
Nagpur Horticulture News : लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा (Sex Sorted Semen) पुरवठा अनुदानावर करण्याचे धोरण राज्य शासनाने हाती घेतले होते. परंतु दुध संघांनीच अनुदानावरील या रेतमात्रा खरेदी करून त्याची साठवणूक केली. परिणामी वैयक्तिक पशुपालकांना याचा पुरवठाच झाला नाही. त्यामुळे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातूनच या रेतमात्रांचा पुरवठा व्हावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
राज्यात दुग्धोत्पादनाला चालना आणि वंश सुधारण्यासाठी लिंग वर्गीकृत रेतमात्रा पुरवठ्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या माध्यमातून पशुपालकांना ८१ रुपयांत ही रेत मात्रा उपलब्ध करून दिली जात होती. याकरिता राज्य शासनाने १८१ रुपयांचा दर निश्चित केला होता.
दूध संघांनी यातील १०० रुपयांचा भरणा स्वतः करून संघाशी जोडलेल्या पशुपालकांना ८१ रुपयांमध्ये याचा पुरवठा केला जाईल, असे सांगितले होते. या रेतमात्रांच्या माध्यमातून दुधाळ जातिवंत कालवडी जन्माला याव्यात असे अपेक्षीत होते. पशुपालकांसाठी १,५०० ते ४,५०० रुपये अशी किंमत असलेली ही लिंग वर्गीकृत रेतमात्रा मात्रा अवघ्या ८१ रुपयांत उपलब्ध होणार होती.
मात्र राज्यातील दूध संघांनी यातील बहुतांश रेतमात्रांची खरेदी करून साठवणूक केली किंवा त्यांच्या संघाचे सदस्य असलेल्या पशुपालकांना पुरवठा केला. परिणामी अनुदानावरील रेतमात्रेची उपलब्धता सामान्य पशूपालकास होऊ शकली नाही. राज्यातील केवळ १ ते २ टक्केच वैयक्तिक पशुपालकांना या योजनेचा फायदा झाला, असा दावा पशुपालकांकडून केला जात आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून अनुदानावर लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा पुरवठा करण्यात आला होता. परंतु दूध संघांकडूनच याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे सामान्य पशुपालक योजनेच्या लाभापासून वंचित राहिले.
त्यांना महागड्या रेतमात्रा खरेदी कराव्या लागत आहेत. परिणामी लिंग वर्गीकृत रेतमात्रांच्या पुरवठा शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांना करावा. त्यांच्या माध्यमातूनच सामान्य पशूपालकांच्यापर्यंत या रेतमात्रा पोहोचतील.
- रामनाथ वदक, झेप शेतकरी उत्पादक कंपनी, निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि. नगर.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.