Nagar News : करंदी (ता. पारनेर) येथे राज्यातील पहिले लोकर प्रक्रिया उद्योग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. चार दिवसांपूर्वी (ता. १६ फेब्रुवारी) त्याबाबतचा अध्यादेश निघाला, याअगोदर हे केंद्र सर्वाधिक मेंढपाळ असलेल्या ढवळपुरी परिसरात होणार होते. परंतु करंदी येथे हे केंद्र होणारा असल्याने या निर्णयाला तालुक्यातील मेंढपाळ, नागरिकांनी विरोध केला आहे.
मेंढपाळाची संख्या अधिक असलेल्या व पूर्वी जाहीर केलेल्या ढवळपुरी येथे होणारे हे केंद्र दुसरीकडे नेण्याचे कारण काय? असा प्रश्न मेंढपाळांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात गावकरी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात मेंढ्यांची संख्या ३० लाखांवर असून दरवर्षी अंदाजे ९ हजार ८०० टन लोकरीचे उत्पादन होते. तथापि, राज्यात खरखरीत लोकरीवर प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्यामुळे मेंढीपालन करणाऱ्या समुदायाला आर्थिक फायदा होऊ शकत नाही.
देशाच्या अवर्षणप्रवण, अर्ध अवर्षण प्रवण, डोंगराळ भागात जेथे पीक आणि दूध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. तसेच अत्यल्प भूधारणा, अत्यल्प भूधारक शेतकरी व भूमिहीन मजुरांना उपजीविका करण्यासाठी मेंढ्याची मोठी मदत होते. मेंढ्यांना लोकर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. लोकर हे नैसर्गिक फायबर आहे.
लोकरीत थर्मल रेग्युलेशन, फ्लेम रेझिटेन्स, ध्वनिशास्त्र असे त्यात वेगवेगळे गुणधर्म आहेत. अनेक कापडाच्या प्रक्रियेत लोकरीचा वापर केला जातो. राज्यात नगर जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे सुमारे ३ लाख इतक्या मेंढ्यांची संख्या आहे. त्यातील सर्वाधिक संख्या पारनेर तालुक्यात आहे.
ढवळपुरी येथे हा प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मेंढपाळांचे वास्तव्य ढवळपुरी, धोत्रे, ढोकी, पळशी, वनकुटे या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथेच होणे गरजेचे असल्याचे या भागातील लोकांचे मत आहे. प्रकल्प दुसरीकडे जाण्याला पालकमंत्री, खासदारांना जबाबदार धरले जात आहे. मेंढपाळाचे वास्तव्य असलेल्या भागापासून करंदी हे गाव २० किलोमीटर अंतरावर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.