Lumpy Skin : वासरातील ‘लम्पी स्कीन’चे नियंत्रण

नवजात वासराचे प्रतिकूल वातावरणापासून संरक्षण करावे. लम्पी स्कीन आजाराचा प्रसार हा प्रामुख्याने कीटकांद्वारे होतो. हे लक्षात घेऊन गोठ्याची स्वच्छता ठेवावी.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
Published on
Updated on

डॉ.अनिल भिकाने, डॉ. रवींद्र जाधव

अति थंड, अति आर्द्र तसेच अति पाऊस इत्यादी वातावरणातील बदलांमुळे वासरांच्या शरीरावर ताण येऊन प्रतिकारशक्ती कमी होते. नवजात वासराचे प्रतिकूल वातावरणापासून संरक्षण करावे. लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा प्रसार हा प्रामुख्याने कीटकांद्वारे होतो. हे लक्षात घेऊन गोठ्याची स्वच्छता ठेवावी.

आहार व्यवस्थापन

नवजात वासरांना जन्मल्यानंतर दोन तासांच्या आत वजनाच्या १० टक्के प्रमाणात चीक पाजावा, जेणेकरून चीकाद्वारे नवजात वासरांना उत्तम नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल. कोणत्याही परिस्थितीत नवजात वासराची उपासमार होणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे वजनाच्या १० टक्के दूध वासरांना नियमित पाजण्यात यावे. आहारात प्रथिनयुक्त अशा द्विदल चाऱ्याचा समावेश करावा.

Lumpy Skin
Crop Cover : क्रॉप कव्हरचा वापर

वासरांना खुराक/काफ स्टार्टर रेशन वयाच्या चौथ्या आठवड्यापासून देण्यात यावे. काफ स्टार्टर रेशनमध्ये प्रीबायोटिक देण्यात यावे.

वासरांना सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये काही वेळ ठेवल्यास आवश्यक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती होऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

वासरांना जीवनसत्त्व टॉनिक आणि खनिज मिश्रणे नियमितपणे देण्यात यावीत.

निवारा व्यवस्थापन

अति थंड किंवा अति आद्र तसेच अति पाऊस इत्यादी वातावरणातील बदलांमुळे वासरांच्या शरीरावर ताण येऊन प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. म्हणून नवजात वासराचे प्रतिकूल वातावरणापासून संरक्षण करावे.

नवजात वासरांना उबदार व पुरेसा हवेशीर निवारा उपलब्ध करून द्यावा.

Lumpy Skin
Goat Disease : शेळ्यांतील रक्ती हगवण, चक्री आजारावर उपचार

हिवाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी नवजात वासरांना उबदार ठिकाणी ठेवण्यात यावे. थंडी जास्त असल्यास वासरांच्या शरीराचा भागही उबदार कपड्यांनी (ब्लॅंकेट) आच्छादित करून वासराचे थंडीपासून संरक्षण करण्यात यावे.

वासरांची बसण्याची जागा किंवा अंगावर टाकलेले कपडे ओलसर होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

जैवसुरक्षा

वासरांचा जन्म निर्जंतुक जागी होणे आवश्यक आहे.

नवजात वासराची नाळ शरीरापासून दोन इंचावर २ टक्के आयोडीनमध्ये बुडवलेल्या धाग्याने बांधून त्याच्यापुढे आणखी एक इंच सोडून नवीन ब्लेडने कापावी.

नवजात वासरांना प्रौढ जनावरांपासून वेगळे ठेवावे. जेणेकरून आजारांचे होणारे संक्रमण टाळता येते.

नवजात वासरांना ओल्या जागेवर, शेण लघवी पडलेल्या जागेवर अजिबात बांधू नये, जेणेकरून संसर्गाची शक्यता टाळता येईल.

गोठ्यामध्ये पडणारी रोगी वासरांची लाळ, नाकातील स्त्राव तसेच एकंदरीत गोठ्याचे दैनंदिन निर्जंतुकीकरण करण्यात यावे. निर्जंतुकीकरणासाठी २ टक्के सोडिअम हायपोक्लोराइट द्रावण किंवा ३ टक्के फिनाइल द्रावण गोठ्यात फवारावे. हे द्रावण वासरांच्या शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणीनंतर अर्धा तास वासरांना गोठ्यामध्ये जाऊ देऊ नये.

