Dairy Farming: गोपालनात चाऱ्यावरील खर्च नियंत्रणावर भर

Rural Success Story: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुल धनराज निकम यांनी स्वतःची चारा शेती, मुरघास निर्मिती आणि व्यवस्थीत नियोजनाद्वारे दुग्ध व्यवसाय फायदेशीर केला आहे. त्यांचा गोपालनातील खर्चावर नियंत्रण आणि कुटुंबीयांची साथ ही यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.
Dairy Farming
Dairy FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Management:

शेतकरी नियोजन । गोपालन

शेतकरी : राहुल धनराज निकम

गाव : देवगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

शेती : पाच एकर

जनावरांची संख्या : ७ गाई, ४ कालवडी

अहिल्यानगर जिल्ह्यातील देवगाव (ता. नेवासा) येथील राहुल धनराज निकम यांनी दोन गाईंपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसायात टप्प्याटप्प्याने वाढ केली आहे. सध्या गोठ्यात ७ गाई आणि ४ कालवडी असून दररोज ८० लिटर दुधाचे संकलन होते. व्यवसायात स्थिरता आल्यानंतर मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली.

दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी स्वतःकडील २ एकरांत चारा पिकांची लागवड केली आहे. अधिकाधिक चारा घरीच उत्पादित करून खर्च कमी करण्यावर भर दिला जातो. त्यातून पशुपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यास मदत झाली. व्यवसायात वडील धनराज, आई चंद्रकला, पत्नी पूनम यांची मदत राहुल यांना मिळते. पशुपालनात सुयोग बेहळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

Dairy Farming
Dairy Farming : जिरायती पट्ट्यात दुग्धव्यवसायातून समृद्धी

व्यवस्थापनातील बाबी

दररोज सकाळी साडेपाच वाजता गोठ्यातील कामांना सुरुवात होते. सुरुवातीला मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला आणून बांधल्या जातात. दूध काढणी पूर्ण झाल्यावर चारा व खुराक दिला जातो.

दररोज सकाळी एका गाईला साधारण २० किलोपर्यंत चाऱ्याची कुट्टी दिली जाते. त्यात प्रामुख्याने गिन्नी गवत, ऊस, मुरघास यांचा समावेश असतो. सकाळी देण्यासाठीची कुट्टी रात्रीच करून ठेवलेली असते.

मुक्तसंचार गोठ्यात गाईंना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी गव्हाणीची व्यवस्था केली आहे.

दुभत्या गाईला दूध देण्याच्या क्षमतेनुसार दररोज सकाळी व संध्याकाळी खुराक दिला जातो. त्यात प्रामुख्याने गोळीपेंड, सरकी पेंड व वालीस यांचा समावेश असतो.

सकाळी दूध काढणी, खाद्य दिल्यानंतर गाई दिवसभर मुक्त गोठ्यात मोकळ्या सोडल्या जातात. पुन्हा संध्याकाळी चार वाजता दूध काढणी, चारा व अन्य कामे केली जातात. सकाळप्रमाणेच सायंकाळी चारा, खुराक दिला जातो.

Dairy Farming
Dairy Farming Success: गोपालनात खाद्य, आरोग्य, गोठा व्यवस्थापनावर भर

नवजात वासरांची काळजी

जन्मानंतर तीन महिन्यांपर्यंत नवजात वासरांची विशेष काळजी घेतली जाते. वासरांना सुरुवातीला पुरेसे दूध पाजले जाते. वासराचे वय वाढेल तसे हळूहळू दुधाचे प्रमाण कमी केले जाते. त्यांना चारा खाण्याची सवय लावली जाते. साधारणपणे तिसऱ्या महिन्यात दूध पाजणे पूर्णतः बंद केले जाते. वयानुसार वासरांना खाद्य आणि आहार दिला जातो. योग्य व्यवस्थापनामुळे वासरे, कालवडीच्या वाढीला मोठी मदत होते.

आरोग्य व्यवस्थापन

लम्पी, लाळ्या खुरकूत यांचे प्राधान्याने प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. लसीकरण करण्यासाठी स्थानिक सरकारी पशुवैद्यकांची मदत व मार्गदर्शन घेतले जाते. लम्पीचे वर्षातून एकदा लसीकरण केले जाते. पुढील एक ते दीड महिन्यात लाळ्या-खुरकुताचे लसीकरण केले जाईल. गाई व कालवडींना दर तीन महिन्यानी जंताचा डोस दिला जातो.

Dairy Farming
Dairy Farming : दुष्काळात संघर्षातून टिकविलेला दुग्ध व्यवसाय

मुरघास निर्मिती

दुग्ध व्यवसायात सर्वाधिक खर्च हा चारा आणि खाद्यावर होतो. हा खर्च नियंत्रित केल्यास व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यास मदत मिळते. हीच बाब ध्यानात घेऊन राहुल निकम यांनी घरच्या शेतामध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. त्यामुळे जनावरांना दर्जेदार हिरवा आणि सकस आहार उपलब्ध होतो. याशिवाय चारा टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी शेतात मका लागवड करून त्यापासून मुरघास निर्मिती केली जाते. दरवर्षी सुमारे ३० ते ३५ टनांपर्यंत मुरघास तयार केला जातो. त्यासाठी मक्याच्या सुधारित वाणांची पेरणी केली जाते. मुरघासामुळे चारा टंचाईवर मात करणे शक्य होते. घरच्या शेतीतून मका उपलब्ध होत असल्याने खर्चही कमी होतो, असे राहुल निकम सांगतात.

शेणखताचा वापर

गोठ्यातून दरवर्षी सुमारे ४० टन शेणखत उपलब्ध होते. उपलब्ध शेणखताचा वापर चारा पिकांच्या लागवडीसह अन्य पिकांमध्ये केला जातो. त्यामुळे जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे. चाऱ्यासाठी केलेल्या मका लागवडीत शेणखताचा वापर, टोकण पद्धतीने लागवड आणि काटेकोर सिंचनासाठी ठिबकचा वापर केल्यामुळे उत्पादनात वाढ मिळाली आहे. शेणखताच्या वापरामुळे दर्जेदार चारा, पीक उत्पादनात वाढीसह सेंद्रिय कर्बही वाढला आहे, असे राहुल निकम सांगतात.

- राहुल निकम, ७२१८९१५१११

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com