
डॉ. वरद आनंदगावकर, डॉ. ईशा आकरे, डॉ. रणजित इंगोले
Animal Diseases: जनावरांतील संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी तसेच जनावराचे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पशुशवविच्छेदन आवश्यक आहे. जनावरांमध्ये रोगनिदान प्रामुख्याने रोगाचे लक्षण, प्रयोगशाळेत रोग नमुने तपासणी किंवा मृत पशूचे शवविच्छेदन करून केले जाते.
जनावरांना झालेला रोग शोधण्याची प्रक्रिया व त्यावरून काढलेले अनुमान म्हणजे रोगनिदान होय. अचूक रोगनिदान ही अचूक व योग्य उपचारांसाठी आवश्यक असलेली पहिली पायरी आहे. व्यावसायिक पशुपालानामध्ये कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. व्यावसायिक पशुपालनामुळे उत्पादन वाढीसोबतच, अति उत्पादनाच्या आणि हवामानातील अचानक होणाऱ्या बदलामुळे जनावरांवर ताण येऊन विविध शारीरिक तक्रारी आणि साथींच्या रोगांचे प्रमाण वाढले.
जनावरांमध्ये उपचार करताना पशुवैद्यक शारीरिक तपासण्या करून, विविध लक्षणांच्या साह्याने रोगांचा अंदाज बांधतात, आजारी जनावरांवर उपचार करतात. जनावरांतील बरेच आजार एकसारखी लक्षणे दाखवितात, काहीतरी लक्षणेसुद्धा दाखवत नाही. अशा परिस्थितीमध्ये आजाराचे निदान करणे अत्यंत कठीण होते. विशिष्ट उपचार न झाल्यामुळे, आजारी जनावर दगावतात. आजार जर संसर्गजन्य असेल तर बाकी जनावरांना प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. हे रोखण्यासाठी मृत किंवा आजारी जनावरांचे योग्य ते परीक्षण करून आजाराचे निदान करणे अत्यंत महत्त्वाचे असते. एकदा निदान झाल्यानंतर विशिष्ट उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाय करून आजाराला आळा घालू शकतो. मृत्यूचे संभाव्य कारण निश्चित करण्यासाठी मेलेल्या जनावराचे शास्त्रोक्त पद्धतीने विच्छेदन करून, दिसणाऱ्या विशिष्ट जखमांचे निरीक्षण करून निदानासाठी अतिरिक्त चाचण्यासह, प्रयोगशाळेत नमुने तपासून ते जनावर कशाने मरण पावले याचा शोध घेणे म्हणजे शवविच्छेदन होय.
शवविच्छेदनाचे फायदे :
१) हा रोगनिदनाचा अविभाज्य भाग आहे. परीक्षणात जनावराची चिरफाड करून सखोल तपासणी करू शकतो. जनावराचा प्रत्येक अवयव डोळ्यांनी बघून त्यात होणाऱ्या बदलांची नोंद घेऊ शकतो.
२) सोनोग्राफी किंवा इतर इमेजिंग परीक्षणात आपल्याला एखादा अवयव आकाराने मोठा झालेला वगेरे समजू शकते, परंतु शवविच्छेदन परीक्षणात अवयव किती मोठा झाला त्याचा आकार, रंग वगेरे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो.
३) जिवंत जनावरामध्ये बऱ्याच रोगांमध्ये आजाराची समान लक्षणे दिसतात, म्हणून याकरिता शवविच्छेदन परीक्षणात संशयित रोगाशी संबंधित रोग नमुने परीक्षण करून जनावर कोणत्या आजाराने मरण पावले हे जाणून घेता येते.
४) शवविच्छेदन परीक्षणात जनावराला कोणता रोग होता, त्या रोगाची काय तीव्रता होती, रोगाचा प्रसार कसा झाला, कोणती अवयव रोगामुळे ग्रस्त झाली इत्यादी गोष्टी लक्षात येतात.
५) बरेचदा प्रक्षेत्रावर जनावर मरण पावले असता त्याचे शवविच्छेदन न करताच त्याची विल्हेवाट लावली जाते, परंतु रोगाच्या प्रादुर्भावाची तपासणी करण्यासाठी जनावराचे शवविच्छेदन करणे हे एक अतिशय उपयुक्त साधन आहेत.
६) शवविच्छेदन हे आपल्याला केवळ मरण पावलेल्या प्राण्यांबद्दलच नाही तर कळपातील इतर जनावराबद्दलही खूप मौल्यवान माहिती देऊ शकते.
७) एकच मृत्यू हा एखाद्या मोठ्या उद्रेकाचा पहिला कारण आहे की केवळ एकच घटना आहे, याची माहिती मिळते.
८) जनावर कसे, केव्हा आणि का मरण पावले हे लक्षात येते. मृत्यूचे कारण समजल्यामुळे कळपातील इतर जनावरांना योग्य तो औषधोपचार करणे सोयीचे होते.
९) बरेचदा शवविच्छेदन परीक्षणात जनावर कशाने मरण पावले हे निश्चितपणे सांगणे शक्य होत नाही. याकरिता मेलेल्या जनावराचे रोग नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवून योग्य ते परीक्षण करून निश्चित कारण सांगता येते.
