Animal Husbandry : पशुसंवर्धन सांख्यिकी अहवालातून दिशादर्शन

Animal Husbandry Statistical Report 2023 : नुकताच मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी अहवाल- २०२३ शासकीय स्तरावर प्रसारित झाला आहे. या अहवालानुसार आपल्या पशुसंवर्धन क्षेत्राची कामगिरी समजायला मदत होते.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

डॉ. प्रवीण बनकर

Statistics Report of Animal Husbandry : पशुधनाचे सर्व्हेक्षण करून नोंदविलेली निरीक्षणे ही पशुसंवर्धन सांख्यिकी अहवाल म्हणून शासकीय स्तरावर संकलित केली जातात. अहवालातील आकडेवारी भविष्यकाळासाठी पथदर्शक असतो. हा अहवाल जसा पशुधन संशोधक अभ्यासकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो तसा पशुपालक, प्रगतिशील शेतकरी यांसह पशुधनासंबंधीत लहानमोठे व्यापारी, लघू उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.

नमुना सर्व्हेक्षण अहवालातील आकडेवारीनुसार उद्योजक पुढील काळातील व्यावसायिक संधी कळते. नुकताच मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी अहवाल- २०२३ शासकीय स्तरावर प्रसारित झाला आहे, त्यानिमित्ताने आपल्या पशुसंवर्धन क्षेत्राची कामगिरी समजायला आपल्याला मदत होते.

हा नमुना सर्व्हेक्षण १ मार्च २०२२ पासून २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संकलित केलेल्या तपशीलवार अवलंबून आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी अहवालातील प्रातिनिधिक निष्कर्ष हे दिशादर्शक असतात.

लोकर उत्पादनात वाढ

भारताचे एकूण लोकर उत्पादन ३३.६१ दशलक्ष कि.ग्रॅ. असून, मागील वर्षीपेक्षा २.१२ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. राजस्थान (४७.९८ टक्के), जम्मू व काश्मीर (२२.५५ टक्के), गुजरात (६.०१ टक्के), महाराष्ट्र (४.७३ टक्के) आणि हिमाचल प्रदेश (४.२७ टक्के) ही लोकर उत्पादन करणारी आघाडीवरील राज्ये आहेत. यांचा राष्ट्रीय लोकर उत्पादनातील वाटा ८५.५४ टक्के आहे.

एकूण लोकर उत्पादनात मेंढी (७२.१७ टक्के), एडका (१३.९२ टक्के) आणि कोकरे (१३.९१ टक्के) समावेश होतो.

लोकर उत्पादनाचा वार्षिक वृद्धिदर हिमाचल प्रदेशात सर्वाधिक (३५.७५ टक्के) असून त्याखालोखाल राजस्थान (६.०६ टक्के) व झारखंड (२.३६ टक्के) यांचा तर महाराष्ट्र (०.४३ टक्का) राज्याचा आहे.

पशुधन सांख्यिकी अहवालातील नमूद आकडेवारीवरून आपल्याला राज्यातील स्थानिक आव्हाने आणि संधी यांची कल्पना येऊ शकते. शासकीय, विद्यापीठ स्तरीय किंवा स्थानिक संघटनात्मक स्तरावर पशुधनाबाबत ध्येयधोरणे बनविताना असा अहवाल निश्‍चितपणे मार्गदर्शक ठरणारा आहे.

Animal Husbandry
Animal Husbandry: देशात पशु-पक्ष्यांच्या आठ नवीन जातींची नोंद

मांस उत्पादनाची स्थिती

भारताचे एकूण मांस उत्पादन ९.७७ दशलक्ष टन असून, जागतिक क्रमवारीत आठवा क्रमांक आहे. मांस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश (१२.२० टक्के), पश्‍चिम बंगाल (११.९३ टक्के), महाराष्ट्र (११.५० टक्के), आंध्र प्रदेश (११.२० टक्के) आणि तेलंगणा (११.०६ टक्के) ही प्रमुख आघाडीवरील राज्ये असून त्यांचा वाटा जवळपास ५८ टक्के आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत मांस उत्पादनात ५.१३ टक्क्यांनी वाढ झालेली असून, यात कुक्कुट पक्ष्यांचे योगदान निम्म्याहून अधिक आहे.

