
Nagpur News : जनावरांच्या हालचांलीच्या आधारे त्यांची गतिशीलता, आजार आणि इतर बाबींची नोंद घेणारी कॉलर यंत्रणा लावण्याचे काम लवकरच ‘नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्ड’च्या (एनडीडीबी) विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पातून होईल.
पहिल्या टप्प्यात पशुपालकांना वितरित केलेल्या २ हजार जनावरांमध्ये ही यंत्रणा बसविल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ११ हजार जनावरांमध्ये कॉलर बसविले जातील. या संबंधीचे कंत्राट देखील देण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्पातील सूत्रांनी दिली.
गतिशीलता मापण्याची अनेक छोटी सयंत्र आहेत. हृदयाच्या ठोक्यावरुन अशाप्रकारची सयंत्रे काम करतात. त्याच्या मापणासाठी काही मनगटी घड्याळे देखील पुरेशी ठरतात.
चालताना किती किलोमीटर चाललो, केव्हा दम लागला अशाप्रकारच्या नोंदी यात घेतल्या जातात. याच तंत्रज्ञानाचा वापर करीत जनावरांच्या दैनंदिन हालचालींना टिपले जाईल.
गतिशीलता (मोबिलिटी), तापमान, हिट डिटेक्शन (माजावर येणे) अशा प्रकारच्या नोंदी यातून घेणे शक्य होईल. परिणामी, जनावरांना कोणताही आजार झाल्यास त्याचे निदान लवकर करता येईल. परिणामी जनावरांचा जीव वाचविणे शक्य होईल.
दरम्यान, इस्राईलमध्ये यापूर्वी उपलब्ध अशा प्रकारच्या कॉलरच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. इस्राईलमध्ये शॉर्ट रेंज (एक ते दोन किलोमीटर) तंत्रज्ञानावर आधारित कॉलर आहेत.
यामध्ये एक ते दोन किलोमीटरच्या परिघात कॉलर लावलेल्या जनावरांच्या नोंदी घेता येतात. परंतु विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या कॉलरसाठी लॉग रेंज एरिया नेटवर्क (लोरा) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.
‘लोरा’ची रेंज १० किलोमीटरची आहे. म्हणजे दहा किलोमीटरच्या परिघात कॉलर यंत्रणा असलेल्या जनावरांच्या हालचाली टिपता येतील. त्यासाठी असलेल्या एका टॉवरच्या माध्यमातून दोन हजार जनावरांचे संनियंत्रण करता येईल. या टप्प्यात ११ हजार जनावरांचे वितरण ५० टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे. या सर्व जनावरांना कॉलर यंत्रणा बसविली जाईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.