Infectious Animal Diseases : पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून जनावरांच आरोग्य कसे सांभाळावे?

Animal Health Care : पावसाळ्यात तापमान कमी आणि हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे वातावरणात ओलसरपणा कायम राहतो. अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू, बुरशीची वाढ होत असल्यामुळे जनावरांच्यामध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करावेत.
Infectious Animal Diseases
Infectious Animal DiseasesAgrowon

एस.एस.संकपाळ, डॉ.व्ही.जे.गिम्हवणेकर

Animal Husbandry : तापमानात होणारा बदल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता किंवा टंचाई आणि वैरणीत होणाऱ्या बदलाचा परिणाम जनावरांची वागणूक, आरोग्य तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या झालेला दिसतो. यामुळे दूध उत्पादनात घट होते. पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी व्यवस्थापनात काही बदल करावे लागतात.

जनावरांचा गोठा नियमित स्वच्छ ठेवावा. गोठ्यात पावसाची सर येणार नाही किंवा छतामधून पाणी गळणार नाही याची दक्षता घ्यावी. गोठ्याच्या आजूबाजूला गवत किंवा झाडे झुडपे वाढू देऊ नये, आजूबाजूला गवत किंवा झाडे झुडपे असल्यास त्यांचा नायनाट करावा.

१) पावसाळ्याच्या सुरवातीला जनावरांना कृमिनाशक औषधाची मात्रा द्यावी. जनावरांचे खाद्य पावसाने ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.

२) जनावरांचा गोठा गळत असेल तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम जनावरांच्या प्रजनन व कार्यक्षमतेवर होतो. कारण अशा गोठ्यांमधील वातावरण ओलसर व कोंदट राहते. गोठ्यामध्ये जर हवा खेळती राहत नसेल तर अमोनिया साठतो,त्याचा जनावरांच्या डोळ्यावर परिणाम होतो. जनावरांच्या शरीराची आग होऊन खाज सुटते. जनावर अस्वस्थ होते, उत्पादन क्षमता कमी होते.

३) शेडमध्ये ओलसर वातावरण राहत असल्यास कोंबड्यांमध्ये कॉक्सीडायोसीसचा प्रादुर्भाव दिसून येतो.

४) पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने विविध प्रकारचे रोगकारक जिवाणू तसेच विषाणू वाढतात. हे लक्षात घेऊन लसीकरण करून घ्यावे (उदा. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी पायखुरी इत्यादी).

Infectious Animal Diseases
Animal Care : जनावरांची पाण्याची गरज कशी ओळखायची?

५) जनावरांच्या वागणुकीवर लक्ष ठेवावे. आजारी जनावरावर उपचार करावेत.

६) पावसाळ्यामध्ये गवताची वाढ जोमाने होते. पावसाळ्यात माळरानात वाढलेले गवत मऊ असते. जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात आणि कोरडा चारा कमी खातात. या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते, तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असते.

त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते. जनावरांना हगवण लागते. हे लक्षात घेता पावसाळ्यात जनावरांना दैनंदिन आहारात हिरव्या गवतासोबतच वाळलेला कोरडा तंतुमय चारा द्यावा.

७) बाह्य शरीरावर असणाऱ्या गोचिडांचा जनावरांना त्रास होतो. गोचीड जनावरांचे शरीरातील रक्त शोषतात.तसेच आजारांचा प्रसार करतात (उदा. थायलेरीया). गोचिडाचा चावा जनावरांना फार वेदनादायक असतो. गोचीड वारंवार चावा घेत असल्याने जनावर अस्वस्थ राहते, परिणामी दूध उत्पादन कमी मिळते. हे लक्षात घेऊन गोचिड नियंत्रणाचे उपाय राबवावेत.

८) अधिक दूध उत्पादनक्षम गाईंना कासदाह होतो. परिणामी दूध उत्पादनात घट येते. त्यामुळे कासदाह होणार नाही याकडे लक्ष द्यावे. गोठा नियमित स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करावे. गाई,म्हशीचे दूध काढण्याअगोदर तसेच दूध काढल्यानंतर कास कोमट पाणी तसेच पोटॅशिअम परमँगनेटच्या द्रावणाने स्वच्छ धुवावी.दूध काढण्याकरिता यंत्राचा वापर होत असेल तर यंत्राचेसुद्धा नियमित निर्जंतुकीकरण करावे.

