Team Agrowon
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कन्नड व सिल्लोड तालुक्यातील वादळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता. 11) शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
सत्तार म्हणाले, की अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड तालुक्यातील पाणपोई फाटा, औराळा, जेहुर, निपाणी तसेच सिल्लोड तालुक्यातील सोनअप्पावाडी, बोरगाव वाडी, भराडी, डोईफोडा शिवारातील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, सध्या राज्यात सातत्याने वातावरणातील बदलामुळे एक वेगळं निसर्गचक्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
राज्यात आतापर्यंत तीन वेळा अशी आपत्ती आली असून गेल्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात पंचनामे पूर्ण करून सरकारने आतापर्यंत सर्वाधिक 12 हजार कोटींची मदत नुकसानग्रस्तांना दिली. असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.