Women Empowerment
Women Empowerment  Agrowon
यशोगाथा

Women Empowerment : बचत गटाच्या साथीने महिला झाल्या सक्षम

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Women Self Help Group Success Story : कर्जत तालुक्यातील (जि.नगर) रवळगाव हा दुष्काळी परिसर. बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. या भागात प्रामुख्याने लिंबू, कापूस, तूर, ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड असते. या गावशिवारातील मजुरी करणाऱ्या, अल्प शेती असलेल्या महिलांचे संघटन करत महिला आर्थिक विकास महामंडळाने रवळगावामध्ये चौदा आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दोन वर्षांपूर्वी १० महिला बचत गट तयार केले. गटाच्या माध्यमातून ३०० महिला एकत्र आल्या.

प्रत्येक महिला दर महिन्याला २०० रुपयांची बचत करते. गावातील महिला गटांना बॅंकेकडून कर्ज मिळाले आहे. बचतीच्या पैशातून अंतर्गत व्यवहार करत शेतीसह संसाराच्या विकासाला महिलांनी हातभार लावला आहे. बचत गटाला व्यवसाय वृद्धीसाठी महिला आर्थिक महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, उपजीविका सल्लागार दीपक माने, तालुका व्यवस्थापन श्रीकांत चव्हाण सातत्याने मार्गदर्शन करतात.

लोणचे विक्रीतून आर्थिक फायदा

सहा वर्षांपूर्वी रवळगावमध्ये रोहिणी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली धनश्री महिला बचत गटाची स्थापना झाली. भारती शिंदे गटाच्या उपाध्यक्ष असून सुवर्णा गोरे, सोनाली गोरे, चंद्रकला गोरे, साखरबाई खेडकर, शीतल खेडकर, प्रियंका तुपे, रूपाली तुपे, हिराबाई खेडकर, पार्वती गोरे, आशाबाई गोरे, संगिता वरवट, ज्योती कुंभार या सदस्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मंगल गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नागर महिला बचत गटाची सुरुवात झाली.

प्रमिला वरवट उपाध्यक्षा असून पूजा गोरे, लता गोरे, मनिषा गोरे, सुप्रिया वायाळ, काजल खेडकर, हिराबाई मोकाशे, योगिता वरवट, रूपाली वरवट, नीलम गोरे सदस्या आहेत. धनश्री महिला बचत गटाला पाच वर्षांपूर्वी बॅंकेकडून दोन लाखांचे कर्ज मिळाले होते. त्यानंतर गटाने अंतर्गत व्यवहार करत दोन वर्षांत कर्ज परतफेड केली. त्यानंतर पुन्हा पाच लाखांचे कर्ज मिळाले. गटातील महिलांनी स्वतः व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. महिला बचत गटासाठी समन्वयक म्हणून करत असलेल्या धनश्री महिला बचत गटातील सदस्य सुवर्णा गोरे यांनी पार्लर आणि टेलरिंगचे दुकान सुरू केले आहे.

रवळगाव शिवारात आंबा, लिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. तसेच बाजारपेठेत लोणच्याला असलेली मागणी लक्षात घेऊन या दोन्ही गटांनी दोन वर्षांपूर्वी लिंबू, आंब्याचे लोणचे तयार करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये गावशिवारातील शेतकऱ्यांकडून कैरी विकत घेतली जाते. लिंबाची जुलै ते डिसेंबर काळात खरेदी होते. लोणचे निर्मितीसाठी साधारपणे गावरान कैरीचा वापर होतो.

दरवर्षाला साधारण दहा टनांपर्यंत आंबा, लिंबाचे लोणचे तयार होते. २५० ग्रॅमपासून ते एक किलो पर्यंत पॅकिंग केले जाते. गटातर्फे वर्षभर मागणीनुसार लोणच्याची विक्री केली जाते. राज्यभरातील प्रदर्शने तसेच परिसरातील दुकानदारांना मागणीनुसार पुरवठा केला जातो. आंबा लोणचे प्रति किलो २५० ते ३०० रुपये आणि लिंबू लोणचे २०० रुपये प्रति किलो या दराने विक्री होते. महिलांनी लोणच्याचा ‘नागर’ हा ब्रॅण्ड विकसित केला आहे.

