Animal Care : पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी?

Animal Care In Rainy Season : पावसाळ्यात जनावरांना विविध संसर्गजन्य आजार होतात. त्यासाठी गोठ्याच्या स्वच्छतेसह खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. गोठा कायम कोरडा आणि स्वच्छ राखावा. व्यवस्थापन पद्धतीत आवश्यकतेनुसार योग्य बदल करावेत.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. एन. एस. देशमुख, डॉ. ए. एस. तारू, पी. पी. देशपांडे

Animal Husbandry : यशस्वी पशुपालनाकरीता जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. व्यवस्थापन बाबींमध्ये खाद्य नियोजन आणि आरोग्य व्यवस्थापनावर भर दिल्यास पशुपालन व्यवस्थापन यशस्वी होण्यास मदत होते.

पशुपालनात साधारणपणे ६० ते ७० टक्के खर्च हा जनावरांच्या खाद्यावर, तर उर्वरित ३० ते ३५ टक्के खर्च आरोग्यावर होतो. प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. विशेषतः पावसाळ्यात जनावरांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

कारण पावसाळ्यात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जीवजंतूचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच खाद्यामध्ये बदल झाल्यामुळे पोटाचे आजार उद्‌भवतात.

पावसाळ्यात जनावरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गोठा स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जास्त आर्द्रता आणि कमी तापमान या बाबींमुळे गोठ्याचा पृष्ठभाग कायम ओलसर राहतो.

ओलसरपणामुळे गोठ्यात विविध रोगजंतूंची वाढ होऊन जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसाळ्यात गोठा, खाद्य आरोग्यावर भर देऊन जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

Animal Care
Animal Care : विदर्भ-मराठवाड्यातील जनावरांना लागणार कॉलर

पावसाळ्यात होणारे संभाव्य आजार

पोटफुगी

पावसाळ्यात नव्याने उगवलेला हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्यास जनावरांमध्ये पोटफुगी दिसून येते. तसेच पोट फुगण्यामुळे अति वजनाचा ह्रदय आणि फुफ्फुसावर ताण येऊन जनावर दगावण्याची शक्यता असते

उपाय

- पोटफुगी टाळण्याकरिता पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्यासोबत सुके खाद्य दोन ते तीन किलो या प्रमाणात द्यावे. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थितरीत्या कार्य करते.

- जनावरांना दिवसभर फक्त कोवळा हिरवा चारा खाऊ घालू नये.

पायाच्या खुरांना जखमा होणे

-  पावसाळ्यात बाहेर जनावरे चरायला सोडल्यामुळे चिखलामध्ये चालून त्यांच्या खुरांना जखमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पायांना वेदना होऊन जनावर लंगडते.

उपाय

- जखम झालेली जागा पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या साह्याने स्वच्छ धुऊन मलमपट्टी करावी. जनावरे जास्त चिखल असलेल्या ओबडधोबड ठिकाणी चरायला सोडू नयेत.

- गोठ्यातील खड्डे बुजवून घ्यावेत. गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.

बुळकांडी

- हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे पावसाळ्यात याचा संसर्ग झपाट्याने होतो.

- बाधित जनावरांच्या जिभेवर, आतड्यांवर तसेच त्वचेवर लहान फोड येतात. तसेच शेणाला दुर्गंधीयुक्त वास येतो. जनावराला ताप येऊन डोळ्यांतून व नाकातून सतत पाणी वाहते. डोळे लालसर होतात.

उपाय

- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे.

- गोठ्याची नियमित स्वच्छता राखावी.

- बाधित जनावर इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.

घ्यावयाची काळजी

-  पावसाचे पाणी गोठ्याच्या आत येऊ नये, यासाठी ताडपत्रीचे पडदे बाजूने लावावे. त्यामुळे पाणी आत येऊन गोठा ओला होणार नाही.

- गोठा स्वच्छ व कोरडा राखण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते. गोठा कोरडा राहण्यासाठी कुटारात चुन्याची पावडर मिसळून त्याचा पातळ थर पसरावा. त्यामुळे आर्द्रता कमी होईल.

- गोठ्यात भरपूर हवा व सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी.

- गोठ्यात पडलेले छोटे-छोटे खड्डे मुरम किंवा रेतीने भरून घ्यावे.

- पावसाळ्यात बाह्य व आंतरपरजीवी जंतूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. जसे गोचीड, गोमाश्या, मच्छर, डास, चिलटे यांच्या चाव्यामुळे जनावरांना विविध आजार होतात. त्यासाठी शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांची १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

- पावसाळ्यात दुधाळ जनावरांचे दूध काढण्याआधी आणि काढल्यानंतर कास पोटॅशिअम पर्मंग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ निर्जंतुक करून घ्यावी. जेणेकरून गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जंतूसंसर्ग होऊन कासदाह आजाराचा धोका टाळला जाईल.

Animal Care
Animal Management : जनावरांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

- पावसाळ्यापूर्वी घटसर्प, एकटांग्या या आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

- शेळ्या-मेंढ्यामध्ये आंत्रविषार रोगाची प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.

- पावसाळ्यात शेळ्यांमध्ये हगवण, अपचन, पोटफुगी अशा समस्या दिसून येतात. त्यासाठी शेळ्या नदी-नाल्या काठी चरावयास सोडू नयेत.

- पावसाळ्यात नवीन उगवलेला लुसलुशीत हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. मात्र असा हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्याने जनावरांमध्ये समस्या निर्माण होतात. त्यासाठी योग्य प्रमाणात चारा खाऊ घालावा.

- बऱ्याच वेळा पावसाळ्यात अतिवृष्टी, गारपीट किंवा वीज कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरे झाडांखाली बांधू नयेत.

संपर्क - डॉ. ए. एस. तारू, ९४०५०४५२६४, (कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com