Animal Husbandry : जनावरांच्या आहार, व्यवस्थापनात बदल आवश्यक

Animal Care : अधिक तापमान तसेच आर्द्रतेमुळे उष्णतेचा ताण वाढतो. त्यामुळे चयापचय प्रक्रिया मंदावते, भूक मंदावते, दुग्धोत्पादन कमी होते, प्रजननक्षमता घटते, दुधाची गुणवत्ता ढासळते. हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन तापमान-आर्द्रता निर्देशांकाचा अवलंब करून आहार आणि व्यवस्थापनात आवश्यक बदल केल्यास जनावरांना उष्मा ताण आणि दूध उत्पादकता कमी होण्यापासून वाचविता येईल.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

Animal Health Management : हवामान बदलाचे परिणाम जगभर दिसत असले तरी प्रामुख्याने शीतोष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील भारतासारख्या देशात ही समस्या अधिक प्रमाणात जाणवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशातील ७० टक्के पशुधन हे अल्पभूधारक शेतकरी आणि मजुरांकडे आहे. या हवामान बदलाचा परिणाम जनावरांवर दिसू लागला आहे.

परिणाम

पावसाचे कमी-अधिक, अनियमित प्रमाण, तापमान, आर्द्रतेचा आरोग्यावर परिणाम.

कमी पाऊस व अधिक तापमान राहिल्यास चाऱ्यामध्ये लिग्नीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे चाऱ्याची गुणवत्ता घटते.

कमी पावसामुळे चाऱ्याचे उत्पादन कमी होते. त्यातून चारा व खाद्य टंचाई निर्माण होते. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी होते.

पाऊस, वातावरणातील तापमान व आर्द्रता यांच्यामध्ये चढ उतार झाल्याने जनावरांना वातावरणातील बदलाच्या विविध ताणास सामोरे जावे लागते.

अधिक तापमान व आर्द्रतेमुळे उष्णतेचा ताण वाढतो. त्यामुळे चयापचय प्रक्रिया मंदावते, भूक मंदावते दुग्धोत्पादन कमी होते, प्रजननक्षमता घटते, दुधाची गुणवत्ता ढासळते. कितनबाधेसारखे चयापचयाचे आजार, आम्ल अपचन, लंगडणे यांसारख्या व्याधी जडतात.

अनियमित पाऊस, अतिवृष्टीमुळे कीटक, बाह्यपरजीवींचे प्रमाण वाढते. त्यामुळे कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो, जिवाणूजन्य आजाराच्या साथी येतात. प्राणिजन्य आजारांचे प्रमाणही वाढते.

Animal Husbandry
Animal Care : जनावरांतील उष्माघाताची कारणे, काळजी, उपाय

उपाययोजना

अजैविक ताण कमी करण्यासाठी आनुवंशिक स्तरावर संशोधन

बहुतांश ठिकाणी स्थानिक प्रजातीच्या जनावरांमध्ये त्याभागातील वातावरणात समरस होण्यासाठी आवश्यक वैशिष्ट्ये आढळून येतात. ज्यामुळे या जनावरांना प्रतिकूल हवामान, आजार इत्यादी प्रति सहिष्णुता असते. एकूणच अशा प्रतिकूल परिस्थितीत कमी आहार घटक उपलब्ध असूनही तग धरून राहाणे, उत्पादनक्षमता टिकविणे त्याचप्रमाणे प्रजननक्षमता टिकविणे असे गुणधर्म आढळून येतात.

संकरित जनावरे तुलनेने जास्त दूध उत्पादन देत असली तरी देशी जनावरांची वातावरणात समरस होण्याची क्षमता जास्त असून किमान पोषक घटक उपलब्ध असूनही आजारांप्रती प्रतिकारशक्ती चांगली असल्याने देशी वंशावळीची जनावरे प्रतिकूल वातावरणात तुलनेने जास्त काटक राहतात.

मध्यम उत्पादकता असणाऱ्या देशी प्रजातीमधील जनावरांच्या आनुवंशिक गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करून उत्पादकता व काटकपणा या दोन्ही गोष्टी साधल्यास पशुपालकांना आर्थिक फायदा होईल.

