Nagar News : नगर जिल्ह्यात सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालय (College of Veterinary) होत आहे. हे महाविद्यालय करण्यासाठी सावळी विहीर (ता. राहता) येथील कृषी विज्ञान केंद्राची (Agriculture Science Center) ७५ एकर जागा देण्यात येणार आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) व कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्यात झालेल्या बैठकीत ही जागा देण्याला मान्यता देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे पहिलेच सरकारी पशू वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे.
पशुसंवर्धन, दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या बाबत बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विज्ञान केंद्राची जागा देण्यास मान्यता दिली.
बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्ध विकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सहसचिव माणिक गुट्टू आदी उपस्थित होते.
मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले, की विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी अर्थसंकल्पात नगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेची घोषणा केली होती. त्यानुसार नगर येथे हे महाविद्यालय होत आहे.
यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सुस्पष्ट आराखडा तयार करावा. महाविद्यालयासह परिसरात विविध विभाग, शेत आणि चारा उत्पादन क्षेत्र चालविण्यासाठी जागेची आवश्यकता असून, यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या १२५ एकरांपैकी ७५ एकर जागा निश्चित करण्यात येत आहे.
यासाठी सर्व प्रक्रिया संबंधितांनी त्वरित मार्गी लावाव्यात. या महाविद्यालयात पशू विज्ञान केंद्र, पदविका महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करावा.
महाविद्यालय परिसरात पशुवैद्यकीय चिकित्सालय संकुल, सुसज्ज बाह्य आणि आंतररुग्ण विभाग आणि ग्राहकांसाठी निवास सुविधा असणार आहे. वैद्यकीय, शस्त्रक्रिया, निदान, रूग्णवाहक चिकित्सालयीन विभाग असतील.
पशुधन प्रक्षेत्र संकुलमध्ये पशुधन, विविध प्रजातींचे प्राणी, चिकित्सा शिकविण्यासाठी उत्पादन न करणाऱ्या प्राण्यांचे एकक, चारा आणि चारा उत्पादन क्षेत्र यांच्या देखभालीसाठी पशुधन युनिट आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत, असे विखे पाटील यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.