Lemon Farming Vidarbha 
यशोगाथा

Lemon Farming Vidarbha : लिंबातून आर्थिक वहिवाट होतेय प्रशस्त

Lemon Production : लिंबूवर्गीय श्रेणीतील संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात लिंबाखालील क्षेत्रही दखलपात्र आहे. हंगामातील किंवा वर्षभराची मागणी पाहता हे फळ शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला पर्याय ठरत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : ‘ऑरेंज सिटी’ अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्याच्या पारशिवणी तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये लिंबू लागवड केली जाते. बालासावळी, चारगाव, कोंडासावळी, परसोडी ही गावे लिंबू उत्पादक म्हणून ओळखली जातात. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी या पिकाच्या माध्यमातून आपले अर्थकारण उंचावले आहे.

काही प्रातिनिधिक उदाहरणे त्यासाठी देता येतील. कोंडा सावळी (ता. पारशिवनी) येथील बबन ढोंगे यांची सहा एकर शेती आहे. कापूस, तूर आदी पिके ते घेतात. आजमितीला त्यांची नवी व सुमारे १० वर्षांपूर्वी लागवड केलेली जुनी मिळून सुमारे अडीच एकरांत लिंबू बाग आहे.

नव्या बागेत साई शरबती हे वाण घेतले आहे. आंबिया, मृग आणि हस्त असे तीनही बहर ते घेतात. प्रति झाड किमान २५ ते ३० किलो उत्पादन व वर्षभरात मिळून अडीच ते पावणेतीन लाखांचे उत्पन्न ते मिळवतात. गावालगतच्या काही शेतकऱ्यांकडून हंगामात प्रति दिन दोन ते तीन टन या प्रमाणात लिंबांचा जबलपूरला (मध्य प्रदेश) पुरवठा होतो.

बबन यांनी मात्र क्षेत्र कमी असल्याने नागपूरलगतच्या कामठी येथील बाजारपेठेचा पर्याय निवडला आहे. ते सांगतात, की वर्षभराची सरासरी लक्षात घेतली तर प्रति किलो ५० रुपये दर मिळतो. लिंबाला मागणीही तशी वर्षभर असते. यंदा मार्चच्या सुरुवातीपासून हा दर १५० रुपये होता. त्यानंतरच्या काळात हा दर १०० रुपयांवर आला.

राऊत यांची लिंबू बाग

पालसावळी, (ता. पारशिवणी, जि. नागपूर) येथील विलास कोमलचंद राऊत यांची नवी व जुनी मिळून साडेअकरा एकर क्षेत्रावर लिंबू लागवड आहे. सिंचनासाठी तीन विहिरींचा स्रोत आहे. बागेची गरज ओळखत ठिबक आणि पाटपाणी देण्यावर भर राहतो. हस्त आणि आंबिया बहर ते घेतात. तुलनेत हस्त बहराची उत्पादकता कमी राहते. मात्र ऐन उन्हाळ्यात त्याची फळे मिळत असल्याने दर चांगले राहतात.

विक्रीसाठी जबलपूर, रायपूर, कळमना (नागपूर) या भागातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधत कोणत्या बाजारात माल पाठवायचा याचा निर्णय घेतला जातो. श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) भागात लिंबू उत्पादकांची संख्या अधिक आहे. व्हॉट्‍सॲप ग्रुपच्या माध्यमातून त्या भागातील दरांची माहिती कळते. तापमानात वाढीच्या परिणामी यंदा राऊत यांना किलोला १०० ते ११० रुपये दर मिळाला.

आता ढगाळ वातावरणामुळे दर कमी झाले आहेत. चोर (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील अंकुश झंझाट यांची पाच एकरांत लिंबू बाग आहे. दरांचा अंदाज घेत स्थानिक किंवा अन्य राज्यांमध्ये ते विक्री करतात. नजीकच्या काळात अन्य शेतकऱ्यांकडूनही लिंबांची खरेदी करीत ट्रकद्वारे हैदराबाद किंवा देशाच्या अन्य भागांत लिंबू पाठविण्यावर त्यांचे सातत्य आहे.

लिंबाची बाजारपेठ

हंगामात विदर्भातील लिंबू उत्पादकांकडून मागणीच्या तुलनेत पुरवठ्याची पूर्तता होत नाही. त्यामुळेच फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत नागपूरच्या कळमना बाजारासह महात्मा फुले भाजी बाजारात दक्षिणेतून मोठ्या प्रमाणावर लिंबाची आवक होते. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राम महाजन यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की मागील काही वर्षांत लिंबूवर्गीय सर्वच पिकांवर किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

कोळशीच्या होणाऱ्या प्रादुर्भावाला कंटाळत अनेक शेतकऱ्यांनी संत्रा बागा काढून टाकल्या. त्यानंतर याच कारणामुळे शेतकऱ्यांनी लिंबू बागाही काढल्या. त्याचा परिणाम बाजारातील लिंबू आवकेवर झाला. पूर्वी सावनेर, कळमेश्‍वर, अमरावती, अकोला या भागातून लिंबाची रोजची आवक १०० क्‍विंटलपेक्षा अधिक व्हायची. आता मात्र स्थानिक स्तरावरील आवक २० क्‍विंटलपर्यंत खाली आली आहे. त्यामागे लिंबू बागा सातत्याने कमी होणे हे मुख्य कारण आहे. दक्षिणेकडून अनेक जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातील लिंबू आवक आता बाजारात होते.

सन २०२५-२६ या वर्षात फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत लिंबाचे दर ९००० ते १० हजार रुपये प्रति क्‍विंटल याप्रमाणे होते. मागील तीन वर्षांत या कालावधीत दरांचा हाच ट्रेंड राहिला असेही महाजन यांनी सांगितले. दक्षिणेतून त्यासोबतच स्थानिक स्तरावरून बाजारात ५० किलोच्या पॅकिंगमध्ये लिंबू आणले जाते. फळाचा रंग आणि आकार हे दरांवर परिणाम करणारे घटक ठरतात. काही ग्राहकांची थोड्या हिरव्या रंगाच्या लिंबाला मागणी राहते तर काहीजण पिवळसर रंगाचा लिंबू खरेदी करतात.

अमरावती फळ बाजारपेठेतील व्यापारी सुदेश दातेराव म्हणाले, की यंदा अवकाळी पाऊस सातत्याने बरसला. वातावरणातील बदलाच्या परिणामी यंदा लिंबाच्या उत्पादनावर परिणाम झाला. तापमानात वाढ होताच मागणीत वाढ होत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे सुरुवातीला लिंबाचे दर तेजीत होते.

आता ढगाळ वातावरणामुळे अमरावती फळ व भाजीपाला बाजारात वीस क्‍विंटल इतकी अत्यल्प आवक असताना दर ३५०० ते ४२०० रुपये प्रति क्‍विंटलवर आले आहेत. लिंबाला अपेक्षित आकार नाही. त्याचाही दरांवर परिणाम झाला आहे. अमरावती बाजारात हैदराबाद, वाडेगाव, अमरावती या भागातील लिंबाची आवक होते.

बबन ढोंगे ९३२५६३८५५०

विलास राऊत ९२२६४३०७८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT