Vairag Agriculture Market Agrowon
यशोगाथा

Vairag Agriculture Market : सोयाबीन, ज्वारी, हरभऱ्यासाठी वैरागच्या धान्य बाजाराला शेतकऱ्यांची पसंती

Grain Trading Market : सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथील उपबाजार सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तूर आदी धान्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक अडत दुकानांत खुले लिलाव, रोख पट्टी, पारदर्शक व्यवहार व समाधानकारक दर ही या बाजाराची वैशिष्ट्ये आहेत.

सुदर्शन सुतार

Solapur Grain Market : सोलापूर-बार्शी महामार्गावर वैराग हे बार्शी तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र आहे. वैराग हा तालुका नसला तरी तालुक्याप्रमाणे विकसित झालेले मोठे शहर म्हणून त्याची ओळख आहे. बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हटले जाते.

त्यामुळे मराठवाडा भागातून बार्शीसह वैरागलाही मोठ्या प्रमाणात ज्वारी, तूर, सोयाबीन आदी धान्याची सर्वाधिक आवक राहते. सोलापूरपासून ४० ते ४५ किलोमीटर आणि बार्शीहून १५ किलोमीटर अंतरावर ही बाजारपेठ असूनही शेतकऱ्यांकडून वैरागलाच प्राधान्य दिले जाते.

वैरागच्या या भौगोलिक परिस्थितीचा आणि या भागातील शेतकऱ्यांचा विचार करून बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने वैरागला १९५५ मध्ये २५ एकर जागा विकत घेऊन उपबाजाराची स्थापन केली.

तेवीस गाळे बांधून व्यापाऱ्यांची सोय केली. तेव्हापासून आजतागायत या उपबाजारात धान्य खरेदी-विक्रीला शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही कायमची पसंती दिली आहे. सोलापूर, मंगळवेढा भागातील ज्वारी, तूर यांचे वेगळे महत्त्व देखील आहे.

वैरागच्या बाजाराचे महत्त्व

वैरागच्या बाजारात खरीप व त्यातही सर्वाधिक रब्बी अशा हंगामांमध्ये धान्यांची आवक-जावक होते. मानेगाव, दहिटणे, सुर्डी, मालवंडी, मुंगशी, देगाव, वाळूज, मळेगाव, मालेगाव, धामणगाव आदी जवळपासच्या २५ ते ३० खेड्यांचा वैरागशी रोजचा संपर्क असतो. त्यामुळे वैरागच्या बाजारपेठेचा आवाका तसा मोठा आहे. येथे रब्बीमध्ये नव्या ज्वारीसह तूर, सोयाबीन, उडीद आणि हरभऱ्याचे व्यवहार होतात. यंदा तुलनेने उडीद, सोयाबीन, तुरीची आवक कमी आहे. मात्र ज्वारी, गहू आणि हरभऱ्याची आवक चांगली आहे.

उल्लेखनीय उलाढाल

मागील दोन-अडीच महिन्यांत नवी ज्वारी, गहू, हरभरा, उडीद, सोयाबीन, तूर यांची मोठी आवक बाजारात झाली. प्रति दिन सर्व धान्यांची मिळून किमान ४ ते ५ हजार कट्टे आवक तर एका दिवसात किमान ५० लाखांपर्यंतची उलाढाल होते. इथे मिळणारे दर अन्य बाजारपेठांच्या तुलनेत अधिक असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

प्रत्येक दुकानात लिलाव

बहुतेक सर्व बाजार समित्यांमध्ये ठरावीक ठिकाणी धान्यांचे नमुने आणले जातात. त्यानंतर शेतकऱ्यांसमोर त्याचे लिलाव पुकारून व्यवहार होतात. मात्र वैराग येथील बाजार समितीमध्ये आवारातील प्रत्येक अडत व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन खरेदीदार व्यापारी लिलाव पुकारतात. हेच बाजाराचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे बाजारात दर काय चालले आहे हे सर्वांना समजतेच. मात्र सर्व खरेदीदार एकत्रितरीत्या प्रत्येक दुकानात जात असल्याने खरेदीदारांमध्ये स्पर्धा होते. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला लिलावात चांगली बोली लागते.

शीतगृह, गोदामाची सुविधा

बाजार समितीचे सुमारे एक हजार टन क्षमतेचे शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारण्यात आले आहे. बेदाण्यासह अन्य शेतीमाल त्यात ठेवण्यात येतो. लवकरच एकहजार टन क्षमतेचे अजून एक शीतगृह उभारण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय वखार महामंडळाचे गोदामही या ठिकाणी आहे. त्यात सोयाबीन, तूर, उडीद आदी शेतीमाल ठेवण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वैराग उपबाजार दृष्टिक्षेपात

आवार २५ एकर क्षेत्रावर विस्तारलेले.

सुमारे १०० व्यापाऱ्यांचे जाळे. ५० हून अधिक सुसज्ज व्यापारी गाळ्यांची सोय.

सोमवार ते शनिवार दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होतात लिलाव.

प्रत्येक दुकानात होतात खुले लिलाव. रोखपट्टीही दिली जाते.

वीज, पाण्याच्या सुविधांसह बँका, पोस्ट, उपाहारगृहे आदींची सुविधा.

लिलाव मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांसमोरच वजन करून शेतीमालाची होते विक्री.

येथील बाजारातून धान्याची खरेदी केल्यानंतर स्थानिक सोलापूरसह पुढे मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच परराज्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील शहरांमधील बाजारांत हे धान्य वितरित होते.

जनावरांचाही बाजार

भुसार धान्याशिवाय दर बुधवारी जनावरे बाजारही भरविला जातो. या बाजारामध्ये जर्सी गायी, पंढरपुरी व मुऱ्हा म्हशी, खिलार बैलांची आवक होते. सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाचपर्यंत हा बाजार चालतो. या बाजारातही शेजारील माढा, मोहोळ, सोलापूर, तुळजापूर या भागांतील पशुपालक खरेदी-विक्रीसाठी येतात.

मनोज भोसले ९८९०९४०६७४ (वरिष्ठ लेखनिक, वैराग उपबाजार)

यंदाच्या तीन महिन्यांतील सर्वाधिक दर (रुपये)

(कंसात आवक प्रति क्विंटल)

धान्य जानेवारी फेब्रुवारी मार्च

ज्वारी ३००० ३००० ३५००

आवक ६,७७३ क्विंटल.

गहू २८०० ३००० ३५००

आवक- ३,५०० क्विंटल.

तूर ७२०० ७५०० ८५००

आवक १०,११३ क्विंटल.

सोयाबीन ४००० ४२०० ४१००

आवक- २२,४१३ क्विंटल.

हरभरा ५८०० ५६०० ५६००

आवक ३,०४२ क्विंटल.

उडीद ६५०० ६२०० ८०००

आवक १,०४० क्विंटल

दरवर्षी हंगामात वैरागच्या बाजारातच धान्य आणतो. यंदा ज्वारीचे नऊ कट्टे घेऊन आलो. क्विंटलला ३००० रुपये दर मिळाला. आणखी २०० ते ३०० रुपये जादा दर मिळण्याची अपेक्षा होती. तरीही आपल्या समोरच लिलाव आणि वजन होते ही समाधानाची बाब आहे.
श्रीमंत वायकर, वडगाव, ता.तुळजापूर, जि. धाराशिव
सोयाबीन, तुरीला यंदा चांगला उठाव व दर मिळाले. सध्या ज्वारी, गहू, हरभरा यांची दररोज २०० ते ३०० कट्टे आवक आहे. व्यवहाराच्या पारदर्शक पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्‍वास आहे.
विनोद मोरे, अडत व्यापारी
वैरागच्या सभोवती सुमारे २५ ते ३० खेडी असल्याने तेथील शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. खुल्या लिलावांसह रोख पट्टीमुळे शेतकऱ्यांचा या बाजाराकडे कल आहे नवे शीतगृह उभारण्याचे प्रयत्न सुरू असून बेदाणा साठवणूक त्यामुळे शक्य होणार आहे.
-तुकाराम जगदाळे ८८८८५२६९३३ (सचिव, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drone Pilot Training: ‘वनामकृवि’-‘आरपीटेओ’तर्फे ड्रोन पायलट परवाने वितरित

Agro Processing Industry: महिला शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळणे आवश्यक

Fake fertilizers: खतांचा काळाबाजार, बोगस खत विक्री रोखण्यासाठी योगी सरकारचा मोठा निर्णय

Water Storage: मराठवाड्यात विविध प्रकल्पांत पाणीसाठा ९४ टक्क्यांवर

Parliament Winter Session 2025: 'मनरेगा'चे नाव बदलण्यावरुन विरोधक आक्रमक, संसद परिसरात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने

SCROLL FOR NEXT