१०) न्यायप्रविष्ट बाबींमध्ये जनावराचे मृत्यूचे कारण जाणून घेण्याकरिता शवविच्छेदन तपासणीचे खूप महत्त्व आहे.
११) शवविच्छेदन तपासणी संशोधन आणि विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक ज्ञान प्रगत करण्यास मदत करते.
शवविच्छेदन करतानाच्या आवश्यक बाबी :
१) जनावर मरण पावल्यावर त्याचे शवविच्छेदन लवकर करणे आवश्यक असते. प्रत्यक्षात शवविच्छेदन तपासणी करण्यापूर्वी जनावराच्या मालकाकडून किंवा योग्य प्राधिकरणाकडून तसे करण्याची मागणी पत्र आवश्यक असते.
२) शवविच्छेदन तपासणी शक्य तितक्या लवकर आणि दिवसाच्या प्रकाशात करावे. शवविच्छेदन तपासणी मंद प्रकाशात करू नये कारण मृत शरीरातील बदल स्पष्टपणे लक्षात येत नाहीत.
३) मृत जनावराच्या मालकाने जनावराचे मरणापूर्वी दिसणारे लक्षणे तसेच केलेला औषधोपचार याबद्दल सखोल माहिती शवविच्छेदन करणाऱ्या पशुवैद्यकास द्यावी. जेणेकरून त्याचा संबंध जनावराचे शवविच्छेदन दरम्यान दिसणाऱ्या जखमांशी लावून योग्य रोगनिदान शक्य होईल.
४) विमा उतरवलेल्या जनावरांच्या बाबतीत संबंधित विमा कंपनीच्या सक्षम अधिकाऱ्याकडून पत्र विनंती प्राप्त असणे आवश्यक असते.
पशू शवविच्छेदनाची गरज ः
१) मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी.
२) अपघात, विषबाधा इत्यादी अशा कोणत्याही न्यायप्रविष्ट कायदेशीर प्रकरणांसाठी.
३) विमाधारक पशूसाठी मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यासाठी.
४) वैज्ञानिक संशोधन प्रमाणित करण्याकरिता.
५) जेव्हा साथीच्या किंवा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.
६) कोणत्याही संशयित प्रकरणांमध्ये उदा. जनावर वीज पडून मरणे, पाण्यात बुडून मरणे, वीज धक्का लागून मरणे, इत्यादी.
मृत जनावराच्या देहाची विल्हेवाट ः
१) मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी जाळणे आणि पुरणे या दोन पद्धती आहेत. मृत जनावर मृत्यू पावलेल्या जागेपासून ते विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणापर्यंत नेताना त्याच्या शरीरातून रक्त, लाळ, किंवा इतर स्राव जमिनीवर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी जनावरांच्या नैसर्गिक छिद्रामध्ये जंतुनाशकाच्या द्रावणामध्ये बुडविलेले कापसाचे बोळे कोंबावेत. मृत जनावरे ओढत नेऊ नये.
२) मृत जनावर पुरण्यासाठी साधारणतः ६ ते ८ फूट खोल जनावरांच्या लांबी रुंदीपेक्षा २ फूट जास्त लांब रुंद खड्डा खोदावा. खड्ड्यामध्ये जनावरे पुरताना पाठीकडील भाग खालच्या बाजूला व पायाचा भाग वरच्या बाजूला ठेवावा. मृत्यूनंतर ताठ झालेल्या पायाची हाडे मोडावीत. खड्यामध्ये चुनखडी किंवा खडे मीठ टाकावे.
३) जनावर पुरल्यानंतर त्याच्या शरीरावर ३-४ फूट मातीचा थर यावा ज्यामुळे कुत्रे किंवा वन्य प्राणी माती खरडून काढू शकणार नाही. पुरल्यानंतर त्या ठिकाणी काटेरी कुंपण घालावे. त्यावर दगडे ठेवावीत.
४) मृत जनावर पुरण्याची जागा वस्तीपासून दूर असावी तसेच नदी/ नाला किंवा तलावा जवळची नसावी.
५) जनावर जाळणे ही थोडी खर्चिक पद्धत आहे. जनावर जाळण्यासाठी लाकडे, पालापाचोळा, वाळलेले गवत इत्यादीचा वापर करता येतो. जनावर जाळण्यासाठी आधुनिक काळात विद्युत दाहिनी किंवा पेट्रोल/रॉकेल दाहिनीचा वापरही करण्यात येतो.
६) मृत जनावराची विल्हेवाट लावल्यानंतर जनावर नेण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन आणि इतर वस्तू निर्जंतुक करावे. जनावरांच्या उपचारासाठी वापरलेल्या सुया, औषधे, उरलेले खाद्य, औषधोपचाराच्या काळात वापरलेले अंथरून इत्यादी सर्व जाळावे. गोठ्यातील जागा जंतुनाशक द्रावणाच्या साहाय्याने धुवून घ्यावी. निर्जंतुकीकरणासाठी १० टक्के कॉस्टिक सोडा, ४ ते ५ टक्के फोर्मेलीन द्रावण किंवा क्लोरीनचे द्रावण वापरावे.
संपर्क : डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४
(सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख, पशुविकृती शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.