मुंबई : राज्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढत असल्याने राज्य सरकारने पशुसंवर्धन आयुक्तांच्या (Commissioner Of Animal Husbandry Department) अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची (Task Force For Lumpy Skin) स्थापना केली आहे.
राज्यात ४ ऑगस्ट रोजी एका गोवंशीय पशुधनास ‘लम्पी स्कीन’ची बाधा झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा संसर्गजन्य आजार वेगाने पसरत असून, सध्या २२ पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. ‘लम्पी स्कीन’सदृश जनावर आढळल्यानंतर पाच किलोमीटर परिसरातील जनावरांना लसीकरण करणे आवश्यक आहे. तसेच बाधित जनावर सापडलेल्या क्षेत्राला नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात येते. वेगाने पसरत असलेल्या या आजारामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.
प्रशासकीय पातळीवर खबरदारीची उपाय म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. तरीही अनेक ठिकाणी जनावरांची खरेदी विक्री होत आहे. त्यामुळे हा आजार पसरत आहे. बाहेरून जनावरे खरेदी करून आणल्यानंतर त्यांच्यात या आजाराची लक्षणे आढळत आहेत. हा आजार नियंत्रणात आला नाही तर त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच आगामी गळीत हंगामामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते, अशा वेळी हा आजार पसरण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेतली जात आहे.
त्यामुळे राज्य सरकारने टास्क फोर्सची निर्मिती केली असून, ‘लम्पी स्कीन’चा आढावा घेणे, आजार नियंत्रणात आणावयासाठी वेळोवेळी उपाययोजना अमलात आणणे, स्थानिक पातळीवरील यंत्रणेस मार्गदर्शन करणे आणि आजार आटोक्यात आणण्यासाठी सरकारला सूचनांची शिफारस करणे आदींसाठी या टास्क फोर्सची निर्मिती केली असून, पशुसंवर्धन आयुक्त या फोर्सचे अध्यक्ष असतील. तसेच ही टास्क फोर्स उत्तर प्रदेशातील भारतीय पशुचिकित्सा संशोधन केंद्राच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहे.
...असा असणार ‘टास्क फोर्स’
या टास्क फोर्सचे सदस्य सचिव पशुसंवर्धन उपायुक्त असून, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त, पशुजैव पदार्थ निर्मिती प्रयोगशाळा सहआयुक्त, भारतीय पशू चिकित्सा संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ, नागपूर येथील पशू व मत्स विज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक, परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे परोपजीवीशास्त्र विभागप्रमुख, परळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख, उरळी कांचन येथील भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठानचे वरिष्ठ उपाध्यक्ष, पशु रोगनियंत्रण विभागाचे उपायुक्त आदी या टास्क फोर्समध्ये असतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.