Lumpy Skin
Goat Farming : नियोजनबद्ध शेळीपालनातून मिळवले यश

जंत निर्मूलन

नवजात वासरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशी वासरे संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. नवजात वासरांना सात आणि त्यानंतर २१ दिवसांनी जंतनिर्मूलन (पायरेन्टल पामोएट २५ मिलि ग्रॅम प्रति किलो वजन किंवा फेनबेंड्याझोल ५ ते १० मिलि ग्रॅम प्रति किलो वजन) करावे.

दोन ते सहा महिने वयोगटातील वासरांमध्ये कुरणातील गवत खाल्ल्यानंतर त्यावरील खरपड्यांद्वारे पट्टकृमींचा प्रादुर्भाव होते. या कालावधीत वासरांमध्ये गोल कृमींचा प्रादुर्भाव दिसतो. अशा वयोगटातील वासरांमध्ये या दोन्ही जंतांचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपयुक्त जंतनाशके (१० मिलि ग्रॅम फेनबेंडयाझोल + १०मिलि ग्रॅम प्राझीक्वांटल प्रति किलो वजन) द्यावीत.

तीन ते चार आठवडे या वयातील वासरांमध्ये माती चाटण्याचा सवयीमुळे कॉक्सिडिया या आदिजीव संवर्गातील जंतूंचा प्रादुर्भाव होऊन रक्ती हगवण लागल्यास कॉक्सिडिया प्रतिरोधक औषध ॲम्प्रोलियम १० मिलि ग्रॅम प्रति किलो वजन दररोज एक वेळ पाच दिवस द्यावे.

जंतनाशके देण्यापूर्वी पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या शिफारशीनुसारच जंतनाशकांचे प्रमाण द्यावे.

-डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३

(संचालक, विस्तार शिक्षण विभाग, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)

-डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३

(सहायक प्राध्यापक, चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Lumpy Skin
Crop Cover : क्रॉप कव्हरचा वापर

बाह्यपरजीवी नियंत्रण

लम्पी स्कीन आजाराचा प्रसार हा प्रामुख्याने कीटकांद्वारे होत असतो. यात प्रामुख्याने गोचीड, पिसवा तसेच रक्त शोषण करणाऱ्या माश्‍या यांचा सहभाग आढळून येतो.

वासरांचा गोठा व परिसर स्वच्छ करून सर्व कचरा गोळा करून जाळून टाकावा. गोठ्याचा पृष्ठभाग फ्लेमगनने जाळून घ्यावा, जेणेकरून कीटकांची नवीन उत्पत्ती रोखता येईल.

नवजात वासरांना पिसवांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास गोठा स्वच्छ करून घ्यावा. ४ टक्के मिठाच्या द्रावणाची गोठ्याची फवारणी करावी.

रक्त शोषणाऱ्या माशा व इतर कीटकांच्या उच्चाटनासाठी वनस्पतिजन्य कीटकनाशक द्रावणाने वासरे आणि गोठ्यामध्ये फवारणी करावी. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिलि निंबोळी तेल, १० मिलि करंज तेल, १० मिलि निलगिरी तेल आणि २ ग्रॅम अंगाचा साबण मिसळावे. हे मिश्रण बनवून गोठा तसेच वासरांच्या अंगावर फवारणीसाठी वापरावे.

गोठ्याच्या परिसरातील नाल्या सतत वाहणाऱ्या असाव्यात. कोणत्याही परिस्थितीत नाल्यामध्ये तसेच परिसरात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून कीटकांची उत्पत्ती रोखता येईल.

जनावरांच्या गोठ्यातील शेणाची नियमितपणे विल्हेवाट लावावी.

ज्या ठिकाणी जनावरांचे शेण साठवले जाते, त्या जागेवर पॉलिथिन शीटने आच्छादित करावे. त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

प्रतिबंधात्मक लसीकरण

सर्व वयोगटातील वासरांचे विशेषतः ज्यांच्या आईस लस दिलेली नाही किंवा आजार झालेला नाही अशा वासराचे लम्पी स्कीन आजाराप्रती लसीकरण करून घ्यावे.

लसीकरणापूर्वी एक आठवडा अगोदर जंतनिर्मूलन करून घेतल्यास लसीकरणातून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे तयार होते.

गाभण गाईचे लसीकरण करून घेतले तर नवजात वासरास चिकाद्वारे प्रतिकारक शक्ती मिळते. ती वयाच्या ३ ते ४ महिन्यांपर्यंत टिकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com