Livestock Health : जनावरांवरील बाह्यपरजीवींचे नियंत्रण

Animal Care : जनावरांमध्ये विविध आजाराचा प्रसार करणाऱ्या कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे नियंत्रण करावे. जनावरांचे कीटकांपासून संरक्षण तसेच कीटक चावण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी गोठ्यात वनस्पतिजन्य गोचिडनाशकाचे द्रावण फवारावे.
Animal
Animal Agrowon
Published on
Updated on

Animal Husbandry : कीटक व गोचीड जनावरांचे रक्त शोषण करतात. आदिजीवजन्य आजारांचा (गोचीड ताप, बबेसिओसिस, ट्रीपनोझोमोसिस) प्रसारदेखील त्यांच्यामार्फत केला जातो. लम्पी त्वचा रोगाचा (विषाणूजन्य आजार) प्रसार हा प्रामुख्याने चावणाऱ्या माश्‍या, डास, गोचीड, पिसवा, चिलटे या बाह्य परोपजीवींकडून एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होतो. जनावरांमध्ये विविध आजारांचा प्रसार करणाऱ्या कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे नियंत्रण करावे.

भौतिक पद्धत

गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. गोठ्यातील जमिनीवर दिवसातील काही काळ ऊन पडेल व जमीन कोरडी होईल याचे नियोजन करावे.

गोठा व खिडक्या मच्छरदाणीसारख्या जाळीने आच्छादित करावा. त्यामुळे गोठ्यामध्ये कीटक प्रवेश करू शकत नाहीत.

गोठ्यामध्ये वायुविजन यंत्र बसवावे. या यंत्राला विद्युत पुरवठ्याची गरज नसते. यामुळे प्रदूषित हवा वर निघून जाते. शुद्ध हवा गोठ्यात खेळती राहते. गोठ्यातील आर्द्रतेचे प्रमाण व ओलावा कमी होतो.

गोठ्यामध्ये चुना मारून घ्यावा.

Animal
Animal Care : जनावरांमधील जखमांवर प्राथमिक उपचार

गोठ्याच्या सभोवतालची नाली बंदिस्त व स्वच्छ असाव्यात.

शेणाची योग्य विल्हेवाट लावावी. शेण खड्ड्यामध्ये टाकावे. उकिरडा शेण टाकल्यानंतर खड्डा पॉलिथिनने झाकावा.

गोठ्यातील भेगा, कपारींमध्ये असलेली गोचिडांची अंडी फ्लेमगन किंवा टेंब्याच्या साह्याने जाळून टाकावी.

गोठ्यातील गोचिडींच्या प्रजननाच्या जागा जसे की भेगा, फटी, छिद्रे, बिळे अशा जागा लिंपून घ्याव्यात.जनावरांचा नियमित खरारा करावा.

जैविक पद्धत

गोठ्यात गोचीड, गोचिडांच्या अंड्यांचे (डिंब अवस्था) नियंत्रण करण्यासाठी मेटारायझिमचा वापर करण्यासाठी होतो.

मेटारायझिमचे द्रावण जनावरांच्या शरीरावर फवारण्यासाठी वापरू नये. केवळ गोठ्यात फवारण्यासाठी याचा वापर करावा.

५ ग्रॅम मेटारायझिम पावडर अधिक ५ मिलि दूध प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.

गोठ्यामध्ये जिथे गोचीड, अंडी आहेत, त्या ठिकाणी द्रावणाची फवारणी करावी. रात्रीच्या वेळेस फवारणी करणे जास्त फायदेशीर ठरते.

वनस्पतिजन्य गोचिडनाशक

जनावरांना कीटक चावण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशकाचे द्रावण फवारावे. यासाठी निंबोळी तेल १० मिलि, करंज तेल १० मिलि, निलगिरी तेल १० मिलि, अंगाचा साबण २ ग्रॅम हे घटक एक लिटर पाण्यात मिसळावे. हे द्रावण व्यवस्थित ढवळावे. हे द्रावण गोठ्यात सर्व ठिकाणी आणि जनावराच्या शरीरावर फवारावे. कुठल्याही एक प्रकाराचे तेल न मिळाल्यास इतर दोन तेल प्रत्येकी १५ मिलि मिसळावे. जनावरांच्या डोळा, तोंडावर ही फवारणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

Animal
Animal Husbandry : भारतातील विविध समुदायांच्या पारंपारिक पशुपालन संस्कृतीचे भव्य चित्र

निंबोळी अर्काची फवारणी

उन्हाळ्यामध्ये पूर्ण पिकलेल्या निंबोळ्या गोळा करून भरपूर वाळवून साठवून ठेवाव्यात. फवारणीच्या एक दिवस अगोदर ५ किलो निंबोळ्या कुटून १० लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवाव्यात. फवारणीच्या दिवशी सकाळी मुलायम कापडातून हे द्रावण गाळून घ्यावे. चोथा फेकून द्यावा. गाळलेले द्रावण फवारणीसाठी वापरावे. तयार झालेल्या द्रावणात पाणी घालून एकूण द्रावण १०० लिटर करावे. हे द्रावण त्याच दिवशी जनावराचे शरीर, गोठा, नाली, शेणाच्या ढिगावर फवारावे. जनावरांच्या डोळा, तोंडावर ही फवारणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

गोचीडनाशकाचा वापर

पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत गोचिडनाशक फवारावे. जनावराच्या अंगावर फवारण्यासाठी प्रति लिटर पाण्यामध्ये २ मिलि गोचिडनाशक मिसळावे. गोठ्यामध्ये फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यामध्ये ४ मिलि वापरावे.

फवारणीवेळी घ्यावयाची काळजी

गोचीडनाशकांचा वापर करताना जनावरांचे तोंड, डोळे आणि नाक योग्य पद्धतीने झाकलेले असावे.

फवारणीपूर्वी जनावरांना भरपूर पाणी पाजलेले असावे.

जनावरांना उघड्या मैदानावर नेऊन गोचिडनाशकांची फवारणी करावी. शरीरावरील पाणी सुकेपर्यंत थांबावे.

चरावयाच्या कुरणावर गोचिडनाशकाची फवारणी करू नये.

शरीरास गोचीडनाशकाच्या फवारणीनंतर जनावराने शरीर चाटू नये म्हणून सुकेपर्यंत त्याच्या तोंडास मुंगसे बांधावे.

वापरलेली भांडी, गोचिडनाशकांसाठी वापरलेले डबे इतरत्र फेकू नयेत. जनावराने ते चाटल्यामुळे विषबाधा होऊ शकते.

वापरलेली भांडी जनावरांनी पाणी पिण्याच्या ठिकाणी धुऊ नयेत.

विषबाधा होणार नाही याची सर्व काळजी घ्यावी.

गोठा, गव्हाणीत गोचीडनाशकाची फवारणी करताना चारा, पाणी गोठ्यात नसावे.

- डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४

(पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, बाचणी, ता. कागल, जि. कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com