठी योग्य दिशा मिळते. वेळेवर निदान झाल्यामुळे साथीच्या रोगांपासून इतर निरोगी कोंबड्यांचा वेळीच बचाव करण्यासाठी उपाययोजना करता येतात.

शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टम हा शब्द सर्वपरिचित आहे. रोग निदानामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषत: कोंबड्यांना होणाऱ्या रोगांच्या निदानामध्ये शवविच्छेदन खूपच महत्त्वाचे ठरते. याचे कारण म्हणजे, कोंबड्यामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे जवळपास सारख्या प्रकारची असतात म्हणून त्यांना रोगनिदानात विशेष महत्त्व नसते. परंतु रोगांमुळे शरीरातील विविध अवयव, उतीमध्ये होणारे बदल हे संबंधित रोगाविषयी सूचक असतात आणि त्याआधारे अचूक रोगनिदान करून योग्य प्रतिबंध तसेच औषधोपचार निवडता येतो.

शवविच्छेदन म्हणजे काय?
मृत कोंबडीची शास्त्रोक्त पद्धतीने चिरफाड करून त्यांच्या अंतर्गत अवयवांची, त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांची तपासणी म्हणजे शवविच्छेदन. खालील काही बाबींवरून शवविच्छेदनाचे महत्त्व स्पष्ट करता येईल.
१) शवविच्छेदन हे मुख्यत: मृत्यूचे कारण जाणण्याकरिता किंवा मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी करावे लागते. त्यामुळे आपणाला रोगनिदान करण्यासाठी योग्य दिशा मिळते. अशारीतीने वेळीच रोगनिदान झाल्यामुळे साथीच्या रोगांपासून इतर निरोगी कोंबड्यांचा वेळीच बचाव करण्यासाठी उपाययोजना करता येते.
२) रोगाचे निदान झाल्यामुळे इतर निरोगी कोंबडीसाठी उपचार व लसीकरण करण्यासाठी योग्य दिशा मिळते.

Poultry Diseases
Livestock Disease : पशुरोगनिदानात शवविच्छेदन महत्त्वाचे...

३) विविध संसर्गजन्य रोगाचा (उदा. मानमोडी, गंबारो, कोलीसेप्टीसेमिया इत्यादी) कोंबड्यांमध्ये प्रादुर्भाव होतो, परंतु काही वेळेस या रोगांची लक्षणे दिसत नाहीत. तेव्हा फक्त शवविच्छेदनच रोगनिदानात महत्त्वाची भूमिका बजावते.
४) विमा काढलेल्या कोंबड्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार अपरिहार्य असते. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी मृत्यूमुळे झालेली नुकसान भरपाई देत नाही.
५) सरकारी अनुदानांवर विकत घेतलेल्या कोंबड्यांचे मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे आवश्यक असते. त्याशिवाय त्यांच्या मृत्यूचा दाखला देता येत नाही. पर्यायाने शासनातर्फे मिळणारी नुकसान भरपाई मिळत नाही.
६) नैसर्गिक आपत्तीमुळे (वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे, वाहून जाणे, जळून जाणे, गारपिटीमुळे मृत्यू) मृत्यू झाला असेलच शवविच्छेदन करून ते सिद्ध करता येते. त्यानंतरच मिळणारा मृत्यूचा दाखला कुक्कुटपालकास नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक असतो.

७) संशोधनासाठी एखाद्या नवीन रोगाच्या प्रादुर्भावाने किंवा गूढ मृत्यूमुळे पशू-पक्षी दगावले असतील तर त्याच्या शरीरातून विविध अवयव, रक्त, विष्ठा इत्यादी नमुने शासकीय / निमशासकीय, खासगी प्रयोगशाळेत पाठवून मृत्यूचे कारण निश्‍चित केले जाते. हे केवळ शवविच्छेदनाद्वारेच शक्य होते.
८) कुक्कुटपालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे ती म्हणजे कोंबडी आजारी पडताच किंवा रोगाची साथ येताच मृत कोंबडीचे शवविच्छेदन करूनच पशुवैद्यकांच्या सल्ल्याने पुढील कार्यवाही करावी.
----------------------------------------
संपर्क ः डॉ. व्ही. एस. धायगुडे, ९८६०५३४४८२
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com