Poultry Management : ब्रॉयलर कोंबडीतील जलोदर

जलोदर हा चयापचय क्रियेमधील विकार आहे. कोंबड्यांचा वेगवान वाढीचा दर, आनुवंशिकतेत बदल, वातावरणीय बदल, व्यवस्थापनातील त्रुटी, आहारातील बदल अशा अनेक कारणांमुळे जलोदर होतो. योग्य व्यवस्थापनातून यावर नियंत्रण मिळविता येते.
Poultry Disease
Poultry DiseaseAgrowon

डॉ. नितीन ढोरे, डॉ. मयूर शिसोदिया

Poultry Management : व्यवस्थापनातील त्रुटी आणि वातावरणातील बदलांमुळे (Climate Change) ब्रॉयलर कोंबड्यांना विविध विषाणूजन्य, जिवाणूजण्य, परजीवीजन्य आजार होतात. त्यांच्यामधील चयापचय विकरांमुळेसुद्धा या कोंबड्या आजारी पडतात.

कमी कालावधीत कमीत कमी खाद्य वापरून जास्तीत जास्त वजनाची ब्रॉयलर कोंबडी (Broiler Chicken) तयार करणे हे कोंबडीपालकाचे ध्येय असते. सध्याच्या काळात ४५ ते ५० ग्रॅम वजनाच्या ब्रॉयलर पिलाचे ३८-४० दिवसांत २.५ ते २.७ किलो वजन भरते.

अशा जलद गतीने वाढणाऱ्या कोंबडीमध्ये चयापचय क्रियेचा वेग जास्त असतो. अशा परिस्थितीत वातावरणातील बदल, व्यवस्थापनातील त्रुटी, आहार व्यवस्थापन (Poultry Feed Management) आणि खाद्याच्या गुणवत्तेत बदल झाल्यामुळे कोंबड्यांना विविध आजार होतात.

Poultry Disease
Poultry Disease : कोंबड्यातील मुख्य जीवाणूजन्य आजार

चयापचय क्रियेमधील विकार ः

१) कोंबडीमध्ये आनुवंशिक बदल करून त्यांच्या वाढीचा वेग वाढवण्यात आलेला आहे. परिणामी, मांस वाढ झपाट्याने झालेली दिसून येते, परंतु कोंबडीचे फुफ्फुस, हृदय यांची वाढ त्याच वेगाने न झाल्यामुळे वाढत्या शरीराला प्राणवायूचा पुरवठा करण्यास हे अवयव सक्षम राहत नाहीत. या अवयवांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो. त्यांच्यात बिघाड होतो. वाढीनुसार ऑक्सिजनची गरज वाढते.

२) हृदय आणि फुफ्फुस अधिकाधिक रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न करते. परंतु रक्तदाबवाढीमुळे रक्तातील पाणी फुफ्फुसात आणि ओटीपोटात साचण्यास सुरुवात होते, पर्यायाने कोंबडीचा मृत्यू होतो. साधारणतः चार आठवडे वयापुढील ब्रॉयलर कोंबडीमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होते.

३) जलोदर हा आजार नसून चयापचय क्रियेमधील विकार आहे. वेगवान वाढीचा दर, आनुवंशिकतेत बदल, वातावरणीय बदल, व्यवस्थापनातील त्रुटी, आहारातील बदल अशा अनेक कारणांमुळे हा विकार होत असल्यामुळे याला ‘बहुघटकीय सिंड्रोम’ म्हणतात.

Poultry Disease
Poultry Diseases : कोंबड्यांतील अंतःपरजीवी आजारांची ओळख

जलोदर होण्याचा शरीरातील शारीरिक घटनाक्रम ः

१) कोंबडीच्या वाढीचा वेगवान दर.

२) चयापचयात वाढ होणे.

३) स्नायूंची ऑक्सिजनची गरज वाढणे.

४) हृदयाची वाढ आणि अंशतः हृदय बंद पडणे

५) यकृतातून ओटीपोटाच्या पोकळीत द्रव पदार्थाची गळती

६) जलोदर आजारामध्ये रूपांतर.

