Animal Care : शिफारशीत वेळेत जंतनिर्मूलन आवश्यक

Animal Deworming : जनावरांच्या आतड्यात निरनिराळ्या प्रकारचे जंत (कृमी) वास्तव्य करतात. हे जंत या जनावरांना मिळणाऱ्या अन्नघटकातून आपला उदरनिर्वाह करतात, म्हणूनच त्यांना परोपजीवी जंत म्हणतात.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. सिद्दीकी एम.एफ.एम.एफ., डॉ. शेख एस. आर.

जनावरांच्या आतड्यात निरनिराळ्या प्रकारचे जंत (कृमी) वास्तव्य करतात. हे जंत या जनावरांना मिळणाऱ्या अन्नघटकातून आपला उदरनिर्वाह करतात, म्हणूनच त्यांना परोपजीवी जंत म्हणतात. उष्ण आणि दमट भागात, जनावरांना नियमितपणे जंतनाशन करणे आवश्यक आहे.

  • जंत जनावरांसाठी घातक असतात. ते जनावरांच्या शरीरातील पाचक रस आणि रक्त शोषतात. जनावर अशक्त बनते. जंत झालेले जनावर रोडावते. जनावराला अपचन होते किंवा हगवण लागते.

  • जंत आतड्याच्या त्वचेवर जखमा करतात. त्यामुळे जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार आढळून येतात. जनावरांची त्वचा खडबडीत दिसते. जंत झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे ते विविध आजारांना बळी पडतात.

  • जंत लहान वासरांना अतिशय घातक असतात. वासरांच्या पोटामध्ये जंत झाल्यामुळे त्यांची भूक मंदावते. वाढ नीट होत नाही, वजन घटते. त्यांच्यामध्ये अशक्तपणा येतो, त्यांना रक्तक्षम होतो. यासाठी लहान वासरांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जनावरांचे दूध उत्पादन घटते. गाई म्हशींची प्रजनन क्षमता कमी होते.

  • जनावरांमध्ये विशेष करून चपटे जंत (टेप वर्म), गोल जंत (राउंड वर्म) आणि पर्णाकृती जंत (फ्ल्यूक वर्म) दिसतात.

चपटे जंत

  • हे जंत चपट्या आकाराचे असतात. शरीर अनेक चपट्या फितींनी बनलेले असते.

  • हे जंत जठर किंवा आतड्यांमध्ये आढळतात. डोके आतड्यात खुपसून तेथील पाचक रस शोषून घेतात.

  • जंताच्या मागील भागात अंडी तयार होतात. ती जनावरांच्या शौचावाटे बाहेर पडतात आणि इतर जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात उदा. मोनेझिया.

Animal Care
Deworming : जंतनाशक प्रभावी का ठरत नाहीत?

गोल जंत

  • लहान वासरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. जंत आकाराने गोल असतात. अंडी जनावरांच्या शौचावाटे बाहेर टाकली जातात.

  • अंडी कुरण किंवा गवतातून इतर जनावरांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यांच्यामध्ये हे जंत विकसित होतात.

  • प्रादुर्भावामुळे वासरांना हगवण लागते, वासरू अशक्त होते आणि दगावते.उदा. अॅक्सॅरीस, हिमॉन्कस.

पर्णाकृती जंत

  • जंत जनावरांच्या पित्ताशय व यकृतात सापडतात. यांचा आकार झाडांच्या पानाच्या आकाराचा असतो.

  • जंत आपली अंडी आतड्यात सोडतात. शेणाबरोबर ही अंडी शरीराबाहेर पडतात. पाण्याच्या सान्निध्यात अंडी फुटतात आणि गवताच्या पात्यावर राहतात. हे गवत जनावरांच्या खाण्यात आले की जंत जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. तेथून यकृत आणि पित्ताशयामध्ये प्रवेश करतात. यकृत पेशींचा नाश करून कालांतराने यकृत निकामी करतात. तिथेच जंत मोठे होतात. यामुळे जनावरांमध्ये कावीळ होते. उदा. फॅशिओला

जंतनाशकाची निवड

  • जंतनाशकाची निवड करण्यापूर्वी आपल्या जनावराला कोणत्या प्रकारच्या जंताची बाधा झाली आहे किंवा आपल्या भागात अस्तित्वात असणाऱ्या जंताचे प्रकार जाणून घेण्यासाठी जनावरांच्या शेणांची तपासणी करावी लागते.

  • जनावराच्या शेणाची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी केल्यास जंताच्या अंड्यावरून आजाराचे अचूक निदान करता येते. यामुळे जंत निवारण्यासाठी उपयुक्त व प्रभावी जंतनाशक निवडणे सुलभ होते. अनेक प्रकारच्या जंतांना एकाच वेळी नियंत्रण करण्याची क्षमता असलेले जंतनाशक वापरल्यास ते उपयुक्त ठरते.

Animal Care
Deworming : कालवडीला वेळेवर जंतनाशक देण्याचे फायदे काय आहेत?

प्रतिबंधात्मक उपाय

  • शेणाच्या नमुन्यांचे मूल्यांकन करून निरोगी कळप राखावा. मूल्यांकनावरून जंताचा प्रादुर्भाव कळतो. त्यानुसार उपाययोजना करावी.

  • जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी चांगला आहार द्यावा. जेणेकरून जनावरांना जंत संक्रमणास प्रतिरोधक बनू शकेल.

  • लहान जनावरांना जन्माच्या सहा तासांच्या आत चीक पिण्यास द्यावा. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

  • पुरेशा प्रमाणात कुरणाचे व्यवस्थापन करावे. गोठा आणि कुरणाची स्वच्छता ठेवावी. जनावरांचे वेळेवर जंतनिर्मूलन करावे.

जंतनाशकाचा वापर

  • जंतबाधा झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता खबरदारी घेणे आवश्यक आहे. शिफारशीनुसार वेळेवर जंतनाशके द्यावीत.

  • जंतनाशक सर्व प्रकारच्या जंतावर कार्यक्षम असावे.

  • जंतनाशकाचा जनावरांवर विपरीत परिणाम होता कामा नये.

  • एकाच जंतनाशक वारंवार वापर करू नये, नाहीतर जंत त्याला प्रतिसाद देत नाही.

  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने मात्रा द्यावी, कमी जास्त प्रमाणात देऊ नये.

  • जंतनाशक पाजताना जनावरांना ठसका लागणार नाही याची काळजी घ्यावी.

  • गोठ्यातील सर्व जनावरांना एकाच दिवशी जंतनाशक द्यावे.

  • जंतनाशक देण्याची तारीख, मात्रा, इत्यादी माहिती वहीत नोंद करावी.

- डॉ. सिद्दीकी एम.एफ.एम.एफ.

९९६०१४७१७१

(चिकित्सालयीन पशुवैद्यकीय औषध नीती व न्यायवैद्यक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महावि‌द्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com