इतर मांस उत्पादक पशूंच्या तुलनेत कुक्कुट क्षेत्रात ४.५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मांस उत्पादक पाळीव पशूंचे योगदान लक्षात घेता कोंबडी (५१.१४ टक्के), म्हैस (१७.६१ टक्के), शेळी

(१४.४७ टक्के), मेंढी (१०.५१ टक्के), वराह (३.८५ टक्के) आणि गोवंश (२.४३ टक्के) यांचा समावेश होतो.

वार्षिक मांस उत्पादनातील वृद्धी दर पाहता, सिक्कीम राज्य आघाडीवर (६३.०८ टक्के) आहे. दरडोई मांस उपलब्धता गतकाळापेक्षा ७.१० कि.ग्रॅ. प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती अशी आहे.

दूध उत्पादनाचा आलेख

विदेशी वंशाच्या गायी/ संकरित गायींचे दरडोई दूध उत्पादन क्षमता सरासरी ८.५५ कि.ग्रॅ. प्रतिदिन इतकी असून भारतीय / देशी वंशाच्या गायींची दरडोई दूध उत्पादन क्षमता सरासरी ३.४४ कि.ग्रॅ. प्रतिदिन इतकी आहे. संख्यात्मकदृष्ट्या आपल्याला देशी गोवंशाची उत्पादकता कमी भासत असली, तरी त्यांचे पशुधनातील एकूण संख्याबळ लक्षात घेता, एकूण दूध उत्पादनातील त्यांचे मोठे योगदान आहे.

राष्ट्रीय स्तरावर दूध उत्पादन वाढ ३.८३ टक्क्यांनी अधिक झालेली आहे. गोवंश (विदेशी/ संकरित : ३.७५ टक्के आणि देशी : २.६३ टक्के) आणि म्हैस (३.६९ टक्के) यांच्यातील वाढ आहे. राष्ट्रीय स्तरावरील दूध उत्पादनातील वाढता आलेख पाहिल्यास क्रमवारीत कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्र (५.१५ टक्के) याचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील देशी व अवार्णित म्हणजेच गावठी गोवंशाचे दूध उत्पादनातील लक्षणीय योगदान पाहता, विविध भागांतील गावठी पशुधनाची शास्त्रोक्त पद्धतीने नोंदणी करून त्यांची दूध उत्पादन क्षमता पडताळणे गरजेचे आहे.

अंडी उत्पादनाची स्थिती

अंडी हा प्राणीजन्य प्रथिनांचा स्वस्त स्रोत आहे. दिवसेंदिवस परसातील कुक्कुटपालन करणाऱ्या लघू व मध्यम कुक्कुटपालकाचा कल व्यावसायिक कुक्कुटपालन करण्याकडे आहे. ही रोजगार आणि अन्नसुरक्षा या दोन्ही शाश्‍वत ध्येयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे.

भारतातील वार्षिक अंडी उत्पादन १३८.३८ अब्ज इतकी असून, गत पाच वर्षाच्या तुलनेत ६.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जागतिक क्रमवारीत आपला अंडी उत्पादनाचा ३ क्रमांक असून, दरडोई उपलब्धता १०१ अंडी प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती इतकी आहे. भारतात पश्‍चिम बंगाल राज्यात दरडोई अंड्यांची उपलब्धता सर्वाधिक म्हणजे ५२६ अंडी प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती असून, महाराष्ट्रात केवळ ५९ अंडी प्रतिवर्ष प्रतिव्यक्ती इतकी आहे.

भारतात सर्वाधिक अंडी उत्पादन करणाऱ्या राज्यात आंध्र प्रदेश (२०.१३ टक्के), तमिळनाडू (१५.५८ टक्के), तेलंगणा (१२.७७ टक्के), पश्‍चिम बंगाल (९.९३ टक्के), कर्नाटक (६.५१ टक्के) या दाक्षिणात्य राज्यांचा वरचष्मा असून, राष्ट्रीय अंडी उत्पादनात सुमारे ६५ टक्के वाटा आहे.

एकूण अंडी उत्पादनात व्यावसायिक कुक्कुटपालन क्षेत्राचे योगदान ८५.४० टक्के (११८.१६ अब्ज) आणि परसातील (घरगुती) कुक्कुटपालन क्षेत्राचे योगदान १४.६० टक्के (२०.२० अब्ज) इतके आहे. अंडी देणाऱ्या सुधारित जातीच्या कोंबड्यांचा वाटा सर्वाधिक (८८.४१ टक्के) असून, त्याखालोखाल देशी कोंबड्या (१०.७३ टक्के), देशी बदक (०.७४ टक्के) व सुधारित बदक (०.१२ टक्का) यांचे योगदान आहे.

अंडी उत्पादनात पश्‍चिम बंगाल, सिक्किम, उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार या राज्यांची वाटचाल जोमदारपणे सुरू आहे. एकूण राष्ट्रीय अंडी उत्पादनात महाराष्ट्राचे योगदान पाहता, ५.३४ टक्के वाटा (७ वा क्रमांक) असून, ५.२२ टक्के इतका वृद्धिदर आहे.

Animal Husbandry
Animal Husbandry Advice : पशुपालन सल्ला

दूध उत्पादनात आघाडीची राज्ये

दरडोई दुधाळ पशूंचे दूध उत्पादन जागतिक तुलनेत कमी असले तरी भारतात पशुधनाच्या आधिक्यामुळे जागतिक स्तरावर आपला एकूण दूध उत्पादनातील प्रथम क्रमांक आपण राखून आहोत. स्थानिक पातळीवरील गवळ्यापासून ते संघटित दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगापर्यंत ही अभिमानाची बाब आहे.

मागील वर्षीच्या (२०२१-२०२२ : २२२.०७ दशलक्ष टन) तुलनेत आजमितीला २३०.५८ दशलक्ष टन ही दूध उत्पादनातील सकारात्मक वाढ ग्रामीण भागातील दूध व्यवसायात उतरलेल्या युवावर्गासाठी आशादायी आहे.

भारतात एकूण दूध उत्पादनात सर्वाधिक वाटा (सुमारे १५.७२ टक्के) उत्तर प्रदेश राज्याचा असून त्याखालोखाल राजस्थान (१४.४४ टक्के), मध्य प्रदेश (८.७३ टक्के), गुजरात (७.४९ टक्के), आंध्र प्रदेश (६.७० टक्के) आणि महाराष्ट्र (६.५२ टक्के) यांचा क्रमांक लागतो. या प्रमुख सहा राज्यांचा एकूण दूध उत्पादनातील वाटा निम्म्याहून अधिक आहे.

दरडोई भारतीयास सरासरी ४५९ ग्रॅम प्रतिदिन इतके दूध उपलब्ध असून, यात सर्व राज्यांच्या तुलनेत, पंजाब राज्यात सर्वाधिक (१२८३ ग्रॅम/दिन) तर महाराष्ट्रात ३२९ ग्रॅम/दिन इतकी दरडोई दूध उपलब्धता आहे. एकूण दूध उत्पादनात दरडोई पशूंची दूध उत्पादन क्षमता तसेच विविध दुधाळ पशूंचे योगदानसुद्धा महत्त्वपूर्ण ठरते.

दूध उत्पादनात विविध पशूंचे योगदान

म्हैस

जातिवंत देशी ३१.९४ टक्के

गावरान / गावठी/ अवर्णीत १२.८७ टक्के

गोवंश

संकरित २९.८१ टक्के

जातिवंत देशी १०.७३ टक्के

गावरान / गावठी/ अवर्णीत ९.५१ टक्के

विदेशी १.८६ टक्के

शेळी

देशी व इतर ३.३० टक्के

- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९

(सहायक प्राध्यापक, पशू आनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्ना.प.प. संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com