९) पावसाळ्यात साठवलेल्या पशुखाद्याची योग्य काळजी घ्यावी. साठवून ठेवलेले ओले किंवा कोरडे खाद्य पावसाच्या पाण्यामुळे ओले झाल्यास त्यावर बुरशीची वाढ होते व असे बुरशीजन्य खाद्य जर जनावरांनी खाल्ले तर जनावरांना बुरशीजन्य आजार होतात.बरेचदा विषबाधा होते.

जनावरांची घ्यावयाची काळजी

१) अस्वच्छता, ओलाव्यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडतात. पावसाळ्यात तापमान कमी असले, तरी हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे वातावरणात ओलसरपणा कायम राहतो. अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू व बुरशीची वाढ होत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते.

२) गोठ्यातील स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. गोठ्यात जर खड्डे असतील, तर ताबडतोब ते मुरूम टाकून बुजवावेत. मलमूत्राचा योग्य निचरा करावा. यासाठी गोठ्यात थोडा उतार करावा.

३) पावसाचे पाणी गोठ्यात साचणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या बाहेरील बाजूस गोणपाटाचे पडदे लावावेत, यामुळे जास्त गारव्याचासुद्धा त्रास होणार नाही.

४) गोठ्यातील जमीन कोरडी करण्यासाठी चुन्याची पावडर, गहू किंवा ज्वारीच्या तुसात मिसळून त्याचा पातळ थर गोठ्यात अंथरावा, यामुळे हवेतील आर्द्रता शोषून घेण्यास मदत होईल.

Infectious Animal Diseases
Lumpy Skin Disease : लम्पी स्किन आजारानं पुन्हा डोक वर काढलं ; तीन जनावरे दगावली

५) पावसाळ्यात जीवजंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे जनावरांना स्वच्छ ठेवावे. गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.

६) गोठा जंतुनाशक द्रावणाने अधून-मधून स्वच्छ करावा, त्यामुळे मासा,चिलटांचा प्रादुर्भाव कमी होईल.

७) जनावरांना विविध आजार हे जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीविजन्य असतात. पावसाळ्यात बाह्यपरजीवींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्यामुळे जनावरांना सरा, थायलेरिऑसिस, बॅबेसिऑसिस, तसेच लहान जनावरांमध्ये ब्लू टंग सारखे आजार होतात. हे लक्षात घेऊन तातडीने उपाय करावेत.

८) शिफारशीनुसार लसीकरण करणे फार गरजेचे आहे. लहान,मोठ्या जनावरांमध्ये आंतरपरजीवींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशके पाजावीत.

९) पावसाळ्यात वासरे बऱ्याच आजारांना बळी पडतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. लहान वासरांना पावसाळ्यात न्यूमोनिया हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये वासरांना श्वास घेताना त्रास होतो, घसा व छातीतून श्वास घेताना खरखर असा आवाज येतो, ताप येतो.

या रोगामुळे पावसाळ्यात वासरे दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. वासरांना कोरड्या जागेत बांधावे. भरपूर हवा व सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी बांधावे. स्वच्छ पाणी प्यावयास द्यावे.

१०) पावसाळ्यात जनावरांचे खाद्य ज्या ठिकाणी साठवून ठेवले आहे, तेथे पावसाचे पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी; कारण खाद्य ओले झाल्यास बुरशी लागते. जनावरांना असा चारा दिल्यास जनावरे आजारी पडतात. त्यामुळे जनावरांचा चारा, खाद्याची साठवणूक कोरड्या जागेवर करावी.

११) पावसाळ्यात अनेक विषारी वनस्पती उगवतात, अजाणतेपणे ते खाऊ घातल्यास जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य गुणवत्तेचा चारा जनावरांच्या आहारात असावा.

संपर्क - एस.एस.संकपाळ,७७०९३१८२७८ (कृषी महाविद्यालय आचळोली, ता. महाड, जि. रायगड)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com