आहारविषयक धोरण

आहार व्यवस्थापनात आवश्यक बदल केल्यास जनावरांच्या शरीरात चयापचय प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेचा ताण कमी करता येऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात जास्त तंतुमय पदार्थ दिल्यास किंवा निकृष्ट प्रतीचे गवत किंवा चारा दिल्यास पचनादरम्यान जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते जिचे उत्सर्जन करण्यासाठी शरीराला अतिरिक्त ताण येऊ शकतो म्हणून आहारात तंतुमय पदार्थ व प्रथिने कमी करणे गरजेचे आहे.

वाळलेले गवत जनावरांना देण्यापूर्वी त्याच्यावर पाणी शिंपडावे. उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांना चांगल्या प्रतीचा हिरवा चारा उपलब्ध करून द्यावा. हिरवा व सुका चारा कडबाकुट्टी यंत्राने छोटा करून द्यावा. आहारात चांगल्या प्रतीचा समतोल खुराक द्यावा. दुष्काळी परिस्थितीत जेव्हा हिरव्या चाऱ्याची टंचाई असेल तर मुरघास द्यावा. अतिरिक्त खनिज क्षार मिश्रण आहारात देणे आवश्यक आहे.

एकत्रित रेशनद्वारे (टीएमआर) उष्णतेच्या ताणामुळे होणारे आम्ल अपचन टाळता येईल. आहारात २ ते ६ टक्के चरबीयुक्त घटक दिल्यास उन्हाळ्याच्या दिवसांत आहाराची ऊर्जा घनता वाढवता येते. जेणेकरून वातावरणातील बदलामुळे कमी आहार घेऊनसुद्धा उत्पादकतेसाठी आवश्यक ऊर्जेची गरज भरून निघण्यास मदत होईल.

आहारात काही सूक्ष्म पोषणद्रव्ये जसे की जीवनसत्त्व अ, क, ई, सेलेनियम, जस्त दिल्यास ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत होते. त्यातून उष्मा ताण कमी होतो, आहार घेण्याचे प्रमाण उच्चतम राहते.

विविध पिकांच्या टाकाऊ घटकांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून पोषकता वाढवता येते. यातून दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चाऱ्याचा एक उत्तम पर्याय उपलब्ध होतो.

Animal Husbandry
Animal Care : जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष द्या

तापमान -आर्द्रता निर्देशांकानुसार आरोग्य सेवा सल्ला

तापमान-आर्द्रता निर्देशांकाचा अवलंब करून आहार आणि व्यवस्थापनातील आवश्यक बदल केल्यास जनावरांना उष्मा ताण व उत्पादकता कमी होण्यापासून वाचविता येते.

जेव्हा तापमान-आर्द्रता निर्देशांक ६५ च्या वर जातो तेव्हा उच्च दुग्ध उत्पादन देणाऱ्या जनावरांना जास्त प्रमाणात हिरवा चारा व पिण्यासाठी मुबलक स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्यास त्यांचे दुग्ध उत्पादन निरंतर ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा तापमान वाढते (तापमान-आर्द्रता निर्देशांक ६० च्या वर जातो) तेव्हा जनावरांना दिवसातून किमान तीन वेळा अंघोळ घालणे किंवा ओले करणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात दिवसभर वातावरणाचे तापमान जास्त असल्याने त्याचा आहारावर विपरीत परिणाम होतो, म्हणून जनावरांना शक्यतो दिवसाच्या थंड वेळी म्हणजेच सकाळी लवकर किंवा रात्री खाद्य देण्यात यावे.

गोठा व्यवस्थापन

जनावरांना विपरीत वातावरणाचा ताण टाळण्यासाठी गोठ्याची संरचना, उंची, परिसर या बाबींचा काळजीपूर्वक विचार करून गोठा व्यवस्थापन करावे.

