Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

Lumpy Disease : लम्पी आजाराबाबत जागरूक राहा...

Animal Husbandry Disease : लम्पीग्रस्त जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. आजारी जनावरांच्या रक्त व नाकातील स्रावाची पशू आरोग्य केंद्रात तपासणी करावी.
Published on

डॉ. अशोक भोसले, डॉ. संतोष बोरगावे, डॉ. युवराज वाडेकर

Lumpy Disease Care : लम्पीग्रस्त जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. आजारी जनावरांच्या रक्त व नाकातील स्रावाची पशू आरोग्य केंद्रात तपासणी करावी. ज्यामुळे लवकरात लवकर निदान होते. जनावरांना पोषक आहार द्यावा. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहील.

लम्पी हा विषाणूजन्य आजार आहे. या आजारात त्वचा व शरीरावरील इतर भागावर गाठी येतात. या आजाराचा विषाणू पॉक्सव्हिरिडी या विषाणू कुटुंबातील आहे. आजाराचा प्रसार कीटकाद्वारे (गोचीड, डास, माश्‍या) होतो. तसेच विषाणूमुळे प्रदूषित वैरण, बाधित जनावरांचे दूध, विर्यातून तसेच नाकातील स्रावाद्वारे प्सार होऊ शकतो.

लक्षणे

ताप येतो (४०.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त), अंगावर विशिष्ट आकाराच्या गाठी.

श्‍वास घेण्यास त्रास, डोळ्यावर चिपाड येते, नाकातून शेंबूड येतो. चालताना जनावर लंगडते.

गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. कमी झालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेमुळे इतर आजार होण्याचा धोका.

आर्थिक नुकसान

आजार मुख्यत्वे गायवर्गामध्ये दिसतो. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. साथी दरम्यान अभ्यास केला असता प्रत्येक दुधाळ गायीच्या दुग्धोत्पादनामध्ये सरासरी ३.५ लिटरची घट झाली आहे. सरासरी आजारग्रस्त दिवसांची संख्या १५ दिवस आणि पूर्ण क्षमतेने दूग्ध उत्पादन सुरू होण्यास लागणारा काळ १० दिवसांचा गृहीत धरला, तर ३५ रुपये प्रतिलिटर दरानुसार ३,०६२ रुपयांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये उपचारासाठी लागणारी रक्कम मिसळली, तर अंदाजित सरासरी नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकतो. यादरम्यान गर्भपात, आजारामुळे जनावरांत काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी येणारे नपुंसकत्व यामुळे होणारे नुकसान मोजता येणार नाही.

उपचारावर होणारा खर्च

साधारण आजारी जनावरांमध्ये १५ दिवसांपर्यंत सतत उपचाराची गरज असते. हा आजार विषाणूजन्य असल्यामुळे त्यासाठी कुठलीही अशी ठराविक उपचार पद्धती नाही, परंतु जिवाणूंमुळे होणाऱ्या संभाव्य आजारांवर नियंत्रण शक्य आहे.

यामध्ये अॅंटिबायोटिक्स, दाहरोधक औषधे, पौष्टिक पूरक औषधे, कीटक प्रतिकारक स्प्रे वापर उपयुक्त ठरतो. जर गोचीड ताप किंवा लालमूत्र आजार उद्‍भवला, तर एका जनावराच्या उपचारासाठी कमीत कमी २,४०० ते ६,००० रुपये खर्च येऊ शकतो.

नियंत्रणातील अडचणी

विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल : विषाणू कवचावरील घटकांमध्ये अनेक बदल होतात. त्यामुळे पूर्वी दिलेली लस पुढील वेळी दिली असता प्रभावीपणा कमी होऊ शकते. त्यामुळे लसीकरणामुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल.

जिवाणूजन्य आजारांचे संक्रमण : आजारामध्ये कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता तसेच फुटलेल्या गाठीमुळे तयार झालेल्या जखमेद्वारे जिवाणू संक्रमणाचा धोका वाढू शकतो. हे रोखण्यासाठी प्रतिजैवकांचा वापर, पशुवैद्यकाद्वारे सुचवलेल्या औषधांचा वापर करावा.

Animal Husbandry
Lumpy Skin Disease : घोडेगाव परिसरात शेतकऱ्यांना ‘लम्पी स्कीन’ची धास्ती

गोचीड ताप संक्रमण : कमी झालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणात गोचीड तापाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. थायलेरिया, बॅबेसिया हे आजार मिश्र प्रमाणात लम्पी आजार झालेल्या जनावरांमध्ये दिसून येतात. वातावरण बदलामुळे जनावरांतील तणाव : वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे विविध सूक्ष्मजीवांशी शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे सतत चालू असलेला प्रतिकार तसेच आजूबाजूच्या वातावरण घटकांशी समन्वय साधण्यामुळे शरीरातील विविध यंत्रणा कायम ताणतणावामध्ये असतात. यामुळे शरीरात पसरलेल्या आजाराशी प्रभावीपणे लढता येत नाही.

औषधांची अनुपलब्धता : अनेक वेळा उपचारासाठी लागणारे औषध उदा., प्रतिजैविके इत्यादी उपलब्ध नसल्यामुळे वेळेवर उपचार शक्य नसतो. आजाराबद्दल कमी असलेली जागरूकता, लसीकरणाबद्दल गैरसमज : अनेक भागांतील शेतकऱ्यांना आजाराबद्दल माहिती नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे योग्यवेळी आजाराचे निदान आणि उपचार न झाल्याने जनावरांचा मृत्यू होत आहे.

लसीकरणाबद्दल गैरसमज

लसीकरण केलेल्या जागेवर मुख्यत्वे मानेवर सूज येणे किंवा गाठ होते : लसीकरण झालेल्या जागी गाठ येते, परंतु ही गाठ किंवा सूज ४ ते ५ दिवसांमध्ये नाहीशी होते. त्यापासून जनावरांना कोणताही धोका होत नाही. याउलट गाठ येणे हे प्रभावी लसीकरण केल्याचे लक्षण आहे.

जनावरांचे दूध कमी होते : लस दिल्यानंतर जनावरांना ताप येतो, भूक मंदावते. या स्थितीमधे दुधाळ जनावरांचे दूध कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु २ ते ३ दिवसांमध्ये दूध उत्पादन नियमित होते.

लसीकरण केल्यामुळे लम्पी होण्याचा धोका निर्माण होतो : लम्पी आजार प्रभावित झालेल्या क्षेत्राच्या पाच किमी त्रिज्येबाहेरील लसीकरण झालेल्या जनावरांना या आजाराचा कोणताही धोका आढळत नाही.

गाभण गायींना लसीकरण करावे का? - साधारणपणे सात महिन्यांच्या गाभण गायींना लसीकरण केल्यास काही धोका होत नाही.

घरगुती उपचार

तोंडावाटे दिली जाणारी औषधे

प्रथम उपचार

सामग्री : विड्याची दहा पाने, काळी मिरी १० ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, गूळ आवश्यकतेनुसार.

औषध तयार करण्याची पद्धत

दिलेली सामग्री एकत्र वाटून त्यात गूळ मिसळून पेस्ट तयार करावी.

आजारी जनावरास पहिल्यांदा थोड्या प्रमाणात हे मिश्रण खाण्यास द्यावे.

पहिल्या दिवशी दर तीन तासांनी एकदा आजारी जनावराला मिश्रण द्यावे. दुसऱ्या दिवसापासून दोन आठवड्यांपर्यंत दिवसातून ३ वेळा हे मिश्रण द्यावे.

औषधाची मात्रा प्रत्येक वेळेस नव्याने तयार करावी.

Animal Husbandry
Lumpy Skin : लम्पी स्कीन आजार अजूनही खानदेशात अस्तित्वात

द्वितीय उपचार

सामग्री (दोन मात्रेसाठी): लसूण २ पाकळ्या, धने १० ग्रॅम, जिरे १० ग्रॅम, तुळशीचे पाने १ मूठ, दालचिनीचे पाने (तमालपत्र) १० ग्रॅम, काळी मिरी १० ग्रॅम, विड्याची पाच पाने, लाल कांदे २ नग, हळद पावडर १० ग्रॅम, चिराटाच्या पानाची पावडर ३० ग्रॅम, रानतुळस पाने १ मूठ, कडुनिंबाची पाने १ मूठ, बेलाची पाने १ मूठ, गूळ १०० ग्रॅम.

औषध तयार करण्याची पद्धत

सर्व घटक एकत्र वाटून त्यात गूळ मिसळून पेस्ट तयार करावी.

आजारी जनावराला मिश्रणाचा थोडा भाग पहिल्यांदा खायला द्यावा. पहिल्या दिवशी दर ३ तासांनी एक मात्रा आजारी जनावरास खायला द्यावी.

दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळ आणि संध्याकाळ ही मात्रा जनावर बरे होईपर्यंत दोन आठवड्यांपर्यंत द्यावी.

टीप : वरील दोन्ही औषधे जनावरांना देताना किमान एका तासाचे अंतर ठेवावे.

जखमांवर लावायचे मलम :

सामग्री : कुप्पी /हरित मांजरी /काजोटीची पाने १ मूठ, लसूण १० पाकळ्या, कडुनिंबाची पाने १ मूठ, खोबरेल किंवा तीळ तेल ५०० मिलि, हळद पावडर २० ग्रॅम, मेहंदीची पाने १ मूठ, तुळशीची पाने १ मूठ.

मलम वापर

सर्व घटक एकत्र बारीक करून घ्यावेत.

हे मिश्रण खोबरेल किंवा तीळ तेलात एकत्र करून उकळी येईपर्यंत उकळवा आणि थंड होऊ द्यावे.

जखमेला स्वच्छ करून मलम लावावे.

जखमेत किडे, अळ्या झाल्या असतील तर :

पहिल्या दिवशी सीताफळाच्या पानाची पेस्ट किंवा खोबऱ्याच्या तेलात कापूर मिसळून जखमेवर लावावा.

नियंत्रणाचे उपाय

जनावरांना पोषक आहार द्यावा. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहील.

आजारी जनावरांच्या रक्त व नाकातील स्रावाची पशू आरोग्य केंद्रात तपासणी करावी. ज्यामुळे लवकरात लवकर निदान लागेल.

लम्पीग्रस्त जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे करावे.

बाधित जनावरांवर ताबडतोब उपचार करावेत.

टॅबॅनस, स्टोमोकसिस माश्‍यांमुळे आजाराचा प्रसार होतो.त्यामुळे गोठ्याची स्वच्छता ठेवावी.

पशुसंवर्धन विभागाकडून गोटपॉक्स आणि लम्पी प्रोव्हॅक या लम्पी आजार नियंत्रणाच्या लसी उपलब्ध आहेत. लसीकरण झालेल्या जनावारांमध्ये जर लम्पीचा प्रादुर्भाव आला तर उपचारानंतर अशा जनावरांमध्ये लवकर सुधारणा दिसून येते. उपचारावरील खर्च कमी लागतो. त्याउलट लसीकरण न झालेले जनावर जास्त दिवस आजारी राहाते, उपचारावरील खर्चात वाढ होते.

- डॉ. अशोक भोसले, ७७२१०२५०७३

(पशू सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com