...असा ओळखा जलोदर

१) सुरुवातीला कोंबडीचा तुरा काळसर होतो, आजार जसा वाढत जातो, त्याप्रमाणात यकृतातून द्रव बाहेर पडते आणि उदरपोकळीत जमा होते. ज्यामुळे पोटफुगी दिसून येते.परिणामी, श्‍वासोच्छ्वास प्रतिबंधित होतो आणि शेवटी कोंबडी मरते.

२) मृत कोंबडीचे शवविच्छेदन केले असता, ओटीपोटामध्ये पिवळ्या रंगाचा द्रव दिसून येतो, त्याच बरोबर हृदय मोठे झाले दिसून येते.

Poultry Disease
Poultry Diseases : कोंबड्यांतील अंतःपरजीवी आजारांची लक्षणे कशी ओळखायची?

जलोदर होण्याची कारणे ः

१) ब्रूडिंगच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात सामान्य तापमानापेक्षा कमी ब्रूडिंग तापमान.

२) खराब हवेची गुणवत्ता, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, धूळ आणि आर्द्रता यामुळे कोंबडीमध्ये जलोदर होण्याची शक्यता असते. ज्यामुळे श्‍वसनाचा त्रास होतो. श्‍वसनाची कार्यक्षमता आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

३) अधिक घनतेचे खाद्य दिल्यामुळे कोंबडीच्या चयापचयात बदल घडल्यामुळे जलोदर होण्याची शक्यता असते.

४) खाद्यमधील जास्त ऊर्जा व कमी प्रथिने दिले गेल्यामुळे जलोदर होण्याची दाट शक्यता असते. जास्त प्रमाणात खाद्य दिल्यामुळे ब्रॉयलरमध्ये जलोदर होऊ शकतो.

५) थंडीचा दिवसांमध्ये हा आजार दिसतो. त्याच बरोबर उन्हाळ्यातील ताणामुळे देखील हा आजार दिसतो.

प्रतिबंधात्मक उपाय ः

१) वाढ कमी करून किंवा खाद्य घनता कमी करून कोंबडीची चयापचयासाठीची ऑक्सिजन गरज कमी करावी.

२) ब्रूडिंगच्या पहिल्या आठवड्यात ३५ अंश सेल्सिअस, दुसऱ्या आठवड्यात ३३ अंश सेल्सिअस, तिसऱ्या आठवड्यात ३० अंश सेल्सिअसपर्यंत ठेवावे.

३) आहाराचा कालावधी कमी करण्यासाठी अधूनमधून प्रकाश कमी जास्त करावा, त्यामुळे त्यांची वाढ मंदावते.

४) प्रति किलो खाद्यामधून ५० मिलिग्रॅम एस्कॉर्बिक ॲसिड दिल्याने ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये जलोदराचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

५) जलोदर होऊनये यासाठी जीवनसत्त्व अ,ड,क,इ हे १२ मिलि प्रति १०० कोंबड्यासाठी पाण्यातून द्यावे. आजार झाल्यास ही जीवनसत्वे पाण्यातून तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दहा दिवस दररोज द्यावीत.

६) ५ ते ७ टक्के कमी पौष्टिक घनता असलेल्या आहाराचा वापर करावा. आहारातील पोषक घनता कमी करावी, त्यामुळे लवकर वाढ होण्यास विलंब होतो.

६) ब्रॉयलर कोंबड्यांना मॅश डाएट द्यावे. त्यामुळे वाढीचा दर कमी होतो.

७) योग्य प्रमाणात खाद्य द्यावे.

८) शेडमध्ये पुरेसे वायुवीजन आणि हवेची गुणवत्ता सुनिश्‍चित करावी.

९) उच्च बायकार्बोनेट आहारासह कमी क्लोराइड आहार दिल्यास फुफ्फुसाचा उच्च रक्तदाब कमी होतो.

उपचार ः

जलोदर आजारासाठी योग्य उपचार नाही. परंतु प्रतिबंधात्मक उपाय केल्यास जलोदराचा प्रादुर्भाव कमी करता येतो.

संपर्क : डॉ. नितीन ढोरे, ८९७५८१२४९७

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com