World Animal Disease Day : प्राणिजन्य आजाराबाबत जागरूक राहा...

Animal Care : प्राण्यांपासून मानवास आणि मानवापासून प्राण्यास होणाऱ्या आजारांना प्राणिजन्य आजार म्हणतात. हे आजार पृष्ठवंशीय प्राण्यांपासून मानवांमध्ये नैसर्गिकरीत्या संक्रमित होतात. या आजाराचे धोके लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
World Animal Disease Day
World Animal Disease DayAgrowon

डॉ. रणजित इंगोले, डॉ. भूपेश कामडी, डॉ. चैतन्य पावशे

Animal Health : सध्या दोनशेहून अधिक ज्ञात प्राणिजन्य मानवी आजार आहेत. यामध्ये जिवाणूंमुळे (ॲन्थ्रॅक्स, ब्रुसेलोसिस, टीबी), विषाणूंमुळे (रेबीज, इबोला, कोविड-१९), बुरशीमुळे (हिस्टोप्लास्मोसिस, खरूज), आणि परजीवींमुळे (जलपुटी, टॉक्सोप्लाझोसिस, लेशमॅनियासिस) होणाऱ्या आजारांचा समावेश होतो. काही प्राणिजन्य मानवी आजार, जसे की रेबीज, लसीकरण आणि इतर पद्धतीद्वारे प्रतिबंधित करता येतो.

प्रसार

प्राणिजन्य मानवी आजार हे संक्रमित पशुधनाशी जवळून काम करणे, संक्रमित पाळीव प्राणी, प्रदर्शित प्राणी किंवा वन्यजीव यांच्याशी संपर्क, प्राण्यांद्वारे दूषित माती किंवा पाण्याशी संपर्क येणे, कच्चे मांस सेवन, दूषित अपाश्‍चराइज्ड डेअरी उत्पादनांचा वापरातून पसरतात.

धोका

रोगकारके घरगुती किंवा वन्य प्राण्यांच्या संपर्क आल्यास मानवांमध्ये पसरू शकतात.

वन्य प्राण्यांचे मांस किंवा उप-उत्पादने विकणाऱ्यांना विशेषत: जास्त धोका असतो.

प्रक्षेत्रावर जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा जास्त वापर असलेल्या भागात कामगारांना सध्याच्या प्रतिजैविक औषधांना प्रतिरोधक रोगजनकांचा धोका वाढू शकतो.

वाळवंटाच्या शेजारी किंवा निमशहरी भागात राहणाऱ्या लोकांमध्ये वन्य प्राणी उदा. उंदीर, कोल्हे किंवा रॅकून यांसारख्या प्राण्यांपासून आजाराचा जास्त धोका असतो.

मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संपर्क वाढून आजाराचा धोका वाढतो.

महत्त्वाचे आजार

रेबीज

हा विषाणूजन्य आजार आहे. विषाणू पिसाळलेल्या श्‍वानवर्गीय जनावराच्या चाव्यावाटे त्यांच्या लाळेतून मानवी शरीरात प्रवेश करतात.

आजारावर प्रतिबंधात्मक उपचार उपलब्ध आहे. पिसाळलेला श्‍वान चावल्यावर लस मानव व इतर प्राण्यांसाठी उपलब्ध आहे.

लेप्टोस्पारोसिस

आजाराचा प्रसार पावसाळ्यात कुत्रा, मांजर, घुशी यांचे मल- मूत्रापासून दूषित झालेल्या पाण्यापासून होतो. अशा पाण्याचा संसर्ग मानवाच्या जखमा सोबत आल्यास हा आजार माणसांना होतो.

श्‍वानामध्ये या आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण उपलब्ध आहे. माणसांना आजार झाल्यास ताप येतो, मळमळ होते, उलट्या होतात, पोट व अंग दुखते, खोकल्यातून रक्त पडते. दूषित पाण्याशी संपर्क टाळावा.

World Animal Disease Day
Animal Disease : जनावरांतील चयापचयाचे आजार

क्यू ज्वर

आजार जिवाणूमुळे होतो. जिवाणू शुष्कावस्थेत धुळीकरणातून श्वसन मार्गात शिरतात.

आजारी जनावरांचा जननमार्गात कोरडा झालेला स्राव, दूध व मूत्रातून संसर्ग पसरतो.

संसर्गित गवतावाटे याचा संसर्ग माणसांना होतो.

अंडुलेटिंग ज्वर (ब्रुसेल्लोसिस)

जिवाणूजन्य आजार आहे. प्रादुर्भाव झाल्यास मादी जनावर ८ ते ९ महिन्यांचे गाभण असताना गर्भपात होतो, जार पडत नाही. नियंत्रणासाठी लस उपलब्ध आहे.

बाधित जनावराचा गर्भपात आणि जार यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क आल्यास किंवा बाधित जनावराचे कच्चे दूध प्यायल्यास माणसांना हा आजार होतो. माणसांमध्ये कमी न होणारा ताप, सांधेदुखी, वांझपणा इत्यादी लक्षणे दिसतात.

क्षय रोग

जिवाणूजन्य आजार आहे. बाधित जनावराच्या दुधातून किंवा संपर्कातून प्रसार होतो.

आजार झालेल्या माणसांना सतत ताप येतो, अशक्तपणा, खोकला येणे, दिवसेंदिवस वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसतात.

काळीपुळी

आजार प्रामुख्याने प्राणिजन्य पदार्थांचा संपर्क आणि मुख्यत्वे लोकरीच्या कारखान्यातील कामगारामध्ये दिसतो.

चारा, पाण्यामधून जनावरांमध्ये प्रसार होतो. जनावराचा ताबडतोब मृत्यू होतो. नाकातोंडातून काळसर रक्त बाहेर येते.

माणसांना प्रादुर्भाव झाल्यास ताप येतो, डोके दुखते, घाम सुटतो, शरीरात पुरळ येतात, शेवटी मृत्यू होतो.

World Animal Disease Day
Animal Disease : जनावरांतील बबेसियोसिस आजार

प्रतिबंध आणि नियंत्रण

प्राणिजन्य मानवी आजाराचा प्रतिबंध पद्धती प्रत्येक रोगजनकासाठी वेगवेगळ्या असतात; वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर रोग प्रतिबंध करण्यासाठी अनेक पद्धती प्रभावी आहेत.

जनावरांच्या काळजीसाठी सुरक्षित आणि योग्य मार्गदर्शक तत्त्वे अवलंबल्यास मांस, अंडी, दुग्धजन्य

पदार्थ किंवा भाज्यांसारख्या खाद्यपदार्थांद्वारे अन्नजनीत प्राणिजन्य मानवी आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. स्वच्छ पाण्याचा वापर आणि पृष्ठभागावरील पाण्याचे योग्य प्रकारे संरक्षण केल्यास प्रादुर्भाव कमी होतो.

वैयक्तिक स्वच्छतेचा सराव, संरक्षणात्मक कपडे परिधान करणे, प्राण्यांशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक मोहिमा अवलंबल्यास आजाराचा समुदाय पसरणे कमी होऊ शकते. गोठा आणि जनावरांची स्वच्छता ठेवावी.

प्रक्षेत्र मालक, कर्मचाऱ्यांनी प्राणिजन्य आजारासाठी लसीकरण केले असल्याची खात्री करावी.

डास आणि इतर चावणाऱ्या कीटकांपासून आजार पसरतात. याकरिता संरक्षण करावे.

आजारी जनावरे हाताळताना काळजी घ्यावी.

निरोगी जनावरांची देखभाल करणे आणि योग्य तेथे प्रतिबंधात्मक उपचार व लसीकरण (जनावरांमध्ये अँथ्रॅक्स आणि लेप्टोस्पायरोसिस आणि घोड्यांमधील हेन्ड्रा विषाणू) करावे. यामुळे मानवांना संसर्ग होणाऱ्या आजाराचा धोका कमी होऊ शकतो.

दूध पाश्‍चरीकरण करून किंवा उकळून उपयोगात आणल्यास क्षय तसेच इतर दुधावाटे प्रसारित होणाऱ्या आजारावर नियंत्रण मिळते.

दिवसेंदिवस अन्नासाठी वाढलेल्या प्राण्यांमध्ये होणारा प्रतिजैविकांचा वापर आणि त्यामुळे प्राण्यांमधील सूक्ष्म जंतूमध्ये प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढत असल्यामुळे प्राणिजन्य मानवी आजारांचे नियंत्रण आणि प्रतिबंध करणे आव्हानात्मक आहे, म्हणून प्राण्यांमध्ये प्रतिजैविकांचा वापर कमीत कमी करावा.

जागतिक उपक्रम

जागतिक आरोग्य संघटना इतर भागीदारांसह प्राणिजन्य आजारांचा प्रतिबंध, पाळत ठेवणे, प्रयोगशाळा तपासणी, जोखीम मूल्यांकन व नियंत्रणासाठी विविध देशांना मदत करते. एक आरोग्य पध्दतीचा भाग म्हणून, जागतिक आरोग्य संघटना ही अन्न आणि कृषी संघटना, जागतिक प्राणी आरोग्य संघटना यांच्यासह प्रमुख प्राणिजन्य आजारांसाठी सर्वकष प्रारंभिक चेतावणी प्रणालीचा अवलंब करण्याकरिता सहयोग करते.

भारतातील उपक्रम

राष्ट्रीय पशू आजार नियंत्रण कार्यक्रम : लाळ्या खूरकूत आणि ब्रुसेलोसिस या प्राणिजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम आहे.

मोबाइल पशुवैद्यकीय युनिट : रोगनिदान, उपचार, किरकोळ शस्त्रक्रिया आणि आजारग्रस्त जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढवणे यासह शेतकऱ्यांच्या दारात पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी मोबाईल पशुवैद्यकीय युनिट कार्यरत आहे.

प्राणी जन्म नियंत्रण (श्‍वान) नियम : लोकसंख्या स्थिरीकरणाचे साधन म्हणून भटक्या श्‍वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि भटक्या श्‍वानांचे निर्मूलन करण्यावर भर दिला जात आहे.

झुनोसेस प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय ‘एक आरोग्य’ कार्यक्रम : आंतर-क्षेत्रीय समन्वय आणि सहयोगाद्वारे प्राणिजन्य आजारावर पाळत ठेवणे, त्यांचे वेळेवर निदान, प्रतिबंध आणि नियंत्रण मजबूत करण्यावर भर.

डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४

(विभाग प्रमुख, पशू विकृती शास्त्र, स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com