जनावरांचे व्यवस्थापन योग्य उंची (मध्यभागी १४ ते १६ फूट) असलेल्या व खेळती हवा राहील अशा गोठ्यात करावे. दिवसातून ३ ते ४ वेळा जनावरांच्या शरीरावर थंड पाणी फवारावे. व्यावसायिक पशुपालन गोठ्यामध्ये फॉगर किंवा मिस्टरद्वारे जनावरांच्या अंगावर ठरावीक वेळेनंतर थंड पाण्याची फवारणी करावी. त्यामुळे जनावरांचे तापमान नियंत्रित केले जाते.

दुपारच्या वेळेत जनावरांना उष्णतेच्या झळा लागू नयेत यासाठी गोणपाटाचे पडदे लावावेत. त्यावर पाणी शिंपडावे म्हणजे गोठ्यातील वातावरण थंड राहण्यास मदत होईल.

शक्य असल्यास गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी पंख्यांची सोय करणे. गोठ्यावर पत्र्याचे छप्पर असल्यास वरच्या बाजूला पांढरा रंग तर खालच्या बाजूला काळा रंग दिल्यास गोठ्यातील तापमान वाढण्यापासून टाळता येते. पत्र्यावर उसाचे पाचट, तुराट्या, पराट्या, कडबा, गव्हाचे काढ किंवा वनस्पतींचा पालापाचोळा अंथरल्यास गोठ्यातील तापमान कमी ठेवण्यास मदत होते.

सावलीमध्ये मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. मुक्त संचार गोठा पद्धतीत गोठा व जनावर धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत होते. मुक्त संचार गोठा असल्यास जनावरांचे आरोग्य, उत्पादन, वातावरणातील बदलाचा विशेषतः उष्णतेचा ताण कमी करणे आणि इतर आनुषंगिक फायदे होतात. याद्वारे उत्तम खत व्यवस्थापन, मिथेन उत्सर्जन कमी करण्यास आणि एकूण पर्यावरणीय स्थिरता सुधारण्यास मदत होते.

दुधाळ जनावरांना परिपूर्ण सावली व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.

व्यवस्थापन प्रणालीमध्ये बदल

शेती, फलोत्पादन, वनीकरण व पशुसंवर्धन यांचे एकत्रीकरण केल्यास सुयोग्य जमीन वापर व्यवस्थापन करण्यास मदत होते. यातून सर्वच व्यवसायांना स्थिरता येईल.

वातावरणास पूरक व आर्थिकदृष्ट्या परवडणारे बदल शेती व पशुसंगोपन या बाबींमध्ये केल्यास व्यवसायात गतिमानता येते. मातीची धूप कमी करता येऊ शकते, मातीची पाणी व पोषणतत्त्वे धरून ठेवण्याची क्षमता वाढवू शकते. मिश्र पद्धतीने पशुपालन व शेती व्यवसाय अमलात आणल्यास प्रति एकर शेतीमध्ये उच्चतम उत्पादन घेऊन अर्थार्जन वाढवता येते.

हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे

गाई, म्हशींच्या शेणातून घातक मिथेन वायूचे उत्सर्जन होते. हे थांबविण्यासाठी बायोगॅसचा वापर फायदेशीर ठरतो. हवामान बदलाचा धोका कमी करता येतो.

आरोग्य व्यवस्थापन

वातावरणीय बदलांमुळे कीटक व बाह्यपरजीवी यांची उत्पत्ती व प्रसार तसेच विविध जिवाणूजन्य आजारांचा प्रसार यांच्याशी निगडित विविध आधुनिक तंत्रज्ञान जसे की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून आजाराच्या साथींचा मागोवा किंवा कीटकांच्या उत्पत्तीचा मागोवा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

प्रतिबंधात्मक लसीकरण, जंतनिर्मूलन, बाह्यपरजीवी व कीटक निर्मूलन इत्यादी बाबींवर लक्ष केंर्द्रित करून साथीच्या आजारांना आळा घालता येऊ शकतो.

- डॉ. अनिल भिकाने,

९४२०२१४४५३

(लेखक महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे विस्तार शिक्षण

संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com