
माळेगाव, ता. बारामती ः पशुधनाला लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) होऊ नये, म्हणून शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाबरोबर बारामती दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागानेही (Department Of Animal Husbandry) प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कंबर कसली आहे.
बारामतीमधील शिर्सुफळ, वडगाव निंबाळकर, पारवडी, लोणीभापकर, काटेवाडी आदी गावांमध्ये १५ ते २० जनावरांना लम्पी स्कीन या आजाराने ग्रासल्याचे निदर्शनास आले होते. त्या समस्येची तातडीने दखल घेत वरील संस्थांच्या प्रशासनाने बाधित गावांसह त्यालगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील जनावरांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.आर. पाटील, दूध संघाचे महाव्यवस्थापक डॉ. सचिन ढोपे यांनी दिली.
लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे सरकारने पशुपालकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या समस्येविरोधात आवाज उठविला आहे. विशेषतः पवार यांनी बारामती तालुक्यात अशा पद्धतीचा विषाणूजन्य आजार वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी शासनाच्या पशुवैद्यकीय विभागासह बारामती दूध संघाच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
बारामती तालुक्यात साधारणतः लहान व मोठी १ लाख २५ हजार जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये शिर्सुफळ, वडगाव निंबाळकर, पारवडी, लोणीभापकर, काटेवाडी इत्यादी ठिकाणच्या १५ ते २० जनावरांना विषाणूजन्य लम्पी स्कीन या गंभीर आजाराचा धोका निदर्शनास आला आहे. अर्थात त्या जनावरांची ताब्यात स्थित असल्याचे सांगण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. पाटील म्हणाले, ‘‘बारामतीत लम्पी स्कीन या जनावरांच्या आजाराची गंभीरता तशी कमी आहे. परंतु हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आम्ही जोमाने प्रयत्न करीत आहे. बाधित गावांसह लगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील जनावरांसाठी प्राधान्याने निःशुल्क लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सध्या शासनाच्या वतीने २० हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत.’’
दूध संघाचे डॉ. सचिन ढोपे यांनीही शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या मदतीने विषाणूजन्य आजारापासून पशुधन दूर ठेवण्यासाठी संघाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘बारामती दूध संघाच्या वतीने आजपर्यंत ३ हजार २०० जनावरांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये होळ, निरावागज, देऊळगाव, फोंडवाडा, देऊळगाव ससाळ, काऱ्हाटी, माळेगाव, ढेकळवाडी, कांबळेश्वर, खांडज आदी ठिकाणांचा समावेश आहे.
संघाच्या वतीने ३६ ठिकाणी कृत्रिम रेतन सेंटर कार्यरत आहेत. त्या सेंटरच्या अंतर्गत संघाच्या पशुसंवर्धन विभागाचे दोन डॉक्टर व ३६ पशुधन पर्यवेक्षक लसीकरण मोहिमेत काम करीत आहेत. ‘‘पशुपालकांनीही जनावरांच्या गोठ्याच्या परिसरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. तसेच जनावरांना सकस आहार देऊन त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,’’ असे आवाहन दूध संघाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. एन. कदम यांनी केले.
दूध संघाची पशुवैद्यकीय सेवा
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बारामती दूध संघाचा पशुसंवर्धन विभाग अनेक वर्षांपासून कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. जनावरांना आरोग्य सेवा देणे, आहाराची माहिती देणे, वैरण विकास सेवा व जनावरांचे व्यवस्थापन, लसीकरण, कृत्रिम रेतन आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यातच आता विषाणूजन्य लम्पी स्कीन या आजाराचा धोका ओळखून संघाच्या पशुसंवर्धन विभागाने काम सुरू केले आहे, अशी माहिती अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.