
डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
Animal Feeding Planning : पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर परिणाम होतात. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांत दुग्धज्वर होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठी गाभणकाळातही क्षार मिश्रण द्यावे.
सध्या पावसाळा सुरू आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागांत कमी पर्जन्यमान आहे. अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोन्हींचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. पर्यायाने उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर परिणाम होतात. पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहार व्यवस्थापनाबाबत मुख्यत: पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
हिरवा चारा व्यवस्थापन :
१) पावसाळ्यामध्ये सुरुवातीला एकतर चारा लागवड केलेली असते किंवा पावसाच्या पाण्यामुळे कोवळे गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले असते. अशा कोवळ्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात जास्त प्रमाणात वापर केल्यास त्याची पचनक्रिया बिघडून पातळ शेणाची समस्या निर्माण होते.
२) कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेले दिसते, परंतु दुधातील फॅट, एसएनएफ आणि इतर घटकांचे प्रमाण तुलनेने कमी झालेले दिसून येते. पातळशेणामुळे चाऱ्यावरती शेण उडून चाऱ्याचा अपव्यय जास्त प्रमाणात होतो.
३) पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला आणि हिरवा चारा मिश्रण जनावरांना द्यावे. पावसाळ्यात वाळलेला चारा उपलब्ध असावा. याकरिता उन्हाळ्यामध्ये तसे नियोजन करावे.
४) हिरवा चाऱ्याची जास्त वेळ कुट्टी करून साठवणूक केल्यास कुबट वास येतो. त्यामुळे असा चारा जनावरे आवडीने खात नाहीत याकरिता हिरव्या चाऱ्याची गरजेनुसार कुट्टी करावी. एकदाच दिवसभराची किंवा उद्या सकाळसाठीची कुट्टी करून ठेवू नये.
५) चारा पावसात भिजलेला असल्यास किंवा त्यावरती पाणी जमा झाल्यास असा चारा जनावरे जास्त प्रमाणात खात नाहीत. पर्यायाने त्यांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होत नाही. याचा परिणाम वाढीवर व उत्पादनावर होतो. याकरिता त्यावरील पाणी निघून जाण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यानंतरच असा चारा जनावरांना खाण्यास द्यावा.
६) पावसाळ्यात चाऱ्यास चिखल लागण्याचे प्रमाण वाढते. असा चिखल लागलेला चारा जनावराने खाल्यास आरोग्य बिघडते, जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून चाऱ्यास चिखल लागू नये म्हणून काळजी घ्यावी.
७) जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. गव्हाणीला चिकटलेला हिरवा चारा वेळोवेळी न काढल्यास त्यास कुबट वास येतो त्यामध्ये बुरशीची वाढ होते, त्यामुळे अशा चाऱ्यावर टाकलेला दुसरा चाराही जनावरे पूर्णपणे खात नाहीत. असा शिल्लक बुरशीजन्य चारा जनावरांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतो. चाऱ्याची साठवणूक कोरड्या ठिकाणी करावी.
८) वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तेथे पावसाचे पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होते. चारा काळा पडतो त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होतो.
९) डबक्यात किंवा शेतात साठलेले पाणी जनावरांना पाजू नये. अशा पाण्यामुळे एकतर जंत प्रादुर्भावाची शक्यता असते किंवा त्या शेतात खते दिली असल्यास या खतांचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधा होऊ शकते.
१०) ज्वारी वर्गातील पावसाळ्यात पेरलेली पिके उगवली असल्यास अशी पिके कोवळ्या अवस्थेत जनावर खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अन्यथा, कोवळी ज्वारीवर्गीय चारा किंवा कमी पावसामुळे वाढ खुंटलेली ज्वारी वर्गीय पिके जनावरांच्या खाण्यात आल्यास किरळ लागण्याची शक्यता असते.
११) नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेच पुरेसा चीक पाजावा, जेणेकरून यातून या वासरात रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल.
पावसाळ्यातील आजारांना ही वासरे सहजासहजी बळी पडणार नाहीत.
१२) पावसाळ्यात पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये.
१३) ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खाण्यास दिला जातो. अशा वेळी जनावरांत पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होते.
१४) पावसाळ्यात एकदम थंड पाणी देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते.
१५) शरीर तापमान टिकविण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जनावर जास्त चारा खाऊ शकते, याकरिता या काळात जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा असणे गरजेचे आहे. या काळात चारा खाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्याचा वाढ, उत्पादन यावर परिणाम होतो म्हणून चाऱ्याची चव वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. पावसाळ्यात थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित स्निग्ध पदार्थांचा वापरही उपयोगी ठरतो.
क्षार मिश्रण, ऊर्जायुक्त आहाराचा वापर ः
१) पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांत दुग्धज्वर होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठी गाभणकाळातही क्षार मिश्रण द्यावे.
२) जनावर विण्याअगोदर १५ ते २० दिवस क्षारमिश्रणाचे प्रमाण थोडे कमी करावे, जेणेकरून दुग्धज्वरापासून जनावरांचा बचाव करता येईल.
३) जनावरांना जीवनसत्त्व ‘ई’ व सेलेनियमचा पुरवठा करावा.
४) पावसाळ्यात चरायला जाणाऱ्या जनावरांचे खूर मऊ होतात, त्यांना इजा होते. खूर व्यवस्थित राहण्यासाठी जनावरांच्या आहारात झिंक, कॉपर, कॅल्शिअम याबरोबरच लायसिन आणि मिथोओनिन या अमिनो आम्लांचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा.
५) स्टार्च, नत्र पुरवठा करणे हे पचनक्रियेसाठी उपयोगी ठरते.
६) पोषणतत्त्वांची कमतरता होऊ नये याकरिता या जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार पशुखाद्याचा वापर करावा.
७) पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जनावरांची ऊर्जेची गरज वाढते. ऊर्जा ही शरीर तापमान वातावरणातील तापमानासोबत ठेवण्यासाठी गरजेची असते. म्हणून आहारात ऊर्जायुक्त घटकांचा वापर करावा, प्रमाण वाढवावे.
संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.