नागर हे प्राचीन भारतीय संस्कृतीचे नाव आहे. दरवर्षी आंबा, लिंबू लोणचे विक्रीतून दहा ते पंधरा लाखांपर्यंत उलाढाल होते. खर्च वजा जाता मिळणारा नफा गटातील सदस्या वाटून घेतात. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून या गटाला मसाले तयार करण्यासाठी वजन काटा, पॅकिंग मशिन, विक्रीसाठी टपरी, दोन गिरण्या, मसाले निर्मिती यंत्र मिळाले आहे. त्यामुळे हे दोन्ही गट वर्षभरापासून मसाले निर्मितीकरून विक्री करत आहेत.

चिंच फोडणीतून रोजगार

रवळगावसह परिसरातील गुरव पिंप्री, कोकणगाव परिसरात शेती बांधावर चिंचेच्या झाडांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. चिंचेची विक्री करताना ती फोडून दिली तर दर चांगला मिळतो. चिंच फोडणीचे काम जिकरीचे आहे.

त्यासाठी फारसे मजूर मिळत नव्हते. हे लक्षात घेऊन गटातील महिलांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला. यातून गटातील सदस्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. रवळगाव आणि परिसरातून दरवर्षी सुमारे १०० टन चिंच विक्री होते.

चिंच फोडणी व्यवसायातून पन्नासपेक्षा अधिक महिलांना साधारण तीन महिने हक्काचा रोजगार मिळाला आहे. प्रती किलो दहा रुपये दराने चिंच फोडणी केली जाते. त्यातून प्रत्येक महिलेला दरवर्षी साधारणपणे वीस हजारांची मिळकत होते.

वृक्षारोपणात पुढाकार

रवळगाव आणि परिसरातील महिलांनी वृक्षारोपणाला प्राधान्य दिले आहे. वाढदिवसाला अन्य भेट न देता महिला रोपाची भेट देऊन त्याची लागवड करून जोपासना करण्याचा संकल्प करतात. महिला आणि गावांतील लोकांच्या पुढाकारातून या गावशिवारात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने फळपिकांच्या बरोबरीने पर्यावरणासाठी उपयुक्त झाडांचा समावेश आहे.

शेतीला मिळाले पाठबळ

बचत गटामुळे महिला सक्षम होत आहेतच, त्याच बरोबरीने शेतीलाही पाठबळ मिळत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. पंचवीसपेक्षा अधिक महिलांना पशुपालन आणि १५ महिलांना शेती सुधारण्यासाठी महिला बचत गटातून आर्थिक मदत मिळाली आहे. नायर फाउंडेशनतर्फे महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. त्याचा शेती विकासाला फायदा होत आहे. गावांतील प्रत्येक सामाजिक उपक्रमांमध्ये गटातील महिलांचा पुढाकार असतो.

वाचनालय, वनीकरण उपक्रमाला चालना

रवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हनमंत गोरे हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित तरुण. काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी गावामध्ये सामाजिक उपक्रमांना सुरवात केली.२०२० मध्ये त्यांनी नागर फाउंडेशनची सुरुवात केली. या माध्यमातून स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मुला, मुलींसाठी अद्ययावत वाचनालयाची सुरुवात केली आहे.

वाचनालयातील दीड हजार पुस्तके विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिली जातात. वाचनालयात जास्त काळ वाचन करेल अशा दोन विद्यार्थांना दरवर्षी ‘वाचन पुरस्कार’ दिला जातो. हे वाचनालयाची जबाबदारी महिलांकडे आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून रवळगावसह अन्य गावांत ५० हजार रोपांची लागवड करून त्यांची योग्य पद्धतीने जोपासना करण्यात आली आहे.

चिंतामणी महादेव मंदिर परिसरात दहा हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसे गावांतील शेतकऱ्यांच्या सुमारे चाळीस एकर क्षेत्रावर फळ पिकांची लागवड करून देण्यात आली आहे. गावातील मंदिर, मोकळी जागा तसेच प्रत्येक घराजवळ नांदुरक रोपांची लागवड करण्यात आली आहे.

रवींद्र गोरे ८७८८६६३४९२

सुवर्णा गोरे ७०२०२१४६८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Worm Infestation : सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

Paddy Farming : बळीराजाला आता आवणीचे वेध

Agriculture Sowing : धाराशिव जिल्ह्यात ८७ टक्के क्षेत्रावर पेरणी

Crop Insurance : पीकविमा हप्त्या व्यतिरिक्त जादा शुल्क आकारू नये : कुंभार

Agriculture Prosperity : शेती समृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञान आवश्‍यक

SCROLL FOR NEXT