Radhika Mhetre
वयोमानाप्रमाणे शेळी, बोकड आणि लहान करडांची व्यवस्था करावी. आजारी आणि फुफ्फुसाचा आजार, जंत असे सांसर्गिक आजार झालेल्या करडांना ताबडतोब वेगळं करावं.
हिवाळ्यात करडं, कोकरांचा निवारा उबदार असावा, अन्यथा त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊन ते जीवघेणे होऊ शकते.
दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुल्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा खेळती राहील. रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.
करडं, कोकरांचा बिछाना कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे २ ते ३ दिवसांनी बदलावा. करडांचा निवारा हा नेहमी कोरडा, स्वच्छ आणि अमोनिया मुक्त असावा;
कोकरांना थंडी जास्त वाजत असेल तर छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. त्यामुळे करडांना सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल.
करडं, कोकरांना स्वच्छ आणि कोमट पाणी पिण्यासाठी दिले, तर त्यांची मूत्रसंस्था सुस्थितीत राहण्यास मदत होते. एखाद्या करडाला खूप थंडी लागली असेल, तर त्याचे शरीर कोमट पाण्यात ४ ते ५ मिनिटे बुडवून ठेवावे, पण डोके पाण्याच्या वर ठेवावे.
नवजात करडाला त्याच्या वजनाच्या दहा टक्के इतका चीक द्यावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती येते. पोट साफ होण्यास मदत होते. चीक पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण २ ते ३ टक्क्यांनी